नेमकं कुठं काय चुकते
कळत नाही सालं
पण.. पुन्हा एकदा द्रोपदीचं
वस्त्रहरण झालं !
कौरवांचा ट्रॅक रेकॉर्ड
जगजाहीर आहे
‘दुर्या’ तसा उल्लू बनवण्यात
भलताच माहीर आहे !
‘द्रोण’ ‘भिष्म’ ठोकू लागतात
नौटंकीची पालं..
पुन्हा एकदा द्रोपदीचं
वस्त्रहरण झालं !
‘अभिमन्यू’ ओ. के. असेल
वाटलं होतं मधे
मात्र टेस्ट रिपोर्ट दावतो
नुसते हायटेक गधे
आम्ही इतके बैताड असू
लक्षात नाही आलं ..
पुन्हा एकदा द्रोपदीचं
वस्त्रहरण झालं !
कधी कधी वैताग येतो
कधी शंका येते
.. की ‘द्रोपदी’च ‘कौरवां’च्या
हातात पदर देते ?
मरू दे ना यार.. काय
जाते माह्यावालं ?
पुन्हा एकदा द्रोपदीचं
वस्त्रहरण झालं !
..पण पुन्हा वाटते, नाही गड्या
असं नाही मरायचं
‘शिवा-बापू-भीम’ यांचं
साॅल्लीड कॉकटेल करायचं !
विकृतिचं संकट पुन्हा
दारावरती आलं..
पुन्हा एकदा द्रोपदीचं
वस्त्रहरण झालं !!
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर 14/03/2017