जगातील सर्वश्रेष्ठ महान स्त्री राज्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या कर्तबगार रणरागिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्याचे त्रिशताब्दी जन्म वर्षे म्हणून यावर्षी साजरे केले जाणार आहे.
लोकमाता अहिल्याबाई होळकर ह्या सत्वशील,प्रामाणिक,निगर्वी व कणखर नेतृत्वाच्या कर्तबगार रणरागिणी व मानवतावादी थोर स्त्रीरत्न होत्या.
त्यांनी मानवता वादातून केलेलं कार्य आजतागायत जसेच्या तसे टिकून आहे. प्रजेच्या कल्याणा साठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्या तत्पर राहत असत.म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी आपण करुन घेणार आहोत….
त्यांच्या राज्यातील प्रजा नेहमी सुखी असे,राज्याच्या काही भागात चोर,
दरोडेखोर,लूटारु यांचा उपद्रव वाढत होता,काही टोळ्यांनी धुमाकूळ ही घातला होता,त्याचा बीमोड करण्यासाठी लोकमाता अहिल्याबाईंनी
गावोगावच्या प्रमुख मंडळीना बोलावून विशाल दरबार भरविला. माझ्या राज्यातील रयतेला होणारा चोर व दरोडेखोरांचा त्रास जो वीर दूर करील त्यांच्याशी मी माझ्या एकुलत्या एक मुलीचा विवाह सर्वांसमक्ष करून देईल.अशी घोषणा भर दरबारात केली.आणि सर्वत्र भयाण शांतता पसरली. यशवंतराव फणसे हा वीर ताठ मानेने उभा राहिला. त्यांनी सर्व चोर व दरोडेखोरांचे अत्यंत निर्दयतेने पारिपत्य केले.व विजयश्री खेचून आणली. दिलेल्या वचनानुसार राजमाता अहिल्याबाईंनी मुक्ताबाईचा विवाह यशवंतराव फणसेशी लावून दिला.त्या शब्द मोडणाऱ्या नसून पाळणाऱ्या होत्या. त्यामुळेच त्या आज न्याय देवता म्हणून त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे.समाजाला सामाजिक न्याय देण्यासाठी आयुष्यभर परिश्रम करणा-या त्या प्रेरणादायी महिला आहेत.मी महिला म्हणून
कोणतेच कारण त्या पुढे येऊ दिल्या नाहीत.त्यामुळेच त्या आदर्श राजमाता झाल्या.अहिल्यादेवी होळकरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी 31 मे 1725 रोजी झाला.त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई व वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते. त्यांचे आई-वडील अतिशय सात्विक, सद्भावी आणि आचरण शील मनोवृत्तीचे होते.चौंडी गावची पाटीलकी त्यांच्याकडे होती.
घरची परिस्थिती साधारणच होती.
लहानपणापासूनच त्या चुणचुणीत व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होत्या. त्या धाडसी व निगर्वी असल्यामुळे सबंध हिंदुस्थानच्या राजमाता, लोकमाता,लोक देवता,तत्त्वज्ञानी, महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी या नावाने अजरामर झाल्या, त्यांचा विवाह खंडेराव होळकरांशी झाला. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये होती.
बालपणापासूनच घोडेस्वारी करणे, धर्मावर श्रद्धा ठेवून वर्तणूक करणे, अन्यायाच्या विरोधात पर्वतासारखे उभे राहणे.असे कार्य करीत असत.
मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राजे मल्हारराव होळकरांनी अहोरात्र परिश्रम घेतले.आणि तितक्याच शक्तीने मराठी साम्राज्याचा विस्तार केला. 1761 च्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. सर्वत्र अशांतता पसरली होती.मराठी शाहीची अवस्था अतिशय बिकट झाली होती. बिघडलेली घडी व्यवस्थित करण्यासाठी राजे मल्हारराव होळकरांनी माळव्यापासून सुरुवात केली.एकदा मल्हार होळकर पुण्यास जाताना जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी थांबले होते. तिथे त्यांनी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या छोट्या अहिल्याबाईना प्रत्यक्ष पाहिले व त्यांच्या मुलाला खंडोजीची पत्नी म्हणून स्वीकारले.त्या काळात स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांनी अहिल्याबाईला शिक्षण दिले.त्यांना राज्यकारभार आणि युद्धनीतीचे धडे दिले.त्यांची सासू गौतमाबाईनी त्यांच्या घराण्याचे रीतीरिवाज शिकवले. त्यामुळे त्या आर्थिक व्यवहारात पारंगत झाल्या.आता इंदूरच्या राजधानीला शोभेल असे महान कार्य अहिल्यादेवीच्या हातून घडू लागले. सासरे राजे मल्हारराव होळकर यांनी आपल्या कर्तबगारीने इंदूर हे संस्थांन नावा रूपाला आणले.खंडेराव होळकर ही शूर होते.परंतु ते थोडे व्यसनी होते.तरीही अहिल्याबाईंनी त्यांचा अनादर कधीच केला नाही. पतीव्रता धर्माचे पालन करून त्यांनी आपल्या पतीला सदैव प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही राजकारणात लक्ष घातले.
त्यामुळे घरातील सर्व मंडळी आनंदीत होती.अहिल्याबाईच्या प्रेरणेने खंडेराव ही युद्धात उतरले एका बाजूला अहिल्याबाई होळकर,राजे मल्हारराव होळकर,व खंडेराव होळकर यांची तर दुसऱ्या बाजूला सुरजमल जाट यांच्याशी धुमश्चक्री सुरू झाली. कोणीही शरण येण्यास तयार नव्हते. अखेर 24 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या लढाईत खंडेराव धारातीर्थी पडले.हिंदू धर्मानुसार पती निधनानंतर पत्नीला सती जाण्याची त्या काळात पद्धत होती. पुत्रवियोग सहन करून राजे मल्हारराव होळकरांनी त्यांना सती जाऊ दिले नाही.मराठा साम्राज्याचा विस्तारासाठी खरोखरच पुढील काळात त्यांची बुद्धी,शक्ती,युक्ती सर्वच नावा रूपाला आली.राजमाता अहिल्याबाई होळकरांनी मानवतावादी कार्यासाठी स्वतःचे पूर्ण आयुष्य झिजविले.लढाई लढताना मी स्त्री आहे, असे थोडे ही कारण पुढे येऊ दिले नाही. राघोबा दादा सारख्यांना शूर व्यक्तींना पत्र पाठवून वठणीवर आणले.
“माझी तलवार चालेल, तुमचा युद्धात पराभव झाला,तर मला कोणी नाव ठेवणार नाही. सर्व जग तुम्हाला हसेल” असे कोड्यात पत्र पाठवून राघोबा दादाला पळता भुई थोडी केली.शेवटपर्यंत अहिल्याबाईनी चौंडी या जन्म गावाला विसरल्या नाहीत.
अनेक ठिकाणी त्यांनी अन्नछत्रे उभारले. हिंदूंच्या मंदिराबरोबर मुस्लिम बांधवांच्याही मशिदीचे जीर्णद्वार केले.अनेक नद्यावर घाट बांधले,पवित्र तीर्थस्थळी केदारनाथ,रामेश्वर, सोमनाथ, जगन्नाथ पुरी येथे पक्के रस्ते बांधले. त्यांच्या कार्याची माहिती सर्वत्र पसरली.म्हणून रयत त्यांना अहिल्यादेवी म्हणू लागली.
त्यांनी आपल्या विचाराला कृतीची जोड दिली.त्यांनी गरिबांना मदत केली, ठिकठिकाणी पाणपोया उभारल्या, वृक्षारोपण केले.
अन्यायाच्या विरोधात जाऊन जे खरे आहे.त्यांची पाठराखण केली. म्हणून त्यांना न्यायदेवता ही म्हणतात. नर्मदा नदीच्या काठी महेश्वर येथे राजधानी वसवली, तेथील हातमाग उद्योगाला चालना देऊन महेश्वर साडी प्रसिद्ध केली, साहित्यिक, कलाकार, शिल्पकार, कारागीर सर्व जण महेश्वर येथे हळूहळू येऊ लागले. वस्त्रोद्योग सुरू झाला. मजूर कारागीर,
विणकर यांना मोफत घरे वाटली. त्यामुळे वैभवशाली साम्राज्याची राजधानी करून ते समृद्ध व संपन्न बनविले. हे ठिकाण अतिशय प्रेक्षणीय, रमनीय, मनमोहक असल्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत होते .या ठिकाणी वेगवेगळ्या राजाचे वकील, मुत्सद्दी सरदार, उच्चपदस्थ अधिकारी यांची ये-जा असायची.व्यापारी, धनवान या ठिकाणी येत होते. त्यामुळे महेश्वराचे महत्त्व फार वाढले. अहिल्यामातेचे जीवन हे अत्यंत साधे व सरळ होते. त्यामुळे लोकांना ते स्फूर्तीदायक व मार्गदर्शक ठरले.शेतकऱ्यांना सारा माफ केला.धर्म आणि संस्कृती यांची सांगड घातली. स्वतः साध्वीचे जीवन जगल्या.पती, सासरे व मुलगा यांच्या निधनानंतर ही मनाचा तोल न ढसाळता अनेक वर्षे सातत्याने त्या शासनकर्त्या म्हणून कार्यरत राहिल्या,
त्यांच्या काळात इंदूरचा राजवाडा, चांदवडचा रंग महाल,किल्ले महेश्वर,पंढरपूर येथील होळकर वाडा,लासलगाव येथील अहिल्यादेवीचा किल्ला, कोंडाईबाई घाट,अनेक धर्मशाळा कुशावर्त,विहिरी,बारव बांधण्यात आल्या. तसेच सोमनाथाचे मंदिर ही उभारण्यात आले.त्यामुळेच त्या लोकमाता ठरल्या.जगाच्या कानाकोपऱ्यातील एकमेव महान स्त्रीरत्न आहेत. त्यांची तुलना अनेक इतिहासकारांनी राणी एलिझाबेथ यांच्याशी केली. अहिल्यामातेच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेऊन अनेक सामाजिक संस्थानांनी व शासनकर्त्यांनी त्यांना वेगवेगळ्या पदव्या प्रदान केलेल्या आहेत. त्यात इंदूरच्या विमानतळाचे नाव देवी अहिल्या इंटरनॅशनल एअरपोर्ट इंदूर असे ठेवण्यात आले आहे. यावरून त्यांच्या कार्याचा आलेख चढता आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर शैक्षणिक कार्यात केलेल्या एकमेवाद्वितीय भूमिकेमुळे इंदूर विद्यापीठास देवी अहिल्या विश्वविद्यालय असे नाव दिले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असे ठेवून त्यांच्या कार्याला सलाम केला आहे .
थोड्याच दिवसांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असे केले आहे.अहिल्यादेवीच्या सन्मानाप्रित्यर्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 रोजी टपाल तिकीट जारी केले. त्यामुळे सर्व धर्मियांनी सुद्धा त्यांच्या कार्याचा जय जय कार केला आहे. जनमाणसामध्ये अढळ स्थान निर्माण करणाऱ्या त्या लोकमाता आहेत.बऱ्याच ठिकाणी घाट आणि मंदिरे बांधल्यामुळे अनेक लोक भक्ती मार्गाकडे वळले आहेत. आता आपण त्यांच्या चौंडी या गावांमध्ये झालेल्या विकासाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ ..1995 रोजी चौंडीच्या विकासाला सुरुवात झाली. तेथील महेश्वर राजवाडा आणि घाटाच्या शिल्पाच्या पार्श्वभूमीवर त्या शिवलिंग हातात घेऊन उभारलेला भव्य पुतळा त्यांचा आहे. बारा राशीचे शिल्प उद्यान काढलेले आहे. कौलारू गढी, भुयारी मार्ग,आड,सदर कोठी, स्वयंपाकघर, देवघर, तळघर, तुळशीचे वृंदावन आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दाखवणारे शिल्पसृष्टी,
सर्व यात्रेकरूंचे,पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या ठिकाणी सीना नदीचे मनमोहक दर्शन घडते. त्याच परिसरामध्ये घोडे,हत्ती यांचे शिल्पे हे पाहायला मिळतात, त्याच परिसरामध्ये देखण्या कमाणी उभारलेल्या आहेत. पंढरीच्या विठ्ठल -रुक्माई च्या साक्षात मंदिरातील मूर्ती तेथे साकारलेल्या आहेत. नदीकाठी माणकोजी शिंदे आणि पराक्रमी व्यक्तीच्या समाधी तेथेच आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला तीनशे वर्षांपूर्वी असलेले चौंडीचे ऐतिहासिक महती,नैसर्गिक सौंदर्य लक्षात येते. म्हणून ही जन्मभूमी राजमाता अहिल्यादेवीची पवित्र,पावन, स्फूर्तीदायी,प्रेरणादायी झाली आहे.आज अनेक ठिकाणचे राजे, महाराजे, कर्तबगार व्यक्ती, क्रांतिकारक,समाज सुधारक, समाजसेवक. उच्चपदस्थ अधिकारी,मंत्री महोदय या पवित्र भूमीला वंदन करण्या साठी येतात. आणि मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेऊन जातात.
सध्या तेथे अनेक कामे चालू आहेत.राजमाता अहिल्यादेवीचे अंत:करण गंगा जलाहुन ही निर्मळ होते.
सर्व रयत त्यांना पोटच्या मुलासमान होती. वाईट कृत्यांचा त्यांना मनस्वी संताप येत असे.राज्यकारभार ,धर्मपरायणता, सत्कार्य हा नित्यक्रम त्यांचा चालूच होता. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना वैधव्य आले होते. तरी वृद्धकाळापर्यंतची दुःखे त्यांनी यशस्वीपणे पार केली. त्यातून शरीर थकले. अत्यंत गौरव पूर्ण परोपकारी जीवनाचा अंत: होणार भारताच्या गौरवशाली इतिहासाचे एक सोनेरी पान गळणार होते.
तो दिवस उजाडला. 13 ऑगस्ट 1795 चा दिवस ,श्रावण महिना होता. दानधर्म करून सर्व विधी पूर्ण केल्या.थोड्याच वेळात संपूर्ण रयतेला दुःखाच्या प्रचंड महासागरात लोटून अहिल्यामाता अनंतात विलीन झाल्या.म्हणून
तरुणांनी अहिल्याबाई होळकरांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी जिद्दीने उभे राहावे,सर्व समानता बाळगावी,मी पणाची झालर काढून टाकावी. तरुण मुलींनी अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घ्यावा.प्राचीनता आणि आधुनिकता यांची सांगड घालून समाजात वैभव निर्माण करण्या साठी काय करता येईल ?याची शहानिशा करावी व पवित्र कार्य हाती घ्यावे.
त्या आदर्श राज्यकर्त्या बनण्यासाठी काय काय कार्य केल्या. त्यांची माहिती घ्यावी तेव्हाच अहिल्यामातेच्या त्रिशताब्दी जयंतीचे सार्थक झाले,
असे आपणाला म्हणता येईल.
विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड यांच्या वतीने त्यांच्या तीनशे व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन..प्रा.विठ्ठल गणपतराव बरसमवाड. सदस्य : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ. अहिल्यानगर

