शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीपुरक उद्योगात पशु व दुग्ध व्यवसायाला चालना महत्वाची – पालकमंत्री अशोक चव्हाण

मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेतर्गंत पशु चिकित्सा अँम्बुलन्सचे लोकार्पण

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्याच्या विविध विकास कामामध्ये ग्रामीण भागात शेतीला पुरक उद्योगाची जोड देण्यात व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दुग्धव्यवसाय हा अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडू शकेल. या व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला पुरेशा साधन सामुग्रीसह एक पशु चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असे, प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना त्यांच्या आजारी पडलेल्या पशुधनाला त्यांच्या गावातच उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या तीन पशु चिकित्सा व उपचार वाहनाचे लोकार्पण आज जिल्हा परिषदेच्या प्रागंणात त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कोविड अंतर्गंत असलेल्या नियमाचे पालन करुन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महापौर मोहीनी येवनकर, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पदमा सतपलवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शदर कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव नागेलीकर, सुरेशराव अंबुलगेकर याच्यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्याची संख्या व क्षेत्रफळ अधिक आहे. कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात आपण जिल्ह्याच्या विकासासाठी 355 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात आदिवासी विकास विभागामार्फत वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यातून साकारणाऱ्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचल्यास खऱ्या गरजूपर्यंत पोहचता येईल असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन माहिती, शिक्षण व प्रसार यावर जिल्हा परिषदेने भर द्यावा असे सूचित केले. नांदेड जिल्हा परिषद ही वैविध्यपूर्ण योजना अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहिली आहे. जिल्ह्याने केलेल्या या विविध कामगिरीचे पालकमंत्री महोदयांनी कौतुक केले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाओ, पशु संवर्धन विभाग, माझे गाव सुंदर गाव, प्रत्येक गावाला स्मशान, दहन-दफन भूमी यांची माहिती देणारे स्टॉल्स जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आले होते. या स्टॉल्सलाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शासकीय योजनाच्या माहितीचा प्रसार अशा पध्दतीने तालुका पातळीवर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी जिल्हा परिषदेला सूचना केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी करुन जिल्हा परिषदेमार्फत हाती घेतलेल्या विविध नाविण्यपूर्ण योजनाची माहिती दिली. कृषी व पशु संवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी यावेळी आपल्या मनोगतात पशुसंवर्धन विकास विभागाच्या अनुषंगाने पालकमंत्र्याचे लक्ष वेधले.

यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना दहा हजार रुपयांचे सानुगृह अनुदानाचे धनादेश संबंधिताच्या कुटूंबियाकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. याच बरोबर पशुसंवर्धन विभागाची माहिती पुस्तिका, बाल विवाह प्रतिबंध अधिनियम अंतर्गत शपथ, माझे गाव सुंदर गाव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील स्मशानभूमी, दहन, दफन भूमी नसलेल्या गावांना गायरान जमिनीच्या‍ सनदचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने माहितीचे प्रदर्शन भरवण्यांत आले होते. श्रध्देय डॉ. शंकरराव चव्हासण व कै. कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दैनिक सत्यप्र भाने काढलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते‍ करण्यात आले. या कार्यक्रमाला पशुवैद्यकीय प्रादेशिक सह आयुक्त डॉ. मधुसुदन रत्नपारखे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी भुपेंद्र बोधनकर, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविण घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. सपना पेंदुलवार यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *