अँटीजन किट चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने अनेक गावात अँटीजन टेस्ट रखडल्या..
फुलवळ ; ( धोंडीबा बोरगावे )
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि दिवसागणिक होत असलेली बाधित रुग्णांची वाढ रोखण्यासाठी व प्रादुर्भावावर अंकुश ठेवण्याच्या हेतूने प्रशासनाने कंधार तालुक्यातील चार गावे कंटेंटमेंट झोन म्हणून ता.१९ एप्रिल रोजी जाहीर केले होते त्यात मुंडेवाडी चा समावेश होता पण कसल्याच आरोग्याच्या सुविधा किंवा तपासण्या प्रशासनाकडून केल्या नसल्याने सकाळ युगसाक्षी न्युज पोर्टल ने सरपंच ज्ञानोबा मुंडे यांची प्रतिक्रिया घेऊन सविस्तर बातमी प्रकाशित करताच आज ता. २६ एप्रिल रोजी मुंडेवाडी येथील नागरिकांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली.
पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी आमच्या व्यथा मांडल्या म्हणूनच तर प्रशासनाला जाग आली आणि आम्हाला सुविधा मिळाल्या अशी प्रतिक्रिया सरपंच ज्ञानोबा मुंडे यांनी दिली.
आमचं गाव सहा दिवसांपूर्वी ता.१९ एप्रिल रोजी कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले होते परंतु त्या दिवसापासून आम्हाला कसल्याच सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात आल्या नाहीत असा सवाल मुंडेवाडी येथील सरपंच ज्ञानोबा मुंडे यांनी व्यक्त करून प्रशासनाच्या अशा दुर्लक्षितपणामुळे व दिरंगाईमुळे आजपर्यंत कुठलीच आरोग्य सुविधा किंवा उपचार अथवा साधी तपासणी सुद्धा करायला कोणी फिरकले नाही अशी खंत व्यक्त केली होती.
मुंडेवाडी येथील लोकसंख्या जवळपास १२०० असून आजघडीला मुंडेवाडी या छोट्याशा गावात १९ कोरोना बाधित रुग्ण असून त्यात १२ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे . हे सगळे रुग्ण गावातच आहेत. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून तात्काळ तपासणी करून योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याने आमची तळमळ चालू होती परंतु गावची लोकसंख्या १२०० असताना आज आरोग्य विभागाकडून केवळ ३८ आर टी पी सी आर किट उपलब्ध झाल्यामुळे फक्त ३८ लोकांचीच टेस्ट करण्यात आली . त्यात १५ महिला आणि २३ पुरुषांची टेस्टिंग करण्