नांदेड – नांदेड जिल्ह्यातील रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्राी अशोकराव चव्हाण यांनी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मोठ्या प्रमाणात सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोरोनाचा अत्यंत अडचणीचा हा काळ असून या रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत आहेत. अशा वेळी कोरोनासह सर्वच रुग्णंची योग्य काळजी घ्या, अशा स्पष्ट सूचना अभ्यागत मंडळाच्या पदाधिकार्यांसह महापौरांनी केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आ.मोहनअण्णा हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, अधिष्ठाता डॉ.दिलीप म्हैसेकर, सदस्य संतोष पांडागळे, डॉ.करुणा जमदाडे, नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपरोक्त आवाहन करण्यात आले.
तत्पूर्वी अभ्यागत मंडळाचे पदाधिकारी व महापौर यांनी कोविड रुग्णकक्ष, स्वयंपाक घर, ऑक्सिजन टँक आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठा 20 के.एल.ऑक्सिजन टँक वैद्यकीय महाविद्यालयात बसविण्यात येत आहे. कोविड रुग्णांच्या सेवासुविधांसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी डी.पी.डी.सी. व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात वैद्यकीय व्यवसायात काम करणार्या सर्व कर्मचारी व अधिकार्यांनी आपली जबाबदारी ओळखून रुग्णांची सेवा करावी, असेही आ.मोहनअण्णा हंबर्डे व महापौर मोहिनीताई येवनकर यांनी सांगितले.
पोष्टमार्टम, मृतदेह नातेवाईकांना देणे, रेमिडीसीवर इंजेक्शनची उपलब्धता याबाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती. अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे व डॉ.करुणा जमदाडे यांनीही रुग्णसेवेसाठी कांही महत्वपूर्ण सूचना केल्या. ही बैठक तब्बल दोन तास चालली.