गतवर्षीपेक्षा यावर्षीचा कोरोना अधिक घातक स्वरूपाचा ठरला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील घराघरांत किंवा परिसरात एक-दोन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. राज्याची रुग्णसंख्या बत्तीस लाखाच्या दिशेने धावत आहे तर मृत्यूच्या आकड्याने छपन्न हजारांचा पल्ला ओलांडला आहे. राज्यभरात लसीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाही कोरोना नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत. अपुरी आरोग्य सुविधा आणि तोकड्या यंत्रणेच्या बळावर राज्याची मजल दर मजल सुरु आहे. रुग्णांना बेड न मिळण्याच्या तसेच योग्य तो उपचार न मिळण्याच्या नाईलाजापोटी अनेक रुग्णांनी श्वास सोडला आहे. गतवर्षी ज्या पद्धतीने कोरोनाची भिती जी मोठ्या प्रमाणावर जनमानसात रुजली गेली होती त्या तुलनेने सप्टेंबर-आॅक्टोबर ते जानेवारी- फेब्रुवारी या काळात ही भिंती लोप पावून जनता निर्भय झाली होती. कोरोना हे एक राजकीय षडयंत्र आहे किंवा जागतिक विषाणू युद्ध आहे, अर्थव्यवस्था उध्वस्त करणारे हे महाआक्रमण आहे, अशा प्रकारचे ‘ सोशल’ शोध लावण्यात आले होते. सोशल मीडियावर अत्यंत भयकारी बातम्या, फोटो, आॅडिओ- व्हिडिओ क्लिप, पोस्ट आदी माध्यमातून भिती पसरवण्यात आली. त्यातून अफवांचे पीकही जोरात आलेले होते. यावर्षी ही भिती कमी झाल्याने आणि कोरोना आता संपत आल्याच्या आविर्भावात निष्काळजीपणाने वावरल्याने प्रत्यक्षात कोरोनाने भयंकर रुप धारण केले आहे, तेव्हा कोरोनाचा स्ट्रेन वाढल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच कोरोना आता दुहेरी उत्परिवर्तन अवस्थेत आहे.
आताही कोरोना महाराष्ट्रातच का आहे? इतर राज्यात एवढ्या तीव्र स्वरुपाचा नाही! अशीही चर्चा केली जात आहे. एवढेच नव्हे तर आंबेडकरी समुदायात एप्रिल महिन्यातच एवढा कोरोना कसा वाढतो आणि एप्रिल नंतर तो कमी कसा होतो याबाबत संशयास्पद भूमिका घेतल्या जात आहेत. वास्तविक पाहता महाराष्ट्रात पुणे हा जिल्हा पहिल्या क्रमांकाचा हाॅटस्पाॅट जिल्हा असून नांदेड आठव्या, लातूर नवव्या तर जळगाव दहाव्या क्रमांकावर आहे. पुण्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर हे जिल्हे आहेत. त्यामानाने राज्यातील इतर जिल्ह्यांत कमी किंवा कमी तीव्र अशी परिस्थिती असल्याचे दिसते. परंतु मराठवाड्यातील अंबेजोगाईसारखे शहर कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले आहे. पालिकेने निर्माण केलेल्या कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला. कोणत्याही राज्यात, कोणत्याही जिल्ह्यात वा तालुक्यात कोरोनाने तीव्र रुप धारण केलेले असू शकते. त्यामुळे कोरोनाबाबत कोणताही अंदाज बांधता येत नाही. लसीकरण होत असूनही जवळची चांगली माणसं जात आहेत. दररोज कुणाच्या ना कुणाच्या बाबतीत भावपूर्ण श्रद्धांजलीचा संदेश येऊन धडकत आहे. कोणतीही व्यक्ती कितीही मोठी असली वा प्रसिद्ध असली तरी त्या कोरोनाग्रस्त शवावर मोठ्या कारुणिक पद्धतीने अंत्यसंस्कार होत आहेत. कोव्हीड मरण म्हणजे दवाखान्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेला शेवटचा निरोप आहे. एकदा एखादा गंभीर रुग्ण दवाखान्यात प्रवेशित झाला आणि तो दगावलाच तर त्याचे तोंडही पाहणे दुरापास्त बनले आहे. आता असे कोरोनाबाधित मृत्यूच्या अंत्यसंस्काराचे संदर्भ पूर्णतः बदलून गेले आहेत. मोठ्या संख्येने माणसं मरत आहेत आणि अशावेळी इटालीतून भारताचे स्वप्न पाहणाऱ्या इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री हिची आठवण होत आहे.
“मी हे पत्र तुम्हाला इटलीतून म्हणजेच तुमच्या भविष्यकाळातून लिहिते आहे. करोनाची साथ ही अगदी आमच्या देशाप्रमाणेच तुमच्या देशातही एका विशिष्ट पद्धतीने पसरते आहे. त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. करोनाच्या बाबतीत वेळेचा विचार केला तर आम्ही तुमच्या पुढे आहोत. जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे.. आम्ही तसंच वागलो जसं आत्ता तुम्ही वागता आहात. आमच्याकडेही परिस्थितीचं गांभीर्य कळलेले आणि न कळलेल्या लोकांमध्ये वाद आहेत जसे आमच्याकडे होते. एकीकडे सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणारे लोक.. आणि दुसरीकडे साधा फ्लू तर आहे त्यात एवढी काय काळजी करण्याचं कारण असा प्रश्न विचारणारेही आहेत. पण लवकरच हे ही वाद मागे पडतील. तुम्ही रोज घरी छान जेवाल, कारण तुम्हाला करण्यासारखं फारसं काहीच नसेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करावा? यासाठी तुम्ही इंटरनेटवरुन मार्गदर्शन घ्याल. वेगवेगळे छंद असलेल्या आणि आवडीनिवडी असलेल्या अनेक ऑनलाईन ग्रुप्सचा तुम्ही भाग व्हाल. सुरुवातीला कुतूहल वाटणाऱ्या गोष्टींकडे नंतर तुम्ही ढुंकूनही पाहणार नाही..अनेक वर्षे तुमच्या कपाटात धूळ खात पडलेली पुस्तकं तुम्ही वाचायला घ्याल. पण त्यातही तुमचं मन फार काळ रमणार नाही. तुम्ही पुन्हा जेवाल पण यावेळेस तुम्हाला झोप लागणार नाही. आपल्या देशाचं त्यातल्या लोकांचं काय होणार? हा प्रश्न तुम्हाला पडेल!’ असा काहीसा मजकूर असलेलं एक पत्र फ्रान्सेसका मेलँड्री यांनी गतवर्षी युरोपवासीयांना उद्देशून लिहिलं होतं. या पत्राचा मराठी अनुवाद लेखिकेच्या संमतीनेच करण्यात आला होता. हे पत्र मुक्ता बर्वेच्या आवाजात ऐकताना आपल्या मनाला एक अनामिक भीती छेदून गेली होती.
टाळेबंदीने सर्वसामान्य माणसाचे काय हाल झाले ते मागील अनुभवानुसार सर्वविदितच आहे. भारतीय अर्थ व्यवस्थेत एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या उपजीविका पद्धतीत सामान्यतः तळातील मजूर, हातावर पोट असलेले कामगार, अंग मेहनतीची कामे करणारे, हमाल, कामगार, कारागीर टाळेबंदीत भरडल्या जातो. दिवसभराचे काम केल्याशिवाय ज्यांची चुलत पेटत नाही अशी अगणित कुटुंबे भारतात राहतात. तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे टाळेबंदीने कंबरडे मोडले आहे. लक्षावधी मजूर रक्तरंजित पायांनी घराकडे आपापल्या गावाकडे परतले होते. त्यामुळे टाळेबंदीची भीती कामगारांबरोबरच व्यापाऱ्यांनाही आहे. गतवर्षीच्या भयावह अनुभवानंतर केंद्र सरकारने आपली जबाबदारी पूर्णतः राज्यावर दिली. ज्या राज्यात कोरोनाचा तीव्र पादुर्भाव असेल त्या राज्यांनी आपल्या स्तरावरच उपाययोजना राबवाव्यात अशी भूमिका घेतली. तर राज्यसरकारने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार दिले. अशा परिस्थितीत एका वर्षानंतर सर्वच जनता टाळेबंदी हा उपायच नाही ह्या निर्णयाप्रत येऊन पोहचली होती. सरकारला मात्र कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंदी हाच एकमेव आणि अंतिम पर्याय आहे असे वाटते. तमाम व्यावसायिकांना आणि व्यापाऱ्यांना, सकल उद्योग जगतालाही आता टाळेबंदी नको आहे. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना ताळेबंदीचा विरोधच करीत आहेत. सरसगट टाळेबंदी करावी तर सर्वसामान्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. नाही करावी तर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात, गर्दी करतात तेंव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव खूपच वाढत असलेला दिसून येतो. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाल्याने सरकारचेही मनोधैर्य खचत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनामुळे अंत्यसंस्काराचे संदर्भ बदलले तसे विवाहसंस्थेचे स्वरूपही बदलून गेले आहे. विना कोरोना अंत्यसंस्कारासाठी वीस लोकांना परवानगी आहे तर लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लग्न/विवाह पार पाडलेच जात नाहीत. कोरोनाकाळ जाऊ देण्याची आणि त्यासाठी थोडं थांबण्याची भूमिका मोठ्ठा गाजावाजा करीत सोहळे आयोजित करणाऱ्या तालेवारांनी घेतली आहे. त्यामुळे विवाह काळात या संपूर्ण प्रक्रियेवर अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसाय, कारागिरांची कारीगरी स्थगित झाली आहे. त्यांच्यावर अगदी उपासमारीची वेळ आली आहे. शरीरावरील भरजरी वस्त्र, अलंकारांनी नटण्या-मुरडण्याचे किंवा भलताच बडेजावपणा मिरवण्याचे हे दिवस आता नाहीत. मात्र, छोरीछुपे सर्व काही सुरळीत चालू असल्याची खबरबात आहे. छोट्या कालावधीच्या, कमी लोकांच्या उपस्थितीतले विवाह संपन्न होताहेत. अनेकांनी हा खुष्कीचा मार्ग स्विकारला आहे. परंतु सर्वच प्रकारचे कलाकार, कलावंत, लोककलावंत अडचणीत सापडले आहेत. सद्या कोणत्याही कार्यक्रमाला बंदीच घालण्यात आली आहे. मोठ्या स्वरुपाचे कोणतेही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तथा सार्वजनिक कार्यक्रम होत नसले तरी घरगुती, वैयक्तिक स्वरूपाचे अनेक कार्यक्रम कोणताही गाजावाजा न करता, दिखावा न करता सुरुच आहेत. यावरुनच बाहेरुन बंद असलेली दुकाने आतून राजरोसपणे सुरुच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिकन, मटन, अंडी, मासे या खाद्यान्नाना आता अत्यावश्यक सेवेत गणण्याची प्रकिया सुरू आहे. तसेच मद्यालये किंवा मद्यविक्रीची दुकाने अत्यावश्यक नसली तरी तळीरामांना ती चालू राहणे अतिआवश्यक असते. म्हणूनच देशाची अर्थव्यवस्था सुधारावी आणि ती सुव्यवस्थीत राहावी ह्यासाठी मद्यविक्रीला परवानगी दिली जाते. जेव्हा मद्यविक्रीवर बंदी घातली जाते तेव्हा हातभट्टी पासून सर्वच प्रकारच्या मद्यपेयांच्या अवास्तव किंमतीचा चोर बाजार भरलेला असतो.
कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंदच आहेत. विद्यापीठांनी परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी हे निश्चित झाले नाही. पहिली ते आठवी वर्गोन्नतीने उत्तीर्ण तर नववी आणि अकरावी विनापरीक्षा उत्तीर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. हा परीक्षांचा काळ आहे. दहावी बारावीच्या परीक्षा त्यांच्या शाळा महाविद्यालयालाच परीक्षा केंद्र तयार करून घेतल्या जाणार आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असल्याने व्यापारी आता आक्रमक झाले आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणूका आता लांबणीवर पडल्या आहेत. टाळेबंदी विरोधात एखादा जनसमुदाय, वर्ग किंवा राजकीय पक्ष जनहितार्थ मुद्यावर रस्त्यावर येईलही परंतु शिक्षणातील कोरोनामुळे निर्माण झालेले अडथळे दूर कसे करता येतील? हा प्रश्नच आहे. व्यायामशाळा संचालक हे एखादेवेळी जिम उघडण्याची परवानगी मागतीलही पण शाळांचे काय? ग्रामीण भागात तर ऑनलाईन शिक्षण पद्धती सपशेल अयशस्वी ठरली आहे. आत्तापर्यंत शिक्षणक्षेत्रातील अनेक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले आहेत. या अनेक कर्मचाऱ्यांचे नातेवाईक कोरोनाचे रुग्ण आहेत. ५०% क्षमतेच्या उपस्थितीचे नियम असले तरी त्या किमान किमान अर्ध्या शिक्षकांच्या चमूला कोरोना होणार नाही हे कशावरून? ज्याअर्थी मागील आदेशावरून शिक्षकांचीच कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानंतरच शाळांतील वर्ग योग्य ती काळजी घेऊन भरवण्यात आले होते. त्या अर्थी सर्वांचेच लसीकरण करून पुन्हा शाळा जशास तशा भरवल्या पाहिजेत या विचारापर्यंत किंवा निर्णयाप्रत कुणी येऊ शकत नाही. त्याचे कारण असे की यावर्षीच कोरोना विषाणू दुहेरी उत्परिवर्तीत झालेला आहे. तो अत्यंत घातक आहे. विषाणूच्या जन्मप्रक्रियेत सातत्याने बदल घडून येत आहेत. लहान मुलांतील कोरोना प्रसार झाला तर ती अत्यंत चिंतेची बाब ठरणार आहे. मध्यंतरी शाळा उरू असताना काही माध्यमिक शाळेत शिक्षकांसह विध्यार्थी कॉरोन संक्रमित झालेले होते. अशा रीतीने कोरोनाच्या भीतीपोटी एक शैक्षणिक पिढी गारद झाल्याची चिंता पालकांतून व्यक्त होत आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून आता केंद्र सरकारने गंभीर इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच आठवडे हे अत्यंत चिंतेचे असून या काळात जराही निष्काळजीपणा झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी ५८% रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील ३४% रुग्णांचा समावेश होत आहे.फेब्रुवारीत जवळपास तीन हजार रुग्ण आढळून येत होते. आता ही संख्या तब्बल चव्वेचाळीस हजारांवर गेली आहे. राज्यात रोज २५ ते २५० जणांचा मृत्यू कोरोनामुळे होत आहे. राज्यात कोरोना लसींचा तसेच रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. लसीकरण केंव्हाही बंद पडू शकतं असं राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला लस मिळाली पाहिजे. इतर देशांची काळजी करण्यापेक्षा देशातल्या कोट्यवधी जनतेला लस मिळाली पाहिजे. तो त्यांचा अधिकारच आहे. कोरोना वगळता इतर रोगांसाठीही रक्ताची आवश्यकता असते. राज्यात आता फक्त एक आठवडाच पुरेल इतके रक्त आहे. त्यासाठी नैतिक कर्तव्य म्हणून विविध सामाजिक संस्था तथा सेवाभावी संस्थांनी भव्य रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे अशीं अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात हाहाकार माजला आहे. कोरोनाचे आजचे रुप अधिक घातक बनले आहे तसे त्याच्या लक्षणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. विविध रोगांची लक्षणे ही आता कोरोनाची लक्षणे मानली जाऊ लागली आहेत. जे गंभीर रुग्ण कोरोना दुरुस्त होऊन सुखरूप घरी पोहोंचले आहेत त्यांनाच त्यांच्या काही दिवसांच्या जगण्याच्या संघर्षाची कहाणी माहिती आहे. कोरोना हे षडयंत्र आहे, थोतांड आहे असे मानणाऱ्यांना ते आता आपुलकीचे, जिव्हाळ्याचे सल्ले देऊ लागले आहेत. शासन/ प्रशासनाच्या स्तरावरुन कोरोनाविषयक जनजागृतीचे जे जोरकस प्रयत्न झाले ते कुठे तरी अजून कमी पडले की काय असे भासत आहे. काळजी घ्या-घरीच राहा, मास्क-सॅनिटाईझर-शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करावा असे वारंवार सांगूनही, माझे कुटुंब माझी जबाबदारी सारखे प्रयोग राबवूनही आज राज्याचे हे हाल हवाल आहेत. विरोधी पक्ष तर प्रत्येक बाबतीत राजकारण करीत असून कधी कोणत्या मंत्र्याचा घास घेता येईल यावर टपून आहेत. राजकीय अस्थिर मानसिकतेप्रमाणेच माणसाच्या जीवनातही कमालीची अस्थिरता निर्माण झालेली आहे. कधी कोणता धक्का सहन करावा लागेल ह्याचा नेम नाही. लस घेऊनही कोरोना संक्रमण होणार नाही याची खात्री नाही. कारण नव्याने जन्माला आलेला किंवा येणारा कोरोना लसीलाही निष्प्रभ करु शकतो असे संशोधकांचे मत आहे. खाजगी दवाखान्याचा खर्च, सरकारी दवाखान्यातली परिस्थिती, झालेले मृत्यू, रेमेडिसीवरचा काळा बाजार, जागतिक आरोग्य दिनानिमित्त थरथरत्या मानसिकतेने शुभेच्छा, मानाचा मुजरा स्वीकारणाऱ्या आणि जिवाची पर्वा न करता जनतेच्या आरोग्यासाठी अविरत झटणाऱ्या पीपीई कीट मधल्या देवदुतांची स्थिती, धार्मिक बंधने लादल्यामुळे विरोधात गेलेले काही लोक, टाळेबंदीमुळे बेजार, बेरोजगार मजूर, व्यावसायिक, व्यापारी वर्ग, कलावंत, शैक्षणिक वर्ष वाया जात असताना अस्वस्थ झालेले विद्यार्थी आणि चिंतातुर पालक या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कितीतरी प्रभावित महा जनसमुहाकडे पाहता कोरोनामुळे माणूस व्यवस्थित जगण्यास शिकला, माणसाला शिस्त लागली, पर्यावरण आणि आरोग्य सुधारले असे काही फायदे सांगून कोरोना ही एक इष्टापत्तीच म्हणणाऱ्या लोकांची कीव कराविशी वाटते. कोरोना हे चोहोबाजूंनी आलेले महासंकट आहे. उर्जावान माणसाला अशक्त आणि घायाळ करणारे ते संकट आहे. महागाई आणि इतर रोगराई वाढविणारे ते आहे. तसेच चोऱ्यामाऱ्या वाढविणारा हा कठीण काळ आहे. हा काळ पिसाळलेला काळ आहे. जो विवेकाने, मनोधैर्याने या संकटाला तोंड देईल तोच जगेल आणि टिकेल.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय