कुरुळा ; विठ्ठल चिवडे
माहे ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हाती आलेल्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.मोठ्या प्रमाणात पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.दरम्यान कृषी व महसूल पथकाकडून बाधित क्षेत्रांचे पंचनामे होऊन दिपावलीच्या मुहूर्तावर खचलेल्या बळीराजास आर्थिक आधार होणार आहे.
कंधार तालुक्यातील सहा महसूल मंडळास प्राप्त निधीचा फायदा होणार असून त्याअंतर्गत कुरुळा व दिग्रस महसूल मंडळातील सर्व गावांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.येत्या दोन दिवसात खातेनिहाय एकूण रकमेच्या पन्नास टक्के रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत वितरित होणार असल्याची माहिती महसूल मंडळाकडून प्राप्त झाली आहे.
कुरुळा व दिग्रस मंडळातील अतिवृष्टीमुळे एकूण ७,०५७ हेक्टरवरील बाधित क्षेत्राचे महसूल व कृषी विभागाकडून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष पंचनामे झाले.त्यानुसार ६०% पेक्षा अधिक नुकसान झाल्याची बाब अहवालातून स्पष्ट झाली असून १०,८०० शेतकऱ्यांना हेक्टरी १०,००० याप्रमाणे पहिल्या टप्प्यात पन्नास टक्के निधीची उपलब्धता झाली आहे.
तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी कुरुळा मंडळातील बाधित पिकांच्या पंचनाम्याचे आदेश काढले होते.अतिवृष्टीमुळे हाती येणाऱ्या मूग उडीद यासह सोयाबीन,कापूस पिकांचे जाग्यावरच नुकसान झाले.त्यामुळे मंडळातील शेतकऱ्यांना भरगोस नसली तरी तात्पुरत्या स्वरुपात दिलासादायक आर्थिक मदत मात्र यातून होणार आहे.
** प्रतिक्रिया:
अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झाले होते.त्यानुसार शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे.सद्यस्थितीस एकूण क्षेत्राच्या पन्नास टक्के निधी मंजूर झाला असून एन डी सी बँकेमार्फत येत्या दोन दिवसात खात्यावर निधी टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
- ** विजय चव्हाण
तहसीलदार कंधार