नांदेड –
कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चालविलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत आता जवळा येथील चिमुकले सहभागी झाले असून ही मोहीम संपेपर्यंत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी दिली. यावेळी हैदरसाब शेख, नितीन झिंझाडे, चांदु गोडबोले, श्रीनाथ गोडबोले, सिध्दार्थ पंडित, पांडुरंग गच्चे, पवन गोडबोले, मारोती चक्रधर, बालाजी झिंझाडे,शुभम गच्चे, भैया भिमराव गोडबोले, आनंद गोडबोले यांची उपस्थिती होती. यावेळी आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले व मुख्याध्यापक ढवळे यांनी मार्गदर्शन केले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, एएनएम, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या समुहाकडून गावागावांतील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याबाबत चौकशी केली जाणार आहे. ही मोहीम १५ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती २५ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. सद्यपरिस्थितीत शाळा बंद असून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण चालू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांच्यासह सहशिक्षक संतोष घटकार आणि संतोष अंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील चिमुकल्यांनी पुढाकार घेतला आहे.
या जनजागृती मोहिमेत विविध वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले असून ते घरोघरी शाळेने काढलेल्या भित्तीपत्रकाचे वाटप करणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने तयार केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही प्रतिज्ञा प्रत्येक घरातील कुटुंब प्रमुखाकडून वदवून घेतली जाणार आहे.हा आरोग्य शिक्षणाचाच एक भाग असून सदरील मोहिमेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असून जनतेने पूर्ण सहकार्य करावे असा संदेश देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या जनजागृती अभियानात सूरज पंडित, चंद्रकांत गोडबोले, अनुष्का झिंझाडे, कावेरी गच्चे, साक्षी गच्चे, श्रुती मठपती, विद्या गोडबोले, अर्चना गोडबोले, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, अक्षरा शिखरे या विद्यार्थी – विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला आहे.