व्यक्तीवेध…… समर्पित सेवावृत्ती अवलिया- नंदकुमार कवठेकर

व्यक्तीवेध
समर्पित सेवावृत्ती अवलिया- नंदकुमार कवठेकर

        आज नोकरीचा व्यवसाय करू पाहणार्‍या काळात नोकरीत सेवा शोधणारी माणसं सापडणं कठीण झालेला हा काळ. विधात्यानं दिलेल्या सुंदर जीवनाची मरूभूमी करून भरकटणार्‍या काळात एखादा सेवावृत्ती साने गुरूजीचा वारसदार सापडणं म्हणजे मरूद्यान सापडल्यासारखंच. त्याच्या सान्निध्यात वावरताना जगण्यातली मरगळ, मनावरवरची सुज झटकून टाकून सेवामार्गावर धोधाट चालण्याची खुमारी रुजवणारा आमचा अवलिया ज्याच्या जगण्याकडे पाहिले की आपोआपच दोन्ही कर वंदनासाठी जुळावेत ते मा. नंदकुमार कवठेकर (शिक्षण विस्तार अधिकारी बारूळ विभाग)        खरं तर अधिकारी हे बिरूद चिटकलेलं शिक्षण खात्यातलं क्षेत्रीय स्तराचं निम्नपद. त्या पदाचा दरारा काय असतो? हे आपल्या सेवाभावातून केवळ तीन वर्षात कवठेकर सरांनी दाखवून दिलं. कुठे हदगाव? कुठे कंधारमधलं बारूळ? प्रमोशन दिलं गेलं ते असं या टोकाहून त्या टोकाला. जाऊ द्या आता आपली सेवेची शेवटची तीन वर्षे आहेत असा विचार न करता. सालोसाल शाळेनं नाजर साहेब कोण असतो ? हे न पाहिलेल्या पट्ट्यात मागील तीन सालात हरसाल किमान तीन व त्यापेक्षा अधिकच्या शि.वि.अ.च्या भेटी बारूळ विभागातल्या शाळांनी अनुभवल्या. केंद्र प्रमुखाच्या किमान दहा व त्यापेक्षा अधिकच्या भेटी प्रत्येक शाळेला अपेक्षित असून मार्गदर्शन व सूचनांद्वारे इष्ट शालेय परिवर्तन घडून यावं. ही अपेक्षा असते. जिथं केंद्र प्रमुखाच्या भेटीलाच शाळा तरसत असतात तिथं कवठेकर साहेबांसारखा अधिकारी मिळणं ही किती महद्भाग्याची गोष्ट ! त्यांची शाळाभेट ही खर्‍या अर्थानं त्या शाळेसाठी गळाभेटंच म्हणावी लागेल. हा बावा शाळाभेटीला आला म्हणून कधी सरळ आॅफिसात येवून बसला असं झालंच नाही. येणार ते थेट वर्गात. एकेका मुलाला जवळ घेवून पितृवत्सल भावानं त्याला काय येतं ? हे जाणून घेणार. हे सर्व होण्यात दोन-तीन तास निघून जायचे. दुपारी त्याच शाळेवर तिथल्या शिक्षकांसोबत स्वतःच्या बॅगमधील डब्बा काढून एकमेकांशी शेअर करीत खाणार. जेवतजेवत गप्पांमधून शाळेच्या, शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेणार. त्यावर उपाय सांगणार, शेरेबुकात वस्तुस्थिती मांडणार.शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून लेखन-वाचन व गणिती क्रियांची अपेक्षा करणारा हा अधिकारी. एवढं विद्यार्थ्यांना आलं की ते कुठंच अडत नाहीत. हा त्यांचा ठाम विश्वास. औपचारिकता उपचारांना बळी पडते, म्हणून माणसानं औपचारिक जगण्याच्या मोहात न पडता नैसर्गिक जगावं. हा त्यांचा संदेश. शालेय अभिलेखे शाळा व्यवस्थापन जपतंच परंतु तेच जपून गुणवत्ता घसरता कामा नये. याकडे त्यांचे बारिक ध्यान असायचे. शाळा भेटीत एखादा गुरूजी नसेल अन त्याचा वर्ग  टवटवीत बोलका असेल. तर त्याच्या एखादवेळी बाहेर जाण्याशी त्यांची काहीही हरकत नसायची. केलेल्या कामाचं तोंड भरून कौतूक करणार. अंगचोराची झडती घेण्याची कलाही भारीच. स्पष्ट व रोखठोक स्वभावामुळं वरीष्ट अधिकारी कवठेकर सरांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करायला धजायचे नाहीत. ते म्हणायचे, ‘तुमचे कवठेकर साहेब जाणे अन तुम्ही जाणे.’ अशी सावध भूमिका घ्यायचे. किती मोठी ताकद असते बरं समर्पित सेवाभावात ! अशा अधिकार्‍यांमुळे ते ज्या पदावर असतात. त्या पदाची उंची वाढवतात. मात्र काही संधीसाधू थिट्या  उंचीची माणसं पदाचा गैरवापर करीत भ्रष्ट वर्तनानं स्वतः तर अधःपतित होतातच अन पदाचंही अवमूल्यन करतात.  नंदकुमार कवठेकरांसारखी माणसं मात्र भवताल कितीही गढुळलेला असला तरी बरबटलेली व ढिसाळ यंत्रणा एकट्याने रुळावर आणून ठेवणे शक्य नाही, हे माहित असूनही पाणी नितळी आपल्या आसपास तरी निदान गढूळ पाणी राहू देत नाही. तसा ‘एकला चालो रे’ चा सेवाभर प्रयोग करणारा अवलिया दुर्मिळच ! आपलं कर्तव्य चोखपणे बजावत कर्तृत्वाच्या बळावर आपला अमीट ठसा कायमचा उमटवून जातात. विठू रायाच्या दर्शनाची आस घेवून पंढरीला जावं. तेवढ्याच ओढीनं बाल माऊलींना भेटायला शाळा भेटीला येणं. तुमचे अभिलेखे तुमी बघत बसा. मला लेकरांंना भेटू द्या. त्यांची गुणवत्ता बघू द्या. म्हणणारा असा हा आमचा अभिमान ! ज्यांनी आम्हाला त्यांच्या जगण्यातून जिद्द, चिकाटी व कर्मयोग शिकविला असा हा ज्ञान पंढरीचा खरा अवलिया वारकरी आज नियत वयोमानाने नोकरीतून निवृत्ती घेतो आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वास मानाचा सलाम.         मा. नंदकुमार कवठेकर साहेबांना पुढील आयुष्य सुखा, समाधानाचे व  आरोग्यसंपन्न जावो ही विधात्यास प्रार्थना.

    -एकनाथ डुमणे 

 सावरगाव ता.मुखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *