कोरोणा अचानक चायना मध्ये कसा काय उपटला ? ह्या प्रश्नाचं उत्तर जसं जगात कुणालाही देता येणार नाही, तसचं अलीकडे फडणवीसांना नेमकं काय झालं ? याचंही उत्तर अख्ख्या ब्रम्हांडात कुणी देवू शकणार नाही. फार काय, शुद्धीवर असताना फडणवीसांना देखील आपण नेमकं काय करतो आहोत, याचा नीट अर्थ लागत नसावा ! आणि.. बहुधा गोमूत्राशिवाय ते दुसरं काही घेतही नसावेत !
केवळ सत्ता गेल्यामुळे माणूस एवढा बेभान होऊ शकतो का ? फडणवीसांचा कौटुंबिक वारसा, त्याचं महापौर ते विरोधी पक्षनेता इथपर्यंतच एकूण राजकारण, सामाजिक जीवनातला त्यांचा या आधीचा वावर हा निश्चितच इतका उद्वेग आणणारा कधीच नव्हता. एका राजकीय खेळीचा भाग म्हणून आणि लॉटरी लागावी तसं, मुख्यमंत्रीपद मिळाल्या नंतर मात्र त्यांच्या फुग्यात जास्तच हवा भरायला लागली होती. आणि तसेही त्यांच्या हातात होते तरी काय ? किती हवा भरायची आणि केव्हा काढून घ्यायची, हे सारं नियोजन तर दिल्लीच्या हातात होतं !
ही सारी वस्तुस्थिती लक्षात घेतली तरीही अलीकडे त्यांची जी काय सर्कस सुरू असते ती बघता, फडणवीसांना हल्ली नेमकं काय चावलं आहे, असा प्रश्न कुणालाही पडेल ! गेल्या ७/८ वर्षांच्या काळात भाजपाच्या राजकारणात ज्या उथळ आणि उठवळ संस्कृतीला उत आलाय, त्या पातळीचे नेते फडणवीस कधीच नव्हते. फार काय संपूर्ण विदर्भातील भाजपाच्या आजवरच्या इतिहासात इतक्या उथळ राजकारणाचं दुसरं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. फडणवीसांच्या तुलनेत योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज, हे देखील आता बऱ्यापैकी सभ्य वाटायला लागलेत.
या पार्श्वभूमीवर विचार केल्यास फडणवीसांचा थयथयाट अनाकलनीय आहे. त्यांच्या कुटुंबातून ज्या प्रकारची प्रतिक्रिया सत्ता गेल्यानंतर आली, तशा प्रकारचा जळाल्याचा धूर आजवरच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या किचन मधून आला नसेल. त्या प्रतिक्रिया बघून अवघा महाराष्ट्र थक्क झाला ! एकूण परिस्थिती काय.. आपण बोलतो काय.. कुणालाच भान उरलं नाही. वर्षा बंगल्याच्या भिंतीवर जे काही लिहून ठेवलेलं आढळलं, ते तर धक्कादायकच होतं.
फडणवीस यांच्या हातात अनपेक्षित सत्ता आली, फुगा फुगला. अति आत्मविश्वासात स्वतःच्याच हातानं टाचणी लावली, फुगा फुटला. ह्यात कोणाचीही काहीही भूमिका नव्हती, हे स्पष्ट आहे. तरीही एवढा थयथयाट का ? असे स्वतःचेच कपडे स्वतःच फाडून घेण्याची गरज का पडावी ? त्यांचे पूर्णतः संतुलन बिघडले आहे, याची जाणीव कुणीही त्यांना करून देत नसावेत का ? मुळात आधीचे फडणवीस इतके अपरिपक्व आणि आक्रस्ताळे कधीही नव्हते ! तरीही असे का व्हावे ? कोण होतास तू, काय झालास तू..? ही कव्वाली जणू फडणवीस यांच्यासाठीच लिहून घेतली असावी, असे वाटते.
पण हे प्रकरण असे हसण्यावारी उडवून देण्यासारखे आहे का ? फडणवीस यांना काय एवढाही कॉमन सेंस नसेल का ? मला मात्र तसे वाटत नाही ! मग नेमकं काय झालं असेल ? काय कारणं असतील, असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला सतावतो आहे !
यासाठी आपल्याला २०१९ ची लोकसभा आणि तिचा निकाल लक्षात घ्यावा लागेल. आधीच्या एखाद वर्षांपासून देशात मोदी विरोधी वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती. सरकार बहुधा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत होते. मेक इन इंडियाचा फुगा फुटला होता. त्यामुळे भाजपाच्या जागा नक्कीच कमी होतील, अशी हवा राजकीय वर्तुळात पसरायला लागली होती. भाजपा विविध राज्यातील विधानसभा एकापाठोपाठ हरतांना दिसत होती. गुजरातमध्ये थोडक्यात वाचली. गोव्यामध्ये हरली, पण सरकार बसवलं. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये सत्ता गेली होती. हरियाणा, मध्येही हरलीच होती पण जोडतोड करून सरकार बसवलं. कर्नाटक मध्ये पण शह बसलाच होता. अशा पार्श्वभूमीवर भाजपाच्या किमान ४०/५० जागा नक्कीच कमी होणार, असा अंदाज होता. मित्र पक्षांची मदत घेतल्याशिवाय सरकार बनूच शकत नाही, अशी अवस्था होती. खुद्द भाजपा वाले सुद्धा २३० च्या आसपास आकडा जाईल, अशी गणितं मांडत होते. म्हणजेच तो आणखी कमी असण्याची शक्यता होती. आणि इथेच खरी मेख आहे.
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नसले, तरी विपक्ष कुठेही एकजूट दिसत नव्हता. उलट मायावती सारख्या नेत्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. सौदेबाजीची संधी शोधण्यात बरेच विरोधी पक्षातील नेते गुंतले होते. एकमेकांवर कुरघोडी करत होते. अशावेळी पुन्हा एकदा भाजपा सरकार केंद्रात येण्याची शक्यता जास्त होती. पण इतर मित्र पक्ष अशावेळी वरचढ झाले असते. आणि मोदी यांच्या नावावर फुली मारल्याशिवाय समर्थन नाही, अशी अट त्यांनी घातली असती. अशावेळी जर सरकार बनवायचे असेल, तर नेता म्हणून भाजपाला नवे नाव पुढे करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. हा अंदाज घेवूनच गडकरींनी मोदी सरकारच्या धोरणाबद्दल विरोधी सूर लावायला सुरूवात केली होती. हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. ही परिस्थिती लक्षात घेवूनच मोदी शहा यांनी मित्र पक्षासमोर लोटांगण घालायला सुरुवात केली होती. बिहार मधील लोकसभा जागा वाटप करतांना शहा किती लाचार झाले होते, हा प्रसंग लक्षात घेतला तरी आपल्याला सारे गणित समजून येईल. महाराष्ट्रातही सेनेची पाठ खाजवून देण्याचा कार्यक्रम नियमितपणे फडणवीस नाईलाजाने आणि केविलवाण्या चेहऱ्यानं पार पाडत होते. सेनाही खाजवून घेण्यातली मजा लुटत होती. रोज ठोकत होती. आणि खाजगीमध्ये तिकडे ‘ नाच मेरी बुलबुल ‘ ची फर्माईश पण करत होती. महाराष्ट्रातली बुलबुल मस्त नाचत होती.
मात्र लोकसभेच्या धक्कादायक निकालाने सारेच चित्र बदलले. भाजपच्या स्वतःच्या अंदाजापेक्षा त्यांना सुमारे १०० जागा जास्त मिळाल्या. राक्षसी बहुमत मिळाले. इथूनच मग मोदी यांच्या रथाचे छोटे मोठे घोडे बेभान व्हायला सुरुवात झाली. सारेच सुसाट झालेत. नव्या मंत्रिमंडळात शहा थेट गृहमंत्री झाले आणि सारा देश, सारे विरोधी पक्ष त्यांना आईस क्रीम सारखे सॉफ्ट वाटायला लागले. केव्हा कुणाला गटकायचे याचा टाईम टेबल फक्त भाजपा नेत्यांनी म्हणजेच मोदी, शहा यांनी ठरवायचा होता. तो त्यांचा विशेषाधिकार होता.
