(बिलोली येथील उपक्रमशील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ पत्रकार शंकर पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख देत आहोत. -संपादक)
बिलोली येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पण कर्तृत्वाने सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात ठसा उमटवलेलं नाव म्हणजे प्रा. शंकर पवार. शिक्षक, पत्रकार, समुपदेशक, मार्गदर्शक आणि माणूस घडवणारा समाजशील कार्यकर्ता या सर्व भूमिकांचा संगम असलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्षातून घडलेलं प्रेरणादायी विद्यापीठच म्हणावं लागेल.
पवार सरांच्या आयुष्याची सुरुवात आर्थिक दुर्बलतेच्या काठावर झाली. शिक्षणाची ओढ, प्रचंड स्मरणशक्ती आणि शिकण्याची जिद्द पाहून तत्कालीन प्राचार्य कै. गोविंदराव गोपछडे सरांनी त्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित केला. त्यांनी त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी वसतिगृहात मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या आधारामुळेच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नांदेड येथे राहून विविध ठिकाणी कष्ट करून ते आपला शिक्षण प्रवास पुढे नेत राहिले. त्या काळात त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांचे चुलते राम पवार हेआपुलकीने भागवत असत. विद्यार्थी दशेतच कष्ट हेच जीवनाचं चलन मानून त्यांनी दीपक लॉज, बंजारा बार, सराफा दुकान आणि रायकंठवार यांच्या दुकानात काम केले. कुठे झाडलोट, कुठे हिशोब, कुठे सामानाची ने–आण — पडेल ते काम करून त्यांनी अनेक प्राध्यापक आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा पाहून प्राचार्य राम जाधव सरांनी पुढाकार घेऊन त्यांच्या करिअरला दिशा दिली. गंगाधरराव सब्बनवार यांच्याशी बोलणी करून त्यांनी २२ ऑगस्ट १९८७ रोजी गंगाबाई सब्बनवार प्रशालेत लिपिक म्हणून नियुक्ती मिळवून दिली. त्याच काळात जाधव सरांची भाची कोंडाबाई गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह जुळवून त्यांचे कौटुंबिक स्थैर्यही मजबूत केले. शाळा अनुदानित झाल्यावर १९९२ मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढे संस्थेला ज्युनिअर कॉलेज मंजूर झाल्यावर त्यांनी एम.ए. पूर्ण करून प्राध्यापक पदावर काम करण्याची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली. मुख्याध्यापक पदाची ऑफर मिळूनही त्यांनी वैयक्तिक कारणास्तव ती विनम्रपणे नाकारली. लिपिक ते प्राध्यापक असा प्रवास करणारे ते संस्थेतील पहिले लिपिक–कम–शिक्षक ठरले. स्वतःच्या संघर्षाची जाणीव ठेवून त्यांनी आयुष्यभर इतरांना उभे करण्याचा ध्यास घेतला. त्यांनी भाऊ सुभाष पवार यांचे सातवीत थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करून बारावी उत्तीर्ण करवून घेतले आणि मंत्रालयात पाठपुरावा करून त्यांना एमपीडब्लू (आरोग्य सेवक) म्हणून नोकरी मिळवून दिली. बहिण अर्चना चव्हाण यांना अंगणवाडी सेविकापद मिळवून दिले.नातेवाईक, मित्र आणि परिचितांमधील ९ पेक्षा अधिक जणांना त्यांनी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यात शिवकांता उमरे (अंगणवाडी सेविका), महेश कोचारे (शिक्षक), आणि इतर अनेक जणांचा समावेश आहे. शिवगंगा जमलवाड या होतकरू विद्यार्थिनीस त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेत बी.ए., एम.ए., बी.एड. आणि संगणक शिक्षण पूर्ण करून दिले. ती लवकरच शासकीय सेवेत रुजू होत आहे, हीच त्यांच्या मार्गदर्शनाची खरी पावती आहे. पवार सरांनी मुलाचे लग्नही अत्यंत साध्या पद्धतीने, कोणताही बडेजाव न करता पार पाडले आणि पुढे सून वेदिका हिला मराठी, इतिहास, अर्थशास्त्र आणि इंग्रजी या चार विषयांत एम.ए. व बी.एड. पूर्ण करवून आत्मविश्वासाने उभे केले.
सामाजिक कार्यातही त्यांचा हातखंडा आहे. व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होत चाललेल्या ४ कुटुंब प्रमुखांना त्यांनी व्यसनमुक्त करून त्यांच्या संसारात आनंद आणि स्थैर्य परत आणले. देव, कर्मकांड आणि दिखाव्यापासून नेहमी दूर राहणारे पवार सर म्हणतात , “मी माणसातच देव पाहतो.” या विचाराला कृतीची जोड देत त्यांनी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देहदानाचे पत्र दिले आहे, जेणेकरून मृत्यूनंतरही त्यांचा देह वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी पडावा.
१९९२ पासून पत्रकारिता सुरू करून त्यांनी ज्येष्ठ पञकार संजीव कुलकर्णी व संपादक कृष्णा शेवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा, लोकमत, सकाळ, लोकसत्ता, देशोन्नती, श्रमिक एकजुट, प्रजावाणी अशा अनेक वर्तमानपत्रांत लेखन केले. त्यांचे हस्ताक्षर अत्यंत सुंदर व देखणे असून शोध पत्रकारिताचे लिखाण त्यांनी अनेक वेळा केलेले आहे. पीडित शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लेखणी नेहमी धारदार ठेवली.
शिक्षक संघटनांमध्येही आमदार सतीश चव्हाण आणि आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली ते सक्रिय राहिले. आजही साध्या खापराच्या घरात राहून बंगला बांधण्यापेक्षा माणसे बांधण्याला व त्यांना उभा करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आणि त्यातच समाधान मानले. पवार सरांचे अनेक माजी विद्यार्थी म्हणतात की,“सर, तुम्ही आमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात.” “तुमच्या लेखणीने अन्यायाला वाचा फोडली.” “तुम्ही संपत्ती नाही, माणसे कमावलीत.” वरील वाक्य अनेकांच्या तोंडून मी ऐकले आहे. प्रा. शंकर पवार यांना दीर्घ, निरोगी, आनंदी आणि समाजकार्यास समर्पित आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!
–दादाराव आगलावे
पञकार, मुखेड.
-9422874747.

