कोरोना संकट काळात मोफत धान्य मिळण्याची काटकळंबा नागरिकांची मागणी
कंधार:
कंधार तालुक्यातील मौजे काटकळंबा गावातील नागरिकांनी कोरोना संकटकाळात मोफत धान्य मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचेकडे दि.३ रोजी केली आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, कोरोना आजार त्यात लॉकडाऊन सतत चार ते पाच महिन्यापासून रोजगार नाही, त्यामुळे नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे.कोरोना संकटामुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार होरपळून गेला आहे.कोरोनाचे संकटं,लॉकडाऊन, महागाई यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या संकटकाळात काटकळंबा येथील काही नागरिकांना मोफत धान्य मिळालेले आहे परंतु दोन स्वस्त धान्य दुकानाअंतर्गत १२१ कुटुंबांना ह्या मोफत धान्याचा लाभ मिळालेला नाही.१२१ कुटुंब मोफत धान्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या निवेदनाची त्वरित दखल घेवून त्वरीत मोफत धान्य मिळण्याची सोय करावी अशी मागणी शेवटी निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पुरवठामंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड , तहसिलदार कंधार यांना देण्यात आल्या आहेत.