प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे पहिल्या टप्प्यात 36 वन कर्मचाऱ्यांना लसीकरण
#गोंदिया – रात्रंदिवस वन्यप्राणी व जंगलालगतच्या गावामध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच गावातील कुत्र्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय जिल्हा आरोग्य विभाग व वन विभागाने संयुक्तरित्या घेतला. लसीकरणाचा निर्णय घेऊन त्याची अमलंबजावणी करणारा गोंदिया जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असून पहिल्या टप्प्यांत जवळील खमारी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३६ वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले.
कोल्हे, वटवाघुळ, माकड आणि कधीकधी श्वान यांच्या सतत संपर्क येण्याची शक्यता असते. रेबीज हा एक जीवघेणा विषाणूजन्य आजार आहे, जो लक्षणे दिसू लागल्यानंतर जवळजवळ नेहमीच प्राणघातक ठरतो, परंतु लसीकरणाद्वारे तो टाळता येऊ शकतो. रेबीजचा मानवामधील उष्मायन कालावधी (incubation period) सामान्यतः १ ते ३ महिने असतो. तथापि, हा कालावधी काही दिवसांपासून ते अगदी एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये ६-८ वर्षांपर्यंत असू शकतो. एकदा रेबीजची लक्षणे दिसू लागली की, हा आजार जवळजवळ १०० टक्के प्राणघातक असतो आणि त्यावर कोणताही ठोस उपचार नाही. म्हणूनच, कोणत्याही संशयित प्राणी चावल्यानंतर, लक्षणे दिसण्याची वाट न पाहता त्वरित वैद्यकीय मदत घेणे आणि पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) उपचार सुरू करणे अत्यावश्यक असते त्या अनुषगांने हा लसीकरणाचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.अभिजित गोल्हार यांनी दिली.
रेबीज लस ही वन कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी एक अत्यावश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्यामुळे जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या कल्पक विचारातून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी जिल्ह्यातील वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण मोहिमेचे नियोजन पूर्ण केले असून आहे. दि.19 डिसेबंर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी 36 वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी याप्रसंगी केले आहे. लसीकरण ओपीडी आरोग्य सेविका माधुरी टेंभुरकर व सुर्यकांता मडावी, आरोग्य सहायिका ललिता पटले, आरोग्य सहायक गजेंद्र तावाडे यांच्या सहाय्याने करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण मोहीम शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी वन विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सामाजिक वनिकरण गोंदिया विभागाचे विभागीय वन अधिकारी तुषार ढमढेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरजंन अग्रवाल, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन मेश्राम, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, आयईसी विभागाचे प्रशांत खरात, साथरोग तज्ज्ञ डॉ. तनया चौधरी, सहायक वनसंरक्षक विजय धांडे व सचिन डोंगरवार, प्रादेशिक वन परीक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, आमगाव वन परीक्षेत्र अधिकारी सचिन्द्र सोनेवणे उपस्थित होते.
वन कर्मचाऱ्यांसाठी लसीचे महत्त्व-
उच्च धोका : सामान्य लोकांपेक्षा जंगलात काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना वन्य प्राण्यांच्या संपर्कात येण्याचा धोका खूप जास्त असतो. हे प्राणी रेबीजचे मुख्य वाहक असू शकतात.
प्राणघातक आजारापासून संरक्षण : रेबीज हा मानवी मध्यवर्ती मज्जासंस्थेवर हल्ला करणारा गंभीर आजार आहे, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. लक्षणे दिसण्यापूर्वी दिलेली लस प्रभावी संरक्षण प्रदान करते.
प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस : वन कर्मचाऱ्यांसारख्या उच्च-धोका असलेल्या व्यक्तींसाठी, कामावर रुजू होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लस (PrEP) घेण्याची शिफारस केली जाते. यामुळे शरीरात विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
आपत्कालीन परिस्थितीत मदत : जरी आधी लस घेतली असली तरी, चावा किंवा ओरखडा झाल्यास वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते.परंतु, पूर्व-लसीकरणामुळे उपचारांचा (पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस – PEP) कालावधी कमी होतो आणि गुंतागुंत टळते.
Maha Forest #ForestDepartment #rabiesprevention #vaccination #PublicHealthDepartment #Gondia