देशात असा राजकीय प्रलय आला असतांनाच महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका सहा महिन्यावर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी मधील भले भले लोक मोदी, शहा यांच्या नावाचा पट्टा, फडणवीस यांच्या हाताने आपल्या गळ्यात बांधून घेण्यासाठी रांगेत उभे होते. अगदी खानदानी लोकही त्यांचे पाय चाटायला लागले, पायावर लोळण घ्यायला उतावीळ झाले होते. सारे बिस्किटांचे कारखाने जणू काही फडणवीस यांच्याच मालकीचे झाले होते. विरोधी नेत्यांची ही लाचारी बघून मोदी – शहा नंतरच आपणच, असा गॅस फडणवीस यांच्या फुग्यात घुसला नसता, तरच नवल ! तसेही एखाद्या महापंडीताच्या तोऱ्यात त्यांनी जाहीर करून टाकलेच होते, की ‘ लिहून ठेवा.. महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार हे प्रकरण बाद झालेले आहे.’ त्यावेळचा त्यांचा आवेश आणि चेहरा कमालीचा मग्रूर दिसत होता. महाराष्ट्रात आता विरोधी पक्ष चटणीलाही पुरणार नाही, अशा थाटात स्वतः फडणवीस आणि भाजपा कार्यकर्ते वावरत होते. त्यांचे जाऊ द्या, पण त्याच सुमारास राष्ट्रवादीच्या सर्वोच्च वर्तुळातील एका महत्वाच्या व्यक्तीसोबत माझी चर्चा झाली होती. वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रात तुमचा अधिकृत काय अंदाज आहे, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर त्यांनी फार फार तर ४०/४५ असं उत्तर दिलं. मी पुन्हा विचारलं, आणि काँग्रेसच्या किती येतील ? ते म्हणाले, अहो काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोंघाच्या मिळूनच ४०/४५ येतील. यावरून स्वतः विरोधी पक्ष कसा हादरलेल्या अवस्थेत होता, याची आपल्याला सहज कल्पना येवू शकते.
अर्थात त्यातून नेमकं काय चित्र तयार झालं होतं विधानसभे पूर्वी ..? तर.. १) देशात, नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. २) महाराष्ट्रात भाजपा – सेनेला किमान दोनशे जागा मिळणार !
३) विरोधी पक्षाला सध्यातरी महाराष्ट्रात काहीही भवितव्य नाही.
अर्थात यामुळे कोण कोणते राजकीय परिणाम झाले असतील, तर महाराष्ट्राच्या सात बारावर मोदी – शहा – फडणवीस ही तिन नावं अगदी फायनल आहेत, असा संदेश सर्वत्र गेला. त्यातूनच भाजपाच्या विशिष्ट नेत्यांची आधीची मुजोरी आणखी वाढली. आणि मग त्यातून निवडणुकी पूर्वीच मोठमोठे व्यवहार आगावू पक्के झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही पातळीवरून झाले असणे स्वाभाविक आहे.
या निमत्ताने प्रचंड मोठी उलाढाल करण्यासाठी सहज संधी संबंधित लोकापुढे होती. अशावेळी आयती गंगाच जर घरी चालून आली, तर मग ती अर्थातच केवळ अँटी चेंबर पर्यंतच मर्यादित थोडीच राहणार आहे ? म्हणजे थेट किचन पर्यंत देखील घुसली असणार ना ? मग सगळ्यांनीच मनसोक्त आंघोळी अॅडव्हांस मध्येच आटोपून घेतल्या असणार ! आणि.. सारे कसे उद्याच्या रंगी बेरंगी फेसांचे स्वप्न रंगवण्यात गुंग असतानाच.. अचानक गंगा आटली ! सारे शॉक मध्ये गेलेत ! क्षणभर काय होतेय हेच कळले नसणार कुणाला ! पण जेव्हा शुद्धीवर आले, तेव्हा मग सरळ दिल्लीवरून राजभवनात बांबू पोचला असणार आणि म्हणून एवढ्या सकाळी मग दिवाळी पहाट घाईघाईत उरकून घ्यावी लागली असेल, असे समजायला बरीच जागा आहे.
पण ती पहाट मैफल शरद पवार यांनी पुन्हा एकदा उधळून लावली. आणि मग फडणविस यांच्यासह सारेच पिसाळून गेले असतील. राजभवन वर आपला खानदानी गडी असूनही बार फुसका निघाला, पाळणा काही हलत नाही, उलट दिवसेंदिवस महाविकास आघाडी भक्कम होते आहे, मंत्रिमंडळाचे खाते वाटप उशिरा जरी झाले असले, तरी पक्के झाले आहे, हे बघून मग दिल्लीचे मालक आणि मुंबईचे दिवाणजी यांचे बीपी जोरात वाढले असणार. ज्यांच्यासोबत बागेचे वादे झाले असतील, तेही आता अस्वस्थ झाले असणार ! त्यांनीही आपला हिशेब करायला सुरुवात केली असणार ! आता बाग तर तुमच्या हातात राहिली नाही, तेव्हा आम्हाला मोकळे करा, असा तगादा संबंधित लोकांनी लावला असणार ! त्यांना काय, आपला धंदा महत्वाचा ! त्यांची सोयरिक फक्त सत्तेशी, व्यक्तीसोबत त्यांना काहीही देणंघेणं नसते. अशावेळी, त्यांना काहीतरी दिलासा देणे गरजेचे आहे. त्यातून तर हे, सरकार पाडण्याचा आभास निर्माण करणारे पोरकट चाळे होत नसावेत ना ? तशी शक्यता मला जास्त वाटते. अन्यथा जनतेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं जनमत आहे, हे काय फडणवीसांना कळत नसेल ? उद्धव ठाकरे यांचा ग्राफ अचानक वाढला आहे, याची काय त्यांना कल्पना आली नसेल ? तिकडे मोदी यांनी नुसताच गोंधळ घालून ठेवला आहे, नोटबंदी पेक्षाही जास्त भयंकर चूका मोदी करत आहेत, एवढं समजण्या एवढीही बुद्धी भाजपकडे नसेल का ? किमान संघातल्या लोकांना तरी फडणवीसांना तेवढी जाणीव करून द्यावी असे वाटत नसेल का ? फडणवीस आणि सर्कसचे अलीकडील माकडचाळे बघून जनतेला अक्षरशः किळस यायला लागलीय, हे सोशल मीडियावरून तर कुणाच्याही लक्षात येईल. मग फडणवीस यांना कळत नसेल का ? तरीही ते असे वागत आहेत, याचा अर्थ त्यांचे संतुलन बिघडण्याची काहीतरी गंभीर कारणे नक्की आहेत. आणि ती बहुधा अशाच आगावू प्रसाद वितरणाबाबतची असणार. मुंबईचा बाजार केवढा मोठा आहे, याचा जरा विचार करून बघा. आणि त्यामुळेच ‘ थांबा, आपली खिचडी लौकरच तयार होते आहे,’ असे संबंधित लोकांना भासाविण्यासाठी आणि वेळ काढण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू असावा, असे समजायला मोठा आधार आहे.
शिवाय भाजपाच्या तोंडाला आधीच रक्त लागलेलं आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. मोदी शहा यांना तर महाराष्ट्र अशाप्रकारे हातातून जाणे, खूप जिव्हारी लागले असेल. त्यांचा इगो भयंकर दुखावला असणार. आधीच त्यांचे राजकारण खुनशी स्वरूपाचे ! शिवाय महाराष्ट्रातील या फाजितीचा दूरगामी परिणाम इतर राज्यांच्या राजकारणावरही होऊ शकतो, ही भीती त्यांना आता सतावत असणार. त्यामुळेही ते फडणवीस यांना चूप बसू देत नसावेत. अशावेळी फडणीस तरी काय करणार बिचारे ? वास्तविक सत्ता येणे, जाणे ह्या गोष्टी चालतच असतात. पण मोदी शहा यांची संस्कृती मात्र वेगळी आहे..!
डाका घालणाऱ्या अनेक टोळ्या असतात. पण काहींना फक्त संपत्ती हवी असते, सोने, नाणे, पैसा हवा असतो. तर काहींना लुटीनंतर गावाचा विध्वंस करण्यात खरा आनंद मिळतो. भाजपा ही दुसऱ्या प्रकारात आनंद मानणारी विचित्र जमात आहे. याच विकृतीमधून त्यांनी शरद पवारांवर अटॅक करण्यासाठी इडीचा वापर केला होता आणि तिथेच ते फसले. शरद पवार म्हणजे काही नितीशकुमार नव्हेत, हे भाजपा वाले विसरले. शरद पवार चवताळले. कारण तसाही त्यांना पर्यायच उरला नव्हता. त्यांच्या तंबुतला एकेक पोटार्थी नेता सरळ अफजल खानाच्या चड्ड्या धुवायला धावत होता. राजभवन वरची राज्यपाल प्रायोजित पहाट मैफल बघता, जर शरद पवार मैदानात बॅटिंगला स्वतः उतरले नसते, तर राष्ट्रवादी मध्ये आणखी काय काय अनर्थ घडू शकले असते, याचा सहज अंदाज करता येतो. शरद पवार म्हणजे अडवाणी नव्हेत, हे भाजपाच्या लक्षातच आले नाही. काही का असेना, छोटं जरी असलं, तरी ते त्यांच्या स्वतंत्र साम्राज्याचे सम्राट होते. आणि सम्राटाचे बंड किती महाग पडू शकते, हे उद्धव ठाकरे यांनी भाजपाला अशा तऱ्हेने दाखवून दिले, की फडणवीस आणि अख्खी महाराष्ट्र भाजपा अजूनही बिचारे हळद तेल लावून शेकण्यात व्यस्त आहेत. सोसतही नाही आणि सांगताही येत नाही. त्यामुळे अंधारातच एकमेकांची शेकून घेवून समाधान मानत आहेत.
ह्यात आणखी एक गम्मत आहे. आज मोदी आणि शहा देशातले सर्वात पॉवरफुल नेते आहेत, असे भक्तांना व विचारवंतांना देखील वाटते. पण वस्तुस्थिती खरंच तशी आहे का ? मला स्वतःला मात्र तसे काही वाटत नाही. हां.. भाजपा मध्ये आज ते निर्विवाद मोठे नेते आहेत. देशाच्या सत्तेतही ते सर्वोच्च आहेत, यात संशय नाही. अगदी काही वर्षांपूर्वी अडवाणी हे भाजपा मधले अत्यंत पावर फुल नेते वाटत होते. आज त्यांची हालत काय आहे ? बाबरी मशीद पाडली तेव्हा कल्याणसिंह यांचाही ग्राफ एकदम आकाशाला भिडला होता. पक्षाचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आज त्यांची हालत काय आहे ? फार काय मोदी यांच्या उदयापूर्वी गडकरी सुद्धा अतिशय पावर फुल आणि भावी पंतप्रधान वगैरे वाटत होते. पण सद्या ते काय करतात ? ( अर्थात ते अजूनही पंतप्रधान होऊ शकतात..पण २०२४ च्या आधी. नंतर मात्र कठीण वाटते. असो.. ) या पार्श्वभूमीवर मोदी यांची परिस्थिती पवार यांच्या तुलनेत काय असेल ? ते शरद पवार यांच्यापेक्षा किती पटीने मोठे नेते असतील ?
या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल, तर मोदी स्वतःचा पक्ष काढू शकतात का ? आणि काढला तर त्यांना जनतेचे किती समर्थन मिळेल ? हा मुख्य प्रश्न आहे. मोदी यांची एकूणच कार्यपद्धती, अरेरावी, सूडबुद्धी, संवेदनहिन वृत्ती बघता त्यांना लोक फारसा पाठिंबा देतील, असे नाही वाटत. आणि सद्या भाजपाला जरी त्यांनी आपल्या चड्डीच्या नाड्याला बांधून ठेवली असली, तरी कुठल्या क्षणी नाडा निसटून जाईल आणि त्यांची फजिती होईल, हे सांगता येत नाही. सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात कसे होत्याचे नव्हते झाले आणि मी पुन्हा येईन.. म्हणून किंचाळणाऱ्या फडणिवस यांच्यावर कसे सकाळ संध्याकाळ राजभवन वर जाऊन ‘ दे माय.. दे माय ‘ करत भीक मागण्याचे दिवस आलेत, येवढेही लक्षात घेतले तरी भाजपा वाल्यांची भविष्यातील फजिती थांबू शकेल.
‘ पिसाळली गाय, काटे काय ‘ अशी सद्या फडणवीस यांची अवस्था झालेली आहे. बहुधा त्यांना रात्रभर झोप येत नसावी. औरंगजेबाच्या डोळ्यात जसे शिवाजी महाराज खुपत होते, आणि मग त्याने मोहिमेवर अफजलखानाला पाठवले, त्याहीपेक्षा जास्त उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद फडणवीस यांना खुपत असावं. बहुधा तोच अफजलखान फडणवीस यांना चावला असावा, असे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. तोच अफजल खान, फडणवीस यांच्या नसानसातून ‘ शांताबाई.. ‘ च्या ठेक्यावर नाचत असल्याची मजा सारा महाराष्ट्र एन्जॉय करतो आहे. चंद्रकांत पाटील तर बिचारे फारच गोंधळलेले दिसतात ! महाराष्ट्रातील अन्य भाजपा नेत्यांचे चेहरे पाहिले, तर ‘ झाकू किती, झाकू कशी..’ अशी बिचाऱ्यांची अवस्था झालेली दिसते !
(.. एखाद्या व्यक्तीने त्यांना खाजगीत विचारून बघायला काय हरकत आहे ? )
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
संपर्क – 9822278988
टीप – माझा कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही.
लोकजागर अभियान मध्ये सहभागी व्हा !
महागुरूकुल परिवारात सहभागी व्हा !
धन्यवाद !
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 9004397917
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116