‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. २० जानेवारी:- ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने, काटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
नांदेड येथे होणाऱ्या या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, विभागीय माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, कार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणी, स्वच्छ व पर्याप्त शौचालय व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी. कार्यक्रमाची प्रचार–प्रसिद्धी व्यापक प्रमाणात करण्यात यावी. स्थानिक स्तरावर होणाऱ्या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आवश्यक असून सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व मुद्रित माध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी शाळा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करावी. तसेच सिनेमागृहांमध्ये भक्तिगीत प्रसारित करणे, प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग्ज लावून कार्यक्रमाचा संदेश पोहोचवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यक्रमास महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना सहज सहभागी होता यावे, यासाठी पार्किंग क्षेत्रापासून कार्यक्रमस्थळापर्यंत योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
‘हिंद दी चादर’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी असरजन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५२ एकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मंत्री, संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.कार्यक्रमाच्या अनुषंगाने मैदानावर युद्धपातळीवर काम सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, मैदानालगत दोन भव्य टेन्ट सिटी उभारण्यात आल्या आहेत. एका टेन्ट सिटीत सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता असून, यासोबतच शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमस्थळी स्वच्छता, स्वयंसेवक व्यवस्था, विविध प्रकारचे मोफत सेवा स्टॉल्स, तसेच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५० हजार नेत्र तपासणी व विशेष कर्करोग तपासणी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
भाविकांसाठी भव्य लंगर व्यवस्था करण्यात आली असून, याचा लाभ सुमारे १० लाख भाविकांना घेता येणार आहे. निवास, भोजन, वाहतूक, आरोग्य व सुरक्षा याबाबत सर्व विभाग समन्वयाने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत करण्यात आलेल्या व पुढील कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्रचार–प्रसिद्धी उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.
00000#हिंददीचादर
#गुरुतेगबहादूर
#शहीदीसमागम
#350thShaheedi
#GuruTeghBahadurJi
#hinddichadar
#shahidisamagam
#guruteghbahadursahibji
#नांदेडMadhuri Misal
Maharashtra DGIPR
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
DDSahyadri
Doordarshan National (DD1)
Nanded Police
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
All India Radio News
Hind Di Chadar

