- जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे
जगात कोव्हीड-19 या महामारीच्या प्रार्दुभावामुळे उध्दभावलेल्या संकटावर मात करत आपण ऑनलाईन शाळा सुरु केल्यात . या काळात स्काऊट गाईडने सुध्दा मदत / सेवाकार्य / जनजागृती केले.
- त्यामुळे आज 7 नोव्हेंबर भारत स्काऊटस् आणि गाईडस् राष्ट्रीय चळवळीच्या स्थापना दिनचे औचित्य साधून मुलांना मूल्याधारित नैतिक शिक्षण देण्यासाठी देशात शालेय स्तरावर स्काऊट गाईड सारख्या संस्कार घडविणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची ओळख आहे. त्यानिमित्ताने समाजातील सर्व स्थरापर्यंत ही चळवळ पोहचावी आणि हि चळवळ समाजभिमुख आणि लोकप्रिय व्हावी हा उद्देश.
लॉर्ड बेडन पॉवेल यांनी 1907 साली इंग्लंडमध्ये स्काऊट गाईडची चळवळ सुरु केली . भारतात ही चळवळ1909 साली सुरु झाली . पुणे, बेंगलोर, जबलपूर, सिमला , इत्यादी ठिकाणी स्काऊट ट्रुप सुरु करण्यात आले . ही चळवळ अराजकीय, निधर्मी , सर्वधर्मसमभावाची भावना जोपासणारी , गणवेशधारी तरुणांची जागतिक / आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. जवळजवळ जगातील 200 देशात या चळवळीचे कार्य प्रभावीपणे चालु आहे. चीफ स्काऊट लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांनी 1921 मध्ये भारतात स्काऊट गाईड चळवळीच्या कामाकरिता प्रथम भेट दिली. स्वातंत्र्यपुर्व काळात भारतात इंडियन बॉय स्काऊट , सेवा समिती स्काऊट , नॅशनल स्काऊट असोसिएशन , गर्ल गाईड असोसिएशन अशा विविध संस्था स्वतंत्रपणे कार्यरत होत्या. भारतातील या सर्व स्काऊट गाईड संस्थेचे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद , शिक्षण सचिव, नवी दिल्ली. डॉ. ताराचंद्र , डेप्युटी प्रायव्हेट सेक्रेटरी कमांडर जी. एच . निकोलस , पंडीत मदन मोहन मालवीय , पंडीत ह्रदयनाथ कुंझरु व पंडीत श्रीराम वाजपेयी यांच्या प्रयत्नाने एकीकरण करुन दि. 07 नोव्हेंबर 1950 मध्ये भारत स्काऊटस् आणि गाईडस् ही संस्था राष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात आली. नांदेड जिल्हयाचे भागयविधाते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकररावजी चव्हाण हे भारत स्काऊटस् आणि गाईडस् राष्ट्रीय संस्थेचे दिर्घकाळ राष्ट्रीय अध्यक्ष होते.
- संपुर्ण भारतामध्ये स्काऊट आणि गाईडचे शिक्षण देणारी ही एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या शाखा भारतातील सर्व राज्यात आहेत. केंद्रीय विद्यालय समिती , नवोदय विद्यालय समिती व रेल्वे विद्यालय समिती यांनाही राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांना जगातील सर्व स्काऊट गाईड बी. पी. या आवडत्या नावाने ओळखतात . लष्करामध्ये सेवा करीत असतांना स्वकर्तृत्वावर कॅप्टन , मेजर , जनरल या दर्जाच्या पदावर त्यांनी नेत्रदिपक कार्य केले.त्यामुळे ते जनतेच्या दृष्टीने एक मोठे वीर पुरुष ठरले . त्यांनी मुलांसाठी “स्काऊटींग फॉर बाईज ” हे पुस्तक आणि लष्करातील लोकांकरीता “ एडस् टू स्काऊटींग ” हे पुस्तक लिहीले. या चळवळीमधून चारित्र्य , स्वावलंबन , आरोग्य, व सेवा या मूल्याची जोपासना करुण मुला – मुलींच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणाचा विकास , चारित्र्य संवर्धन , आरोग्य, खिलाडूवृत्ती व सेवाभाव निर्माण करुण देशाचे उत्तम नागरिक घडावे हा या शिक्षणाचा उद्देश आहे.
-
मुलांबद्दल आत्मीयता व प्रेम असणारी मोजकीच माणसे होऊन गेलीत त्यापैकी लॉर्ड बेडन पॉवेल हे एक होते.त्यांनी 1907 मध्ये केवळ 20 मुलांना घेऊन इंग्लंड येथे या शिक्षणाची सुरुवात केली . स्काऊट गाईड चळवळ चारित्र्य हस्तव्यवसाय आरोग्य व सेवा या चार मूलभूत अधारस्तंभावर आधारलेली आहे. आज या गुणाची देशाला सुजाण नागरिक घडविण्यासाठी नितांत गरज आहे. 3 ते 25 वयोगटातील मुलामुलींसाठी खेळ, गाणी , गोष्टी, शैक्षणिक कार्यक्रम , गाठी बांधणे, प्रथमोपचार विविध उपक्रम, प्रकल्प,संघनायक प्रशिक्षण शिबीर, तालुका, जिल्हा, राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय मेळावे व जांबोरी असे चार भिंती बाहेरचे खरे आनंददायी शिक्षण देणारी तसेच संस्कारक्षम वयात राष्ट्रीय एकात्मता ,श्रममूल्य सामाजिक बांधिलकी जोपासणारी जगातील सर्वात मोठी शैक्षणिक चळवळ असून त्याला पुरक असा स्काऊट गाईडचा अभ्यासक्रम आहे. वयाच्या 13 व 14 व्यावर्षी राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करता येतो प्रवेश ते तृतीय सोपान अभ्यासक्रमाच्या पायऱ्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अजोड बाजुंसाठी मजबूती तर देतातच शिवाय छंदाकडून चरितार्थाकडे नेण्यास पूरकही ठरतात. त्यामुळे स्काऊट गाईड शिक्षण हे मुलांमुलींसाठी एक मुक्तव्यासपीठ आहे. स्काऊट गाईड चळवळ मुख्यत: खुल्या युनिट मार्फत चालविण्यात येत असे.
महाराष्ट्रातही अशा पध्दतीने चळवळीचे कार्य सुरु होते. महाराष्ट्र राज्य 1960 साली अस्तित्वात आल्यावर 6 वी राष्ट्रीय जांबोरी 1970 मध्ये मुंबई येथे आयोजित केली होती . त्यावेळी महाराष्ट्राचे पहीले शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी हे महाराष्ट्र भारत स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष होते. नितीमूल्य शिक्षणावर आधारित अशी स्काऊट गाईड चळवळ सर्व शाळांमधून सुरु करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व सन 1972 मध्ये 10+2+3 या नवीन शैक्षणीक आकृतीबंधात स्काऊट गाईड विषयाचा शालेय अभ्यासक्रमात एक वैकल्पिक विषय म्हणून अंतर्भाव झाला. तसेच सन 1989 मध्ये प्राथमिकस्तरावर कार्यानुभव अंतर्गत कब-बुलबुलचा अभ्यासक्रमात समावेश केला .स्काऊट गाईड चळवळीचा इयत्ता 1 ली ते 8 वर्गापर्यंत समान अनिवार्य उपक्रमांपैकी एक उपक्रम व इयत्ता 9 वी ते 10 साठी अभ्यासक्रम ऐच्छीक विषयांपैकी एक उपक्रम म्हणून अंतर्भाव करण्यात आला आहे .तसेच अंगणवाडी,बालवाडी, नर्सरी, LKG,UKG, मध्ये बनी टमटोला आणि ११,१२ वी व कॉलेजस्तरावर रोव्हर-रेंजर युनिट चालतात . शिक्षण पध्दतीचा एक घटक म्हणून भारत स्काऊट गाईड चळवळ ही राज्य सरकार यांना जोडणारा एक जबाबदार दुवा म्हणून काम करते . महाराष्ट्र राज्यात स्काऊट गाईडचे कार्य करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् मुंबई या संस्थेला सन 1972 पासुन दिलेली असून शासन निर्णय दिनांक २१ नोव्हेंबर 200८ अन्वेय कायमस्वरुपी मान्यता दिली आहे. राज्य अध्यक्ष व राज्य मुख्य आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात राज्य मुख्यालय व जिल्हा कार्यालये आणि स्थानिक संस्था यांचे मार्फत कार्य करण्यात येते . जिल्हास्तरावर जिल्हा संघटक स्काऊट गाईड व स्थानिक मानद कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करण्यात येते. मुले घडामोडीतून शिकतात त्यासाठी स्काऊट गाईड अभ्यासक्रमातील संघ पध्दती अत्यंत प्रभावी आहे. संघातील प्रत्येक सदस्यांना वाटप केलेली कामे / जबाबदारी आळीपाळीने सर्वांना करणे बंधनकारक असल्याने 4 ते 7 दिवसांच्या प्रात्यक्षिक शिक्षणाच्या अनुभवातून वर्षभरात शिकता येणार नाही असा अविस्मरणीय सहजीवनाचा अनुभव, स्काऊट गाईड अभ्यासक्रमातील कौशल्ये , स्वावलंबन , सेवाकार्य, विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात निस्वार्थ भावनेने कार्य करण्याची कार्यकर्तावृत्ती, नेतृत्व गुण, श्रममूल्याची जाणीव सामाजिक ऋण , वडीलधाऱ्यांचा मानसन्मान , राष्ट्रप्रेम, निर्सग/प्राणीमात्रांची काळजी इत्यादी मूल्याधारित नैतिक शिक्षणाची जाणीव जागृती निर्माण करणारी संस्कारक्षम आदर्श पिढी निर्माण केली जाते.
प्रत्येक राष्ट्रातील तरुणांनी शरीराने , नीतीने आणि मनाने प्रबळ व तेजस्वी बनावे असा या चळवळीचा उद्देश आहे. या विषयाचा सर्व अभ्यासक्रम मूल्यशिक्षणावर आधारीत आहे. स्काऊट गाईड शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना , प्रखर राष्ट्रनिष्ठा सामाजिक, सर्वधर्मसमभाव, सेवावृत्ती निर्माण करते .वाईट रूढी परंपरा,चालीरितींना विरोध, घातक रोगाबाबत जनजागृती करणे. तसेच या शिक्षणातून मुलांच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार व दिशा दिली जाते. त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. थोडक्यात स्काऊट गाईड चळवळ ही संस्काराची चळवळ असुन देशासाठी सुजाण व सुसंस्कारित नागरिक निर्माण करणारी चळवळ आहे. जिल्हा व राज्य , राष्ट्रीयस्तरावर आयोजित मेळावे व शिबीरामध्ये विद्यार्थी त्यांची संस्कृती रितीरिवाज , परंपरा, बोलीभाषा जाणून घेतात. अशा मेळाव्यामध्ये सर्व जाती धर्माची , पंथाची मुले तंबुमध्ये गुण्यागोविंदाने व शिस्तबध्द पध्दतीने एकत्र राहतात व आपापसात विचारांची देवाणघेवाण करतात. जांबोरीतून राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागते . प्रतिकुल परिस्थितीमध्ये संकटावर मात करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते . मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य व कलागुण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी प्राप्त होते . म्हणून स्काऊट गाईड शिक्षण ही आजच्या आत्मकेंद्रित होत चाललेल्या युवा पिढीसाठी काळाची गरज आहे.
सामाजिक जाणीवेचा वारसा घेतलेली जागतिक पातळीवरील स्काऊट गाईड ही एकमेव शैक्षणिक चळवळ आहे. आजच्या शिक्षण पध्दतीमध्ये समुदायिक जीवन हा विषय दिसत नाही. त्याचे परिणाम आज समाजजीवनात दिसत आहेत. यात शासन शिक्षण संस्था, समाज यांचे योगदान महत्वाचे आहे. यासाठी उत्तम पर्याय म्हणून स्काऊट गाईडचे शिक्षण आहे. यामध्ये शालेय / गाव परिसर स्वच्छ करणे , स्वालंबन, स्वयंपाक , व्यवहारज्ञान , परस्पर बंधुभाव व समानता , श्रमप्रतिष्ठा आणि नेतृत्व गुण, राष्ट्रीय एकात्मता इत्यादी समाज मुल्यांची जोपासना करणारे शिक्षण मिळते. सध्यास्थितीमध्ये शाळेतील वातावरण अत्यंत गंभीर वळणावर आलेले आहे. “ हम दो - हमारे दो ” आणि नौकरी करणारे पालक यामुळे घरात संस्कार करण्यासाठी वेळ नाही आणि विभक्त कुटुंब पध्दतीमुळे जेष्ठांचा अभाव . त्यामुळे बाल मनावर संस्काराची जबाबदारी शाळेंवर येऊन पडली. परंतु सध्याचे शिक्षण हे मुलांना शर्यतीच्या घोडयाला ज्या पध्दतीने ट्रेनिंग दिली जाते तसे आहे. त्यामुळे घोकम्पट्टी करुन यश मिळविण्याचे शिकवले जाते. आज मुले गुणवान होत आहेत परंतु देशाला आदर्श व चारित्र्यसंपन्न गुणवंत नागरिकांची गरज आहे. आपला देश एक महासत्ता म्हणून उदयास येत असून देशात तरूणांची संख्या लक्षावेधी असल्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी स्काऊट गाईड सारख्या नैतिक व आदर्शाचे धडे देणाऱ्या शिक्षणाची देशाला गरज आहे. आर. टी.ई. कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासासाठी शिक्षक /मुख्याध्यापक / संस्था प्रमुख म्हणून आपण बांधील असून स्काऊट गाईड हा एकमेव सहशालेय उपक्रम यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या शैक्षणिक वर्षापासुन जिल्हयातील शाळा तेथे कब - बुलबुल, स्काऊट - गाईड सहशालेय उपक्रमाची सुरुवात करुन शाळेच्या वैभवात भर घालावी.
शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात स्काऊट गाईड चळवळीचे कार्य प्रभावीपणे चालू आहे. आपल्या जिल्हयातील ८८७ शाळेतील ३०४४५ विद्यार्थी स्काऊट गाईड शिक्षणात सहभागी आहेत. मराठवाडा विभागात स्काऊट गाईड चळवळीमध्ये नांदेड जिल्हा प्रथम स्थानी आहे. बालवीर (स्काऊट ) आणि वीरबाला ( गाईड ) पथके जिल्हयातील सर्व शाळेत सुरु करुन नेतृत्वविकास ,स्वयंशिस्त , स्वालंबन , साहस, परोपकार अशा अनेक मूल्यवर्धित संस्कार मुल्यांची विद्यार्थ्यांमध्ये जोपासना करावी, त्यामुळे सामुदायिक जीवननिर्मित विद्यार्थी घडविण्यासाठी मुख्याध्यापक , स्काऊटर , गाईडर व पालकांनी स्काऊट गाईड उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आत्मकेंद्रित होत चाललेल्या युवा पिढीला सृजनशील नागरिक घडविण्यासाठी या उपक्रमात सहभागी करावे असे आवाहन करतो .
दिगंबर शंकरराव करंडे
जिल्हा संघटक स्काऊट,नांदेड