नांदेड : डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरीच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या कचराकुंडीच्या बाजूला एका मानवी मृतदेहाचे लचके डुक्करांनी तोडल्याचा लाजिरवाणी आणी संतापजनक प्रकार घडला आहे. सदरील घटनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील आणि वैद्यकीय रुग्णालयातील अनेक संतापजनक प्रकार यापूर्वीही पुढे आले आहेत .रुग्णालय प्रशासनाचां होत असलेल्या बेजबाबदारपणा आता कळस गाठला आहे. रुग्णांवर उपचारासाठी करण्यात येणारी टाळाटाळ ,रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक यासह अनेक बाबींनी कळस गाठला आहे. आता त्यात मोठी भर पडली असून शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या कचराकुंडी लगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडला होता . दोन ते तीन दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. आज दिनांक 20 रोजी सकाळी डुकराची झुंड त्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे रुग्णालयातील नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर डुकरांना हकालण्याचा प्रयत्न केला. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मानवी मृतदेहाचे लचके तोडणाऱ्या या घटनेचा सर्वच क्षेत्रातून निषेध केला जात असून रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.