कंधार शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच ; दोन दिवसात सहा लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून दोन दिवसात सहा लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे नव्या पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आव्हान दिल्याची चर्चा आहे.

शहरातील महात्मा फुले कॉलनी येथील शिक्षक चंद्रकांत कांबळे हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे
कुलूप तोडले आणि ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सोने व चांदीचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणाला काही तास लोटले नाही तोच स्वप्नभूमी परिसरातील शिक्षक नागनाथ मोरताटे यांच्या घराचे कुलूप
तोडून चोरट्यांनी रोकड व दागिने मिळून ४ लाखांचा ऐवज चोरुन नेला.

लागोपाठ घडलेल्या या चोऱ्यांमुळे रहिवासी भयभीत झाले आहेत. दोन्ही प्रकरणात कांबळे व मोरताटे यांनी कंधार पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या आहेत. दोन्ही पोलिसांना आव्हान प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास उपनिरीक्षक केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.

या दोन्ही घरफोड्यांच्या प्रकरणात एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. शहरासह तालुक्यात मटका, गुटक्याने थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांसह जनतेत घबराटीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी सुरू असताना दुसरीकडे चोऱ्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना चोरीच्या वाढत्या घटना आणि शेतकऱ्यावर निसर्ग कोपल्याने दिवाळी गोड होण्याऐवजी कडू होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालून चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करुन व्यापारी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *