नांदेड : जिल्ह्यातील एक संवेदनशील सामाजिक राजकारणी अशी प्रतिमा निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष हरिहर भोसरीकर यांच्या निधनाची बातमी धक्का देणारी ठरली . त्याचे आणि आमचे पारिवारिक संबंध राहिलेले आहेत. पक्षीय राजकारणात ते अनेक वेळा आमच्या विरोधात असले तरी माणूस म्हणून आणि वैचारिक दृष्ट्या एका मित्रासारखे ते कायम राहिले. जिल्हा परिषदेतही आम्ही एकत्रित रित्या काम केले होते. अगदी सुरुवातीला आम्ही दोघेही काँग्रेस पक्षात होतो परंतु कालांतराने हरिहरराव भोसीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि मग ते कधी आमच्या विरोधात तर कधी आमच्या सोबत अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली. केवळ राजकारणापुरता विरोध सोडला तर त्यांनी मित्र म्हणून आणि माणूस म्हणून नेहमीच अत्यंत सहकार्याची भूमिका पार पडली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग तीन वेळा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कामकाज पाहिलेले आहे . नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात हरीहरराव भोसीकर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती . बँकेचे जिल्हाध्यक्ष मोहराव पाटील टाकळीकर, माजी खासदार तथा बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबत त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. उपाध्यक्ष पदावर हॅट्रिक मारणारे ते नांदेड जिल्ह्यातील एकमेव नेते ठरले. गेल्या ३५ वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची स्वतंत्र अशी छाप होती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष , सभापती म्हणूनही त्यांनी उत्तमरीत्या काम केले.
35 वर्षाहून अधिक काळ सहकार क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय असे राहिले आहे. सन 1982 मध्ये खरेदी विक्री संघ कंधारच्या संचालक पदी ते विराजमान झाले. 1985 ते 97 सलग बारा वर्षे त्या संघाचे चेअरमन होते. जिल्हा खरेदी विक्री संघाचे 20 वर्ष संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री मा.ना.श्री अजितदादा पवार यांनी हरिहरराव यांना गृह वित्त महामंडळ संस्थेवर अध्यक्ष म्हणून निवड केली होती. गेली 25 वर्षापासून महाराष्ट्र राज्य गृह वित्त मंडळाचे ते संचालक म्हणून काम पाहत होते. या संस्थेचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन तसेच महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय या सहकार क्षेत्रातील संस्थेवरील ते संचालक होते . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एक सामाजिक परंतु संवेदनशील मनाचे राजकारणी म्हणून हरिहरराव भोसीकर यांना नांदेड जिल्हा नेहमीच आठवण करत राहील. नांदेडच्या राजकारणात त्यांची सतत उणीव भासत राहील अशी भावनिक प्रतिक्रिया देत दिवंगत नेते हरिहरराव भोसीकर यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
#भावपुर्ण #श्रध्दांजली

