नांदेड, दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज रुग्णालयाच्या परिचारीका श्रीमती ममता वुईके यांना लस देवून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी वैद्यकीय महाविद्यालयात लसीकरण केंद्राचा आढावा घेवून कोविशिल्ड ही सिरम इनस्टीटयुट ऑफ इंडियाची लस असून ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे सांगितले. आरोग्य सेवेतील डॉक्टर, परिचारीका व कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी असे, आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी केले.
वैद्यकीय महाविद्यालयातील एकुण 1 हजार 524 कर्मचाऱ्यांची या लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. ज्यांचे लसीकरण होणार आहे त्यांना एक दिवस आधी कोविड ॲपमार्फत एसएमएस पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या ओळखपत्राची खात्री करुन सकाळी 9 ते 5 यावेळेत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून बाहरुग्ण विभागात लस देण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर लाभार्थींना अर्धातास वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल. लसीकरणानंतर लस घेणाऱ्यांना घाम येणे, चक्कर येणे किंवा इतर कुठल्याही स्वरुपाच्या तक्रारी आल्या तर संबंधितांवर तात्काळ उपचार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, असे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गट्टाणी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण तसेच डॉ. भुरके, डॉ. अनमोड, डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. समीर, डॉ.सलीम तांबोळी, डॉ. सुधा करडखेडकर, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. इशरत करिम आदी उपस्थित होते. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. शितल राठोड, डॉ. उबेद इत्यादीसह अनेक अध्यापक, परिचारीका व वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी डोळे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. ओमप्रसाद दमकोंडवार, डॉ. सोनाली कुलकर्णी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.