सामाजिक ऐक्य, सेवा व प्रेरणेचा ऐतिहासिक सोहळा ; प्रत्येकाने जास्तीत जास्त योगदान देण्याचे आवाहन
नांदेड, दि. १७ जानेवारी :”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान,तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल उभारून भाविकांना सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले. हे स्टॉल दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद, अल्पोपहार, माहिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच २४ जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी दोन दिवसांत ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा शाळा, महाविद्यालये व सामाजिक माध्यमांतून व्यापक प्रचार करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या बाहेर, पार्किंग स्थळी, स्टॉलसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वाहने व संबंधित व्यक्तींना प्रवेश पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सेवा आणि प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा व “हिंद-दी-चादर” शहीदी समागम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या एकूण नियोजनाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी उपस्थितांना दिली.
00000#गुरुतेगबहादूर
#शहीदीसमागम
#350thShaheedi
#GuruTeghBahadurJi
#hinddichadar
#नांदेड
#shahidisamagam
#guruteghbahadursahibjiMaharashtra DGIPR
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
DDSahyadri
Doordarshan National (DD1)
Nanded Police
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
All India Radio News
Hind Di Chadar

