नांदेड, दि. 18 जानेवारी :- तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथे आयोजित “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा आज लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी घेतला.
जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार सर्वश्री राजेश पवार व जितेश अंतापूरकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंद दी चादर कार्यक्रमाचे समन्वयक तथा कार्यकारी अधिकारी जगदीश सकवान, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव वारकरी संप्रदायांचे योगदान अविस्मरणीय ठरावे, यासाठी हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणारा व लोकांच्या स्मरणात राहणारा ठरावा, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक कार्यक्रम होत असून नांदेडचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी देशभरातून भाविक येणार असून त्यांच्यासाठी 6 नियमित व 5 विशेष विमानसेवा तसेच 5 विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळ व रेल्वेस्थानकावर भाविकांना माहितीपत्रक देणे, गुरुद्वारा व कार्यक्रमस्थळाकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करणे, स्वागतासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करणे तसेच मान्यवरांसाठी पासेसची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. कार्यक्रमातील सर्व सुविधा विनामूल्य असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांनी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाची माहिती देत राज्यात हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम नागपूर, नांदेड व मुंबई येथे आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे कार्यक्रम झाला असून 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत-महंत उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार ठरणार आहे. 52 एकरांच्या परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून भाविकांच्या सोयीसाठी महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स व आरोग्य शिबिरे उभारली जात आहेत. पार्किंग व वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला असून कोणत्याही भाविकाची गैरसोय होणार नाही, असे त्यांनी सांगितले. सर्व नांदेडकरांनी व भाविकांनी सहकुटुंब या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे व माजी आमदार अमर राजूरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आवश्यक सूचना केल्या. या बैठकीस विविध लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी व कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
000000#हिंददीचादर
#गुरुतेगबहादूर
#शहीदीसमागम
#350thShaheedi
#GuruTeghBahadurJi
#नांदेड
#ShahidiSamagamAshok Chavan
Maharashtra DGIPR
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
DDSahyadri
Doordarshan National (DD1)
Nanded Police
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
All India Radio News
Hind Di Chadar

