पालकमंत्र्यांनी घेतला ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’च्या उभारणीचा आढावा ;अभिनव संकल्पना २६ जानेवारी रोजी घेणार मूर्त स्वरूप

नांदेड : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’च्या कार्यालयाला भेट देऊन उभारणीची पाहणी केली.

‘अशोक चव्हाण सेवा सेतू’ या सुविधेचे येत्या २६ जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. ना. अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्यामार्फत वैयक्तिक स्तरावर सुरू होणारी ही खासगी सुविधा म्हणजे एक कॉलसेंटर असून, येथील दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून नागरिकांना शासकीय कामकाजाबाबत आपल्या अडी-अडचणी किंवा तक्रारी मांडता येणार आहेत. दररोज शेकडो नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी नांदेड येथील आपल्या कार्यालयात येतात. त्यातील अनेक अडचणी या दूरध्वनीवरून मार्गी लावण्यासारख्या असतात.

त्यामुळे अशा नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवाव्या, या हेतूने ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’ ही सुविधा सुरू केली जाणार आहे. या कॉलसेंटरचा क्रमांक लवकरच जाहीर केला जाईल. प्रारंभी प्रायोगिक स्तरावर ही सुविधा भोकर विधानसभा मतदारसंघासाठी सुरू होणार आहे. नांदेड शहरात उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक कॉलसेंटरची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली व तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *