मेहनत न करणारांचं रान कसं पिकलं ?
म्हणून म्हणतो ज्योतिबा,गणित कुठं चुकलं ?
मायबाप शेतामंधी राबराब राबले
शिकतात पोरं म्हणून आशेवर जगले
चिपाडाचं जिणं पण माणसावनी वागले
त्यांच्याच म्होरं कामून बाप्पा भोदगिरे लागले
तोंडचा घास आेढतो त्याला म्हणायचं कसं आपलं ?
कोण कुठले बाजीराव कारभारी झाले
पांढरेशिप्पत हत्ती त्यांच्या दाराम्होरं आले
दहादा करती सलाम त्यांना,होई त्यांचे भले
इतके सारे अनर्थ सांगा कोणी बरं केले
ज्यांच्यावर टाकला विश्र्वास,त्यांनीच मुंडकं आमचं कापलं
शिकणारे शिकतात, वरवर चढतात
सिलीकॅानव्हॅली मध्ये मस्तपैकी रमतात
कुणब्यांची पोरं मात्र थडीवर हिंडतात
पोथ्यांचे दाखले देत नुसत्या बाता झोडतात
दिल्ली ते गल्ली पर्यंत सा-या पुड्या सोडतात
शाळा आली गावात तरी, तांबडं नाही फुटलं
पाचटीचं असतं घर, माहित ज्यांना नसतं
साखरेच्या गोणीवर नाव त्यांचं असतं
ऐतखाऊ लोकांचं बस्तान इथं बसतं
पोट भरलं त्यांचं म्हणून शहाणपण सुचतं
पाणी पितं शहर आणि तळं आम्ही राखलं
मती आली,गती आली बोलावं की आता
शिकलेली पोरं पण कोरड्याच बाता
शाळा आली,पीठं आली लिहा नव्या कथा
तुमच्यासाठी लिहून ठेवलीय तुकोबांनी गाथा
किती दिवस सोसता लेकहो,भडकू द्या की माथा
तुम्ही आम्ही भाऊ-भाऊ, मग का हो आपलं तुपलं ?
जगदीश कदम
दिशादर्शक चित्राचा भाग: सुनील यावलीकर