कंधार / प्रतिनिधी
लोहा-कंधार विधानसभेकडे संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलेले होते. ही निवडणूक बहुरंगी अत्यंत चुरशीची झाली. सर्व उमेदवारांना शेवटपर्यंत जीवाचा रान केल्याने कोण बाजी मारणार याकडे मतदारसंघातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. मतदार संघात प्रथमच ओबीसी समाज आक्रमक झाल्याने या ओबीसी फॅक्टरचा कुणाचा फायदा होईल की घात ? याविषयी शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र जोमाने चर्चा चालू आहे. कोण मुकद्दर का सिकंदर होणार या विषयी कार्यकर्त्यांमध्ये पैजा लावल्या जात आहे. आता सर्वांचे लक्ष २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे लागलेला आहे.
विधानसभा निवडणुकीत कंधार लोहा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३३८ मतदान केंद्रावर २० नोव्हेबर रोजी बुधवारी मतदान झाले. यात २ लाख २६ हजार ८३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. झालेल्या मतदानाची टक्केवारी ७५.२० टक्के इतकी आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीवेळी ७०.२० टक्के इतके मतदान झाले होते. रात्री उशिरापर्यंत मतदान चालूच होते मागील निवडणुकीच्या मतदान ५ टक्क्यांनी वाढलं आहे .प्रमुख उमेदवारांनी आपल्या विजयासाठी प्रचारात कोणतीही कसर ठेवली नव्हती. कार्यकर्ते आकडेमोड करत आपल्या उमेदवाराच्या विजयाचे गणित मांडण्यात मग्न झालेले दिसत आहे .
मन्याडखोऱ्यात आजपर्यंत
विधानसभा निवडणुका विकास कामावर, पक्षाच्या धोरणावर लढविल्या गेल्या. परंतु यंदाची निवडणूक मात्र वेगळेच वळण घेत जातीय समीकरणावर आली होती. याचे समिकरण जुळवताना उमेदवार अन् कार्यकर्त्यांचा कस लागत होता. राज्य पातळीवर चर्चेत असलेला मराठा व ओबीसी असा विषय ग्रामीण भागात आला होता.उमेदवाराची मात्र प्रचारात दमछाक झाली होती. बैठक, मेळावे, प्रचार सभा आदींनी वातावरण ढवळून निघाले होते. सुरुवातीला बहुरंगी लढतीचे रुढतीचे चित्र होते. परंतु अखेरच्या टप्प्यात मात्र पाच ते सहा जणात रंगतदार लढत झाली. लोहा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत सामना रंगेल असा राजकीय कयास बांधला जात होता.
परंतु महाविकास आघाडीकडून असलेले शिवसेना (उबाठा) पक्षाचे एकनाथ पवार, महायुतीकडून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर, शेकापच्या आशाबाई शिंदे, जनहित लोकशाही पार्टीचे चंद्रसेन पाटील, वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नरंगले, अपक्ष प्रा. मनोहर धोंडे या प्रमुख उमेदवाराभोवती निवडणूक फिरत राहिली. प्रमुख उमेदवारांची मताची जुळवाजुळव करताना मोठी दमछाक झाली होती. जातीपातीचे राजकारणाने निवडणुकीचा अंदाज बांधणे राजकीय विश्लेषकांनाही कठीण जात होते.
आता मतदान संपल्यानंतर च्या रात्रीपासून कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू आहे. कोण्या गावातून किती आघाडी मिळेल याचे गणित लावून आपलाच उमेदवार निवडून येईल, असा दावा करीत आहेत. तर उत्साही कार्यकर्ते शर्यती लावत आहेत.आपल्या उमेदवारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपले साहेब निवडून येण्याची खात्री वाटत आहे. परंतु मतदारांनी केलेले मतदान हे मतदान यंत्रात बंद झाले आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे पहाण्यासाठी २३ नोव्हेंबरची प्रतिक्षा करावी लागणार आहे. सकाळी 8 वाजता लोहा तहसिल येथे मतमोजणी चालू होणार आहे .