जागतिक टपाल दिन विशेष;………………..जीवलग पत्रास…एक पत्र!

प्रिय पोस्ट कार्ड,
वि.वि.पत्रास कारण की,आज९आॅक्टोंबर जागतिक टपाल दिन आहे,आणि १०आॅक्टोंबर हा दिवस भारतात “भारतीय टपाल दिन”म्हणून साजरा केला जातो.त्यानिम्मित तुला शुभेच्छा देत आठवणींना उजाळा देण्यासाठी हा छोटासा पत्र प्रपंच.आजच्या व्हाॅट्सअप,ईमेल च्या दुनियेत तू कुठे हरवला आहेस काय माहित?

तुझ ते पिवळधम्मक रुप,त्यावर मनातल्या हळव्या भावना,आनंद,दु:ख,अजून बरच काही जे शब्दात व्यक्त करता येत नव्हत ते निळ्या शाईने लिहितांना काळजातले आर्त शब्द तू अगदि जपून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवायचास.त्यांची ख्याली खुशाली कळवायचाच तेव्हा एक वेगळच समाधान मीळायच ते आताच्या व्हाट्सअप वर आणि ईमेल मध्ये तीळभरही भेटत नाही.

आजच्या या पिढीलामात्र तुझं आणि पोस्टमन काकांच जरासही आप्रूप नाही रे.पोस्टमन काका काॅलीनीत आले की,आम्हि लहानमंडळी त्यांच्या सायकलच्या माघे धापा टाकत धावत जायचो ते केवळ कुणाकुणाच पत्र आल ते पाहाण्यासाठी! तो निर्भोळ आनंद आजच्या पीढिला अनुभवता येणार नाही. कारण,दूरसंचारमध्ये झालेल्या क्रांतीमुळे क्षणात कुठेही बोलणे होते,त्यामूळे पोस्टकार्डाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे.

आमच्या पीढीच्या मात्र तू कायम मनात राहाशील कारण तुझ्यासोबत आमच भावनिक नात आहे.कधीच न विसरता येणार.कारण,स्वत:च्या हाताने लिहिलेल्या शब्दांना व्हाट्सअप,इमेल ची जागा कधीच घेता येणार नाही.तुझ्याबरोबर मामाचं पत्रही काळाच्या आड गेल…खरच,तुझ्या सानिध्यातले ते दिवस खुप मंतरलेले होते.लग्नानंतर तू खुप जवळचा झालास,आजही त्या अक्षरांचा दरवळ मनाच्या खोलवर मी जपून ठेवलाय.


तुझा जन्म आॅस्ट्रेलिया मध्ये १८६९झाला,आमच्या भारतात मात्र तू १जुलै१८७९रोजी आलास,आणि पाहाता पाहाता मनामनात विराजमान झाला.ग्रामीणभागातील जनतेचा सच्चा मित्र होउन त्यांच्या सुख,दु:खात सहभागी होऊन लिखीत संवादाचा एक भाग होऊन प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलास.
महात्मा गांधी पोस्टकार्डचे चांगले चाहाते आणि वापरकर्ते होते.म्हणून पोस्ट विभागाने १९५१ते१९६९मध्ये विशेष गांधी पोस्टकार्ड जारी केले.

आज महागाईचे भाव गगणाला भिडत आहेत तरी टपालसेवा ही जगभरातील सर्वात स्वस्त टपालसेवा आहे आणि त्याचा तू अविभाज्य भाग आहेस.केवळ पन्नास पैशात उपलब्ध आहेस,हेच पोस्टकार्ड एकेकाळी संदेशवहनाचा एक राजमार्ग होता.सध्या पोस्टकार्डचा उपयोग अतिशय अल्पप्रमाणात केला जातो,शासनाला एका पोस्टकार्डमध्ये ७रुपये तोटा सहन करावा लागतोय तरी ही सेवा आजही सुरळीत चालू आहे.

तू काळाच्या आड गेला तरी…आम्हाला तू आजही तेवढाच प्रिय आहेस,आणि राहाशील.पूर्वी व्हाट्सअप,इमेल नव्हत तेव्हा मला वाचकांचे अभिप्राय पोस्टाच्या पत्राव्दारे यायचे..ते पत्र मी आजही जपून ठेवले आहेत.जीवलग पत्रा आज जागतिक टपाल दिन त्यानिम्मित तुला हार्दिक शुभेच्छा….!

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh

तुझीच
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *