कंधार ; दिगांबर वाघमारे
प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया- मेक फॉर इंडिया या योजनांची प्रेरणा घेऊन उस्मान नगर येथील तरुण तथा अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रतिक देशमुख याने बांधकाम क्षेत्रातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने देशातच नव्हे तर जगातील पहिले अॅप्लिकेशन ठरावे असे “Civilpad” ( सिव्हिलपॅड ) नावाने मोबाईल अॅप बनवले.
देशातील या पहिल्या अॅप्लिकेशन चे उदघाटन बड्या शहरातील नामांकित हॉटेल मध्ये किंवा मंगल कार्यालयात न करता गावाकडच्या प्राथमिक शिक्षण घेतलेल्याच शाळेत, सर्व गुरुजनांच्या उपस्थितीत माता पिता यांच्या हस्ते करून समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
नांदेड जिल्ह्यातील उस्मान नगर चा तरुण प्रतिक प्रदीपराव देशमुख याने तयार केलेल्या Civilpad या मोबाईल अॅप्लिकेशन चा उदघाटन सोहळा उस्मान नगर येथील समता विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
आदर्श शिक्षक, ऋषितुल्य व्यक्तीमत्व मा.शा.शं. जहागिरदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात प्रमुख वक्ते गुरुवर्य श्री.प्रमोद मिरजकर ( विभागीय अभियंता, लातूर ) हे होते. तर अॅप्लिकेशन चे उदघाटन गृहीणी असलेली प्रतिक ची माता सौ. स्मिता देशमुख व शेतकरी तथा ग्रामिण पत्रकार असलेले पिता प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री.कमलाकरराव देशपांडे, सहसचिव श्री.तू.शं.वारकड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करतांना प्रमोद मिरजकर यांनी अॅप्लिकेशन विषयी उपस्थितांना सविस्तर माहीती दिली. या वेळी बोलतांना मिरजकर म्हणाले कि माझा विद्यार्थी प्रतिक देशमुख याला मी थेअरी शिकवली आणि त्याने प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यामुळे शिक्षकांनाही अभिमान वाटावा असे कार्य प्रतिक ने केले असे त्यांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात वारकड गुरुजी यांनी स्वागतपर भाषण केले तर प्रसाद पाडाळकर, आदित्य जहागिरदार यांनी अॅप्लिकेशन चा वापर, त्याचे फायदे, रोजगार निर्मिती, व्यवसाय आदी गोष्टींवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्रतिक प्र. देशमुख याने केले तर शा.शं.जहागिरदार यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन कलाध्यापक राजीव अंबेकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड यांनी मानले.
कोव्हिड नियमांचे पालन करून सॅनिटायझर, मास्क सह सोशल डिस्टंसिंग चा वापर करून कार्यक्रम घेण्यात आला.