फुलवळ बातमीदार ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कंधार च्या वतीने वित्तीय साक्षरता अभियान अंतर्गत बँक आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला .
यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कंधार चे शाखाधिकारी ए. पी. कांबळे , कार्यालयीन सहाय्यक अधिकारी गोपाळ शेट्टे , बँक अधिकारी वीरेंद्र चौधरी , कार्यालयीन कर्मचारी माधव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बँक आपल्या दारी या अभियानात उपस्थित बँकेचे खातेदार व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना श्री गोपाळ शेट्टे यांनी सांगितले की जास्तीत जास्त ग्राहकाने बँकेचे बचत खाते उघडणे , ज्यांचे बँक खाते आहेत त्यांनी वेळोवेळी बँकेसोबत व्यवहार करत जमेल तशी बचत करावी जेणेकरून अडीअडचणी च्या काळात किंवा उतरत्या वयात ती बचत आपल्या कामी पडेल , त्याच बरोबर प्रत्येकाने आपापल्या खात्यावरून स्वतःचा अपघात विमा काढून घ्यावा . त्यात वार्षिक १२ रुपये यात २ लाख संरक्षित रक्कम व वार्षिक ३३० रुपये या विम्यात पण २ लाख रुपये संरक्षित रक्कम आहे. असे दोन प्रकारचे अपघात संरक्षण विमे आहेत. या दोन्ही प्रकारच्या विम्यात दुर्दैवाने अपघात झालाच तर लाभार्थ्यांच्या वारसांना एकंदरीत चार लाख रुपयांचा लाभ घेता येतो.
एवढेच नाही तर वयाच्या १८ वर्षांपासून ते ४० वर्ष वयोगटातील लोकांसाठी अटल पेन्शन योजना सुद्धा चालू असून त्यात वयाच्या प्रमाणात मासिक , सहामाही व वार्षिक हप्ता आपल्या बँक खात्यातून जमा करता येतो आणि ती पेन्शन ची रक्कम वयाच्या ६० वर्षानंतर आपल्याला मिळवता येते . अशा विविध प्रकारच्या योजना शासन आपल्यासाठी राबवत असून त्याचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा व उतरत्या वयातली मायापुंजी आजपासूनच जमा करण्यास सुरुवात करावी जेणेकरून वेळ गेल्यानंतर नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आजच सावध भूमिका घेऊन आपापल्या बँकेशी संपर्क साधावा आणि अशा अनेक योजनांचा लाभ घ्यावा असे पटवून सांगितले.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिक , तरुण आणि बँकेचे खातेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या शेवटी बँकेच्या अधिकाऱ्यांचे व उपस्थितांचे धोंडीबा बोरगावे यांनी आभार मानले.