दीड महिन्यात घोषणा पूर्ण, टाटा टेक्नॉलॉजीकडून 191 कोटींची गुंतवणूक लोकनेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मागणी मंजूर..
नांदेड – मराठवाड्यातील युवकांना जागतिक दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे नांदेड जिल्ह्यासाठी ‘सीट्रीपल आयटी’ (Center for Invention, Innovation, Incubation and Training) मंजूर झाले असून, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने यासाठी 191 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. 23 मार्च 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी ‘सीट्रीपल आयटी’च्या स्थापनेची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यांत ही घोषणा प्रत्यक्षात उतरली असून, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे. या प्रशिक्षण केंद्रात दरवर्षी सुमारे 7 हजार युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या 191 कोटींपैकी 162.62 कोटी रुपये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीकडून दिले जाणार असून, उर्वरित रक्कम राज्य शासन आणि नांदेड जिल्हा प्रशासन उचलणार आहे. या केंद्रामुळे नांदेड जिल्ह्यात उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच तयार होईल. यासोबतच स्थानिक युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
या ‘सीट्रीपल आयटी’च्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांतील प्रशिक्षण खर्च टाटा टेक्नॉलॉजी उचलणार असून त्यानंतर खर्चाची विभागणी टाटा टेक्नॉलॉजी व जिल्हा प्रशासनाकडून समप्रमाणात केली जाणार आहे.
नांदेडमध्ये अशा प्रकारचा केंद्र उभारण्याचा निर्णय ही जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल ठरणार आहे. अजित पवार यांच्या जलद निर्णयक्षम कार्यशैलीमुळे नांदेड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान आणि आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकनेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे..#news #Nanded

