फुलवळ येथे बस निवाऱ्याची नितांत गरज.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ हे एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्गवर कंधार-मुखेड आणि कंधार-उदगीर या तालुक्यांना जोडणाऱ्या महत्वाच्या ठिकाणी आले असून आता नक्कीच येथून वाहनांची व प्रवाश्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार हे जरी खरे असले तरी येथे प्रवाश्यांसाठी मात्र बस निवारा नसल्याची खंत अनेक दिवसांपासून जाणवत असून सकाळ ने नेहमीच त्यासाठी पाठपुरावा केला आहे , आता वाढत्या प्रवाशी संख्येचा विचार करता येथे बस निवाऱ्याची नितांत गरज असून या बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे असे नागरिकांतून बोलले जात आहे.

फुलवळ हे जिल्हा परिषद गटाचे गाव असून जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या असलेल्या गावात अन्य काही शासकीय कार्यालये आहेत मात्र येथे बस निवारा अद्याप उभारला गेला नाही ही खेदाची बाब आहे. तस कोणतीही निवडणूक आली की भल्या भल्या राजकारण्यांना फुलवळ ची फार ओढ लागलेली असते त्यामुळे ते मोठ्या अस्तवाईकपणे फुलवळ मध्ये आल्यावर भाषणातून मोठमोठ्या घोषणा देतात आणि मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुमच्या ज्या अडचणी असतील त्या बिनधास्तपणे सांगत जा , पण एवढी वेळ आपण सर्वांनी माझ्यासोबत राहून एकदा सहकार्य करावे अशी माझी ईच्छा आहे असे प्रांजळपणे बोलून जातात . आणि भोळी भाबडी जनता भूलथापांना बळी पडून भरकडून जाते.
वास्तविकता मात्र काही वेगळीच असते कारण आज घडीला फुलवळ हे कंधार तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या व मतदार संख्या असलेले जिल्हा परिषद गटाचे गाव आहे. तरीपण या गावाचा म्हणावा तसा विकास अद्यापही झालाच नाही. एम आय डी सी आहे तर तेथे कोणते मोठे उद्योग नाहीत , त्यामुळे तरुण बेरोजगारांना काम नाहीत . एवढे मोठे गाव असून प्राथमिक आरोग्य केंद्र नाही , पशुवैद्यकीय श्रेणी १ चा दवाखाना आहे मात्र त्यात दोन वर्षांपासून डॉक्टर नाहीत.
सध्या तरी येथून दोन प्रमुख रस्ते जात असल्यामुळे प्रत्येकांना आता आपला व आपल्या गावाचा विकास होईल , काही ना काही छोटे मोठे व्यवसाय , धंदे चालतील अशी आशा सर्वांनाच लागली आहे . येथील बसस्थानक शेजारी बरेचशे अतिक्रमण काढत रस्त्याचे रुंदीकरण ही करण्यात आले. पण येथे प्रवाश्याना ना बसण्याची व्यवस्था आहे ना सार्वजनिक शौचालय , मुतारी . त्यामुळे प्रवाश्यांची चांगलीच हेळसांड होत बसनिवाऱ्याची नितांत गरज असल्यामुळे संबंधितांनी तात्काळ लक्ष घालून येथे बसनिवारा उभारावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *