कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्रीय आरोग्य सहसचिवांनीदेखील प्रयत्न वाढविण्यासाठी केल्या महत्त्वाच्या सूचना


मुंबई
 महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेन्मेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.७ रोजी दिले.
सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दूरदृश्य बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी विशेषत: मुंबईमधील प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले मात्र राज्यातील कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांनी अधिक परिणामकारक उपाय योजावेत असे सांगितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे त्याचप्रमणे टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित हे देखील सहभागी होते.
आरोग्यमंत्र्यांनी देखील यावेळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचना केल्या तसेच प्लाझ्मा थेरपीविषयीही सांगितले.  
रुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर
खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्च घेण्याच्या तक्रारी येत आहेत ही गंभीर गोष्ट आहे. जिल्हा प्रशासन आणि पालिकांनी याला तातडीने चाप लावला पाहिजे व योग्य ती कडक कारवाई लगेच केली पाहिजे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बेड्स आणि रुग्णवाहिका नियोजन हा महत्त्वाचा भाग आहे, याकडेही खूप काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
प्रमुख शहरांमध्येही जम्बो सुविधा
मुख्यमंत्री म्हणाले, धारावी आणि वरळी येथील प्रादुर्भाव रोखण्यात आला त्यावेळी तर सध्या उपयोगात आणणारी विशेष औषधेही उपचारासाठी देण्यात येत नव्हती. उपलब्ध वैद्यकीय साधन सुविधांचे उत्तम नियोजन करून ही साथ या भागात आटोक्यात आणण्यात आली. मुंबईमध्ये जशा जम्बो सुविधा उभारण्यात आल्या आहेत तशाच राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये देखील उभारण्यास प्राधान्य देण्यात आले असून यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यावर भर आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव विशेषत: डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरत आहे तो रोखणे खूप गरजेचे आहे.या आरोग्य सेवकांना संरक्षित करणे व त्यासाठी त्यांना तशा स्वरूपाचे प्रशिक्षण द्यावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आजमितीस व्हेंटिलेटरवर खूप कमी संख्येने रुग्ण आहेत, त्यांना सर्वात जास्त गरज असते ती ऑक्सिजनची.
महाराष्ट्रात कुणीही गाफील राहू नका. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पसरणार नाही तसेच दुसरी लाट येणार नाही याकडे लक्ष द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रयत्न अधिक वाढवा
यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की आपण निश्चितपणे चांगले प्रयत्न करीत आहात पण आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कंटेन्मेंट क्षेत्राच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी. घरोघर भेटी सुरूच ठेवाव्यात, जे अजूनही सक्रिय कंटेन्मेंट असतील त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे. रुग्णाचे ८० टक्के संपर्क शोधून ७२ तासांच्या आत त्यांच्या सर्वांच्या चाचण्या कराव्यात, नवीन काही हॉटस्पॉट निर्माण होत आहेत का ते बारकाईने पाहावे, १४० चाचण्या दर दशलक्ष दर दिवशी प्रत्येक जिल्ह्याने केल्याच पाहिजेत, एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली तरी अति आत्मविश्वास न ठेवता अशा व्यक्तींच्या लक्षणानुसार आरटीपीसीआर चाचणी केलीच पाहिजे, चाचणी संकलित केल्यानंतर २४ ते ३६ तासांत अहवाल आलाच पाहिजे. रुग्ण सेवा आणि रुग्णालय व्यवस्थापन यांचा मृत्यू दर कमी होण्यात मोठा भाग असतो, त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सूचना केल्या.
वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांनी लवकर रुग्णालयात यावे
लव अग्रवाल म्हणाले, साधारणपणे वृद्ध व्यक्ती या रुग्णालयांत येण्यास टाळाटाळ करतात आणि मग प्रकृती गंभीर झाली की धावाधाव करता यामुळे मृत्यू दर वाढतो आहे. देशाच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातील आरोग्य सेवकांना जास्त झाल्याचे आढळते हे प्रमाणही कमी करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. देशात हे प्रमाण ७ टक्के तर महाराष्ट्रात सरासरी २१ टक्के प्रमाण आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राने काही गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर कोरोना मुकाबल्यात महाराष्ट्र हे देशासमोरचे एक उदाहरण होऊ शकते असेही ते म्हणाले.
सध्या महाराष्ट्रातील मृत्यू झालेल्या रुग्णांचे विश्लेषण केले तर असे आढळते की, ४५ ते ५९ या वयोगटात १७.९ टक्के मृत्यू इतरही आजार असलेल्या रुग्णांचे आहेत. ६० ते ७४ या वयोगटात २९.७० टक्के मृत्यू इतरही आजार असलेल्या रुग्णांचे तसेच ४० टक्के मृत्यू हे ७५ पेक्षा जास्त वयोगटातील इतर आजार असलेल्यांचे आहेत.
१० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित
राज्यातील ११ जिल्ह्यांमधील मृत्यू दर हा राज्याच्या सरासरी मृत्यू दरापेक्षा जास्त आहे. पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, नागपूर, पालघर, सांगली या १० जिल्ह्यांमधून गेल्या आठवड्यात ७९ टक्के रुग्ण आढळले आहेत असे लव अग्रवाल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितलं. महाराष्ट्राचा मृत्यू दर ३.४७ टक्के असून देशाचा मृत्यू दर २.०७ टक्के आहे. पुणे २.३७ टक्के, ठाणे २,७२ टक्के, मुंबई ५.५० टक्के, नाशिक २.८२ टक्के, औरंगाबाद १.९७ टक्के, कोल्हापूर २.५३ टक्के, रायगड २.७८ टक्के , पालघर १.९३ टक्के, जळगाव ४.५१ टक्के, नगर १. १९ टक्के अशी प्रमुख जिल्ह्यांची मृत्यू दराची आकडेवारी असून ती कमी करण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे असे ते म्हणाले.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *