प्रतिनिधी ; दिगांबर वाघमारे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केले.
कंधार येथील प्रियदर्शनी मुलींच्या विद्यालयात सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ.राजश्री शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णाभाऊ भोसीकर, पत्रकार तथा स्वच्छतादूत
राजेश्वर कांबळे, पत्रकार मुरलीधर थोटे, किशोर अंबेकर, सुधीर तपासे, प्रा.नारायण चव्हाण, प्रवीण जोगे, अशोक कांबळे, सुनील पाटील, मंन्मथ मेळगावे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पत्रकार तथा स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे यांना
‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर पत्रकार मुरलीधर थोटे यांना जननायक लोकगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना संजय भोसीकर म्हणाले की, देशातील महापुरुष हे जाती-धर्माला जेडणारे सेतू आहेत. मानवतेसाठी त्यांनी काम केलेले आहे. त्यांच्यात आपण भेदभाव करु नये. लोकांनी महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले आहे. त्यांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढले पाहिजे. बुद्धाचे तत्त्वज्ञान व शिवाजी महाराजांचा पराक्रम ही देशाची खरी ओळख आहे.
शिवरायांच्या कृषी विषयक धोरणाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी लोकांना व शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजव्यवस्था निर्माण केली होती. म्हणून शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी सुखी होते. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कर्जमाफीचे धोरण अमंलात आणले होते. शेतकऱ्यांना सात बारा देऊन शेतकऱ्यांना सन्मान देखील दिला होता. म्हणून शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे कल्याणकारी राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी विषयक धोरण हे विविध जाती-धर्माच्या लोकांना रोजगार देणारे, समाज व्यवस्था अबाधित ठेवणारे व शेतकऱ्यांचे कल्याण करणारे होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सोनटक्के यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.