विद्यापीठातील अधिकारी -कर्मचार्‍यांच्या आंदोलनास काँग्रेसचा पाठिंबा- आ. अमरनाथ राजुरकर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची शिष्टमंडळास भेट घालून देणार


नांदेड दि. 29 –

राज्यातील अकृषिक विद्यापीठात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपात महाआघाडीतील जरी प्रमुख घटक पक्ष असला तरीही काँग्रेस पक्षाचा या संपात पाठिंबा असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे महानगराध्यक्ष तथा पक्षाचे विधानपरिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर यांनी आज (दि. 29) रोजी केले. त्यासोबतच येणार्‍या दोन दिवसात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची संपकरी पदाधिकारी यांच्या सोबत चर्चेसाठी भेट घालून देवू असेही आश्वासन यावेळी दिले.
स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी कृती समितीच्या वतीने विद्यापीठ ईमारती समोर सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांचा आजचा सहावा दिवस आहे. संपकरी अधिकारी-कर्मचारी यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देण्यासाठी आ. अमरनाथ राजुरकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. निलेश पावडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. महेश मगर यांची उपस्थिती होती.
यावेळी संपकरी अधिकारी-कर्मचारी यांना संबोधित करतांना आ. अमरनाथ राजुरकर म्हणाले की, सातवा वेतन आयोग लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, सर्वोच्च न्यायालयांच्या निकालानुसार मागासवर्गीय कर्मचार्‍यांना पदोन्नती देणे यासह सर्व दहा मागण्या योग्य आहेत. यातील शासनास तात्काळ जे करणे शक्य आहे. त्यांचा जी.आर. काढावा.  सध्या कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशावेळी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारिख निश्चित करुन तसा आदेश शासनानी निर्गमित करावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले
हा प्रश्न राज्यातील अधिकारी-कर्मचारी यांचा आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची लवकरच अधिकारी-कर्मचारी यांच्या कृती समितीची भेट घालून देवू असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *