नांदेड;
सामान्य माणूस केंद्र बिंदू मानून माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांनी काम केले. देशामध्ये मोठया प्रमाणात उद्योग वाढवून रोजगार निर्मिती केली. देश आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण व्हावा ही संकल्पना पंडित जवाहरलाल नेहरु यांचीच होती असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
येथील कुसुम सभागृहात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते.
पं.जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभ भाई पटेल, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी अथक प्रयत्न करुन बालशाली भारत बनविण्यात मुख्य भूमिका वठवली. त्यांनी स्वातंत्र्यासाठी व त्यानंतर देशातील सामान्य व्यक्तीला केंद्र बिंदू मानून काम केले. परंतु सद्याचे भाजप सरकार सामान्य माणसांसाठी नव्हे तर मुठभर धनदांडग्यांसाठी काम करीत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठीचे व्यवस्थापन भाजपा करत आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांचा इतिहास पुसण्याचे पाप या सरकारकडून होत आहे. जरी भाजपाने हा प्रयत्न सुरु ठेवला तरी हा इतिहास पुसला जाऊ शकत नाही. मात्र असा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला.
……………………………………………………………………….
लोकशाही विरोधी शक्तीचा बिमोड केला तरच
पुढची पिढी माफ करेल-अॅड.राज कुलकर्णी
नांदेड,दि.15- लोकशाहीला सुरुंग लावून हुकुमशाही स्थापित करण्याचे काम सद्या देशात सुरु आहे अशा लोकशाहीविरोधी शक्तीचा बिमोड केला तरच पुढची पिढी माफ करेल असे प्रतिपादन सुप्रसिध्द विचारवंत अॅड. राज कुलकर्णी यांनी केले आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील कुसुम सभागृहात रविवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जीवन प्रवास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड.राज कुलकर्णी बोलत होते.
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण तर जिल्हयाचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प.च्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, तालुकाध्यक्ष अॅड.निलेश पावडे, सतिश देशमुख तरोडेकर, शमीम अब्दुला, किशोर स्वामी, सौ.कविता कळसकर, सरिता बिरकले, ज्योत्सना गोडबोले, नगरसेवक प्रशांत तिडके, संजय पांपटवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना अॅड.राज कुलकर्णी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशाची परिस्थिती नाजूक होती. अशा काळात देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केले आहे.
देशात भाभा अणुसंशोधन संस्था, भारतीय आयुर्विज्ञान संस्था, इसरो भारतीय तंत्रज्ञान संस्था, शैक्षणिक संस्था पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या काळातच स्थापन झाल्या आहेत. परराष्ट्र धोरणाची पायाभरणीही त्यांच्याच कार्यकाळात झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा चांगली रहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
सध्या घराणेशाहीवर टीका करण्याचे काम सुरु आहे. मात्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी स्वातंत्र्यासाठी साडेनऊ वर्षे कारावास भोगला. त्यांच्याच कुटुंबातील 8 ते 9 जणांनी स्वातंत्र्यासाठी कारावास भोगला. घराणेशाहीवर टीका करणार्यांनी नेहरु व गांधी कुटुंबांचा त्यागही समजून घेणे गरजेचे आहे. देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळून देण्याचे काम व महात्मा गांधीजींच्या विचारातून जगातील सर्वात मोठी लोकशाही निर्माण करण्याचे काम पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केले आहे. विकासाची मुहूर्तमेढ रोवणार्या पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल अपप्रचार करण्याचे काम गेल्या 6 वर्षात भाजपाकडून सुरुच असल्याचा आरोपही अॅड.कुलकर्णी यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.