भीमराव शेळके सर गेल्याचे वृत्त विकास कदमच्या फेसबुक वॉलवर दिसलं .सगळ्यांच्या दुःख प्रसंगात अगदी घरच्यासारखा धावून जाणारा विकास आज पार कोलमडला होता. त्याचे शब्द वाचताना मला गहिवर दाटून आला .त्याला फोन करून डिटेल्स विचारण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही म्हणून मिलिंदला बोललो.घडलेलं हे खरंच होतं.
” चला तर मंडळी तुमचा निरोप घेत आहे अखेरचा- तुमचा भीमराव शेळके दुपारी तीन वाजता”. विकास च्या वॉल वरील ही वाक्ये वाचताना पूर्ण अवसान गळून गेलं. शरीर शक्तीक्षयानं मलूल पडलं आहे असा भास होत राहिला. मी खिन्न झालो .अचानक ही सरांची एक्झिट !!आयुष्यभर ज्या माणसाने एकेक करीत माणसं उभी केली. विकास, मिलिंद ,बबन ,गौतम ,कितीतरी मानसपुत्र यांना होती .एवढ्या मनाच्या श्रीमंत माणसाची ही अखेर फार चटका लावून गेली .पाऊसकाळ मला निरंतर अशाच वेदना देत आला आहे .या पाऊसकाळीही सर गेले. आकाशवाणीत सरांची भेट झालेल्यालाही तीस वर्षे उलटून गेली. त्यानंतर मागे लॉकडाऊन आधी मार्चमध्ये सर शेवटचे भेटले .जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मेडिकल ऑफिसरसाठी त्यांच्या कन्येनं अर्ज केला होता .त्याबद्दल विचारपूस करण्यासाठी दोघे आले होते .मी ,मिलिंद आणि सर आम्ही मनसोक्त बोलत राहिलो.खूप गप्पा झाल्या.
डोळ्यांमध्ये निरागस, स्वच्छ भाव, चेहरा हसरा ,स्वभावातील मृदुपणा हे त्यांचे गुणविशेष. त्यांच्या चेहऱ्यावर मला माझ्या मामाची झाक दिसायची. म्हणून ते भेटले की अाजोळ गवसल्याचा समाधान व्हायचं . त्यांना कितीकदा तसे म्हणालोही .
माझ्या ऑफिसमधली ती शेवटची भेट ठरली त्यांची .अशी काही माणसं आपल्या आयुष्यात असतात ते तुटून गेली की आपण केवळ नीरव पोकळ उरतो. त्यातले सर होते. शेळके सर गेले. झाडावरचे आम्ही सारेच पक्षी दीनवाणी आणि असहाय्य झालो आहोत.
कुणी कुठेही जावं तर निरोप द्यावा. निरोप घ्यावा. निरोपाविना जाणं मला कधी रुचलेच नाही .अगदी आपल्या जवळचे कोणी गावी जात असेल तर गाडीत बसून गाडी हलेपर्यंत तिथून माघारी वळावे वाटत नाही. गाडी दूर गेल्यानंतरही गाडीच्या खिडकीतून दिसणारा अस्पष्टसा हात नजरेआड झाला की मन अमळ अस्वस्थ घेऊन परततोत. निरोप दिल्या घेतल्याचं एक समाधान असतं. तसा निरोप द्यायची संधी नियती का बरं देत नाही हो सर. एकदा कडकडून मिठी मारावी तुम्हाला आणि तुम्ही म्हणावं- विलास, विकास ,मिलिंद, गौतम .,असं म्हणून का बरं गेला नाहीत. निरोप न देताच जाण्याची किती मोठी जखम होते अंतर्मनात .माझी आई गेली ,आत्या गेली, मामा (सासरे) गेले ,आता तुम्ही !!हे क्रूर नियंत्या ,कधी थांबवणार रे बाबा हा खेळ…..-विलास ढवळे