मुखेड: (दादाराव आगलावे)
किशोरवयीन बालकांत होणारे शारीरिक व मानसिक बदल समजून घेतले तर बालकाची वाढ निकोप व्हायला मदत होते. या काळात होणार्या बदलांमुळे ही बालके बुजरी , चिडचिडी होऊ नयेत. उद्याचे ते सक्षम नागरिक होण्यासाठी त्यांना मानसिक व शारीरिक आरोग्याची गरज असते. त्यांना पालकांनी समजून घ्यायला हवे. या काळात पालकांकडून भक्कम मानसिक आधाराची आवश्यकता असते. जे पालक आपल्या बालकांना समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करतात व आपल्या पाल्यांना सक्षमपणे उभे करतात ते सुजाण पालक असतात.
फास्टफुड व जंकफुड पेक्षा संतुलित व सकस आहाराकडे बालकांना वळवणे महत्वपूर्ण आहे. बालकांच्या जडणघडणीवर योग्य लक्ष दिले तर कौटुंबिक वातावरण चांगले राहायला मदत होते. पालक व बालकात सुसंवादाचे वातावरण असले पाहिजे. याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत सांगवी बेनक येथे जि.प.शाळेने आयोजित केलेल्या ‘माता पालक मेळाव्या’त मार्गदर्शन करताना डाॅ. सौ. ज्योती अमित मस्कले यांनी व्यक्त केले.
जि.प. शाळेत ‘माता पालक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी सांगवीच्या सरपंच मीनाताई जोंधळे होत्या. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून पालक मेळाव्याची सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक तथा साहित्यिक एकनाथ डुमणे यांनी ‘माता पालक मेळावा’ आजोजना मागील भूमिका विषद करताना बालक पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवादाचे वातावरण राहिल्यास गावाची उद्याची पिढी सक्षम व निकोप तयार व्हायला मदत होते.
पालकांनी शाळेने प्रंसगोपात आयोजित केलेल्या पालक सभा व मेळाव्यांमध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. रात्री सात ते नऊ टी.व्ही.बंद ठेवावा. विद्यार्थ्यांना आवडी-निवडीस वाव द्यावा . कला गुणांचा कल लक्षात घेऊन उत्तेजन दिल्यास कौशल्य वाढीस मदत होते. विद्यार्थ्यांचा कल व मर्यादा लक्षात घेतल्या तर अध्ययन सुकर व सुलभ होऊन गतिमान व्हायला मदत होते. हे विषद केले. उपस्थितांना पूनम मधुकर कांबळे यांनी बचत गट सक्षमीकरणाची महत्ती सांगत आर्थिक सबलतेचे महत्व पटवून दिले.
अनेक माता पालक या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. मेळावा आयोजन व यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिकार्जून क्यादापुरे व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. सहशिक्षक सुचिता कुलकर्णी, अंजना महाराज, बालाजी कटाळे, ओंकार मठपती , लक्ष्मण परगे यांनी कल्पकतेने यशस्वीपणे मेळावा पार पाडला. याकामी माधव तेलंग व रत्नमाला तेलंग यांनी मदत केली. एकमेकास तीळ-गुळ देऊन मेळाव्याची सांगता झाली. यावेळी असंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

