गहू , हळद , उन्हाळी ज्वारी , भुईमूग चे मोठे नुकसान.
फुलवळ ; ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ सह परिसरात ता. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. या अचानक पडलेल्या पावसामुळे गहू , हळद , उन्हाळी ज्वारी , भुईमूग सह अन्य पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.
सध्या सर्वत्र हळद काढणे , ती शिजवणे , गहू कापणे , राशी करणे ही शेतकऱ्यांची कामे चालू असून अनेक ठिकाणी शिजवलेल्या हळदीचे ढीग , कापलेल्या गव्हाचे काड शेताने उघड्यावरच असल्याने या अचानक आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
एकीकडे कोरोना सारख्या संसर्ग विषाणू आजारामुळे माणूस हतबल झाला असून मजुरांच्या हाताला कामही मिळेना आणि लॉकडाऊन मुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांचा व्यवसायाला ही खीळ बसल्यामुळे एकंदरीत सर्वचजण मेटाकुटीला येऊन टेकले आहेत. वरून निसर्गही असा अधून मधून कोपतोय .
तब्बल अर्धा ते पाऊण तास अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेती पिकांचे तर नुकसान झालेच परंतु शेतीकामासाठी शेतात असलेल्या शेतकरी व कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या होत्या.
अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून तोंडचा घास या अवकाळी पावसाने हिरावला तेंव्हा वर्षभर राबराब राबून , मेहनत , काबाडकष्ट करून ज्याच्यावर आशेची शिदोरी असते तेच निसर्गाने आमच्याकडून हिरावून घेतले . तेंव्हा संसाराचा गाडा हकावा तरी कसा अशाही भावना शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत.