लोहा तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये  १४ टेबल आणि २५ फेऱ्यात होणार मतमोजणी

 

प्रतिनिधी, कंधार

लोहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे. मतमोजणी १४ टेबलांवर होणार असून, मतमोजणीच्या २५ फेऱ्या होणार आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोहा विधानसभेचा अंतिम निकाल अपेक्षित आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ.अरुणा संगेवार यांनी दिली.

लोहा विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. एकूण २ लाख २६ हजार ८३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख १७ हजार ६५१ पुरुष, १ लाख ९ हजार १८३ महिला, तर ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. लोहा विधानसभेसाठी ७५.२० टक्के मतदान झाले आहे. १० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. मतमोजणी शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे. मतमोजणी १४ टेबलांवर होणार असून, मतमोजणीच्या २५ फेऱ्या होणार आहेत. टपाली मतांच्या मोजणीसाठी ६ टेबल असणार आहेत. मतमोजणीसाठी २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळी ७.३० वाजता स्ट्रॉग रुमचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी होणार आहे.त्यानंतर मतदान यंत्रातील मतांची मोजणी केली जाणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सुक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक असे तीन कर्मचारी असणार आहेत. मतमोजणीपूर्वी उमेदवारांच्या समोर मशिनचे सील काढण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवारांचा प्रतिनिधी प्रत्येक टेबलवर असणार आहे. मतमोजणी केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. एक फेरी साधारण ३० मिनिटांत पूर्ण होईल. सकाळी ९.३० वाजता पहिल्या फेरीचा कौल हाती येईल. मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतदान केंद्रांवरुन वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व फेऱ्या पूर्ण होतील आणि लोह्याचा आमदार कोण हे कळणार आहे. मतमोजणी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी श्रीकांत लालगे, नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, नायब तहसीलदार संदीप हाडगे, नायब तहसीलदार रेखा चामणर, नायब तहसीलदार उत्तम मुद्दीराज, नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, नायब तहसीलदार पावडे, नायब तहसीलदार राजेश पाठक, नायब तहसीलदार अशोक मोकले, पुरवठा निरीक्षक अधिकारी खैरे, निवडणूक समन्वयक मन्मथ थोटे, सहाय्यक महसूल अधिकारी तिरुपती मुंगरे, महसूल अधिकारी राजेश गायंगी, हरीराम राऊत, ईश्वर धुळगंडे, सुर्यकांत पांचाळ, दयानंद मळगे आदी परिश्रम घेत आहेत .

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

यावेळी शिवसेनेचे उमेदवार एकनाथ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार अॅड. चंद्रसेन पाटील सुरनर, शेकापच्या उमेदवार आशाबाई शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवकुमार नरंगले, अपक्ष उमेदवार प्रा. मनोहर धोंडे  , माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुढील आमदार कोण

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *