तुझेच गाणे (वृत्त – अनलज्वाला) विजो (विजय जोशी)

कितीक गाऊ प्रेमामधले नवे तराणे
ओठावरती, मनोमनीही तुझेच गाणे !!

गोडगोजिरे रूपडे तुझे नयनमनोहर
गळा असा की जणू वाजतो पावा सुंदर
बटा खेळती वाऱ्यासंगे गालावरती
तीळ असा की तीट लाविली चंद्रावरती
तूच शोभशी सौंदर्याचे अस्सल नाणे
ओठावरती, मनोमनीही तुझेच गाणे !!

सुहास्य वदनी हसणे गाणे वेड लावते
कुंतल शामल मानेवरती, भुरळ पाडते
चमत्कार हा निसर्गातल्या कलाकृतीचा
हेवा वाटे, तुला मिळाल्या सौंदर्याचा
किती अजूनी वाट पाहणे, नको बहाणे
ओठावरती, मनोमनीही तुझेच गाणे !!

कितीक गाऊ प्रेमामधले नवे तराणे
ओठावरती, मनोमनीही तुझेच गाणे !!

■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण – सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *