कोरोना बाधितांचा संख्या कमी करण्यासाठी सर्वेक्षण व तपासण्या काटेकोर होणे अत्यावश्यक – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड दि. 23 :- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या व मृत्यूदर कमी करण्यासाठी गावनिहाय सर्वेक्षण व तपासण्या वाढविण्यात आल्या असून जनतेने तपासणीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गावपातळीवर कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी ज्यांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्यांनी काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देशही डॉ. विपीन यांनी दिले. 
होमक्वांरटाईन असल्याने त्यांनी आरोग्य सुविधाबाबत झूम मिटिंगवर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून सविस्तर आढावा घेतला.यावेळी मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी आर. के. परदेशी, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगर परिषद नगरपंचायत, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय तसेच सध्या होम क्वारंटाईन असलेल्या अधिकाऱ्यांनी या  झुमॲपद्वारे सहभाग घेतला होता.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षकांचा समावेश करुन पथके तयार करण्यात यावीत. या पथकांमार्फत गावनिहाय सर्वे करावा. या सर्वेक्षणात 50 वर्षे वयाच्या वरील व्यक्तींना ताप, सर्दी किंवा कोरोना आजाराचे सुक्ष्म लक्षणे असलेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी घ्यावीत. कोरोना बाधित आढळल्यास त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करावे. जिल्ह्यात जास्तीतजास्त तपासण्या वाढविण्याचा प्रयत्न असून त्याबाबतचा अहवाल दररोज देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तालुकास्तरावरील खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नावे रितसर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविल्यानंतर त्यांच्या सेवा उपलब्ध करुन घेता येतील. आरोग्य तपासणीतून जास्तीतजास्त लोकांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात आशा वर्कर यांना थर्मल गन व पल्स मिटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्याकडून तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर मधील सुविधांबाबत संबधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आवश्यक त्या उपाय योजना करुन कोविड  केअर सेंटरला भेटी देवून तेथील व्यवस्थेबाबत लक्ष ठेवावे. कोरोना काळात केलेल्या चुकांची गय केली जाणार नसून वेळेप्रसंगी संबंधितांवर गुन्हाही दाखल केला जाईल, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *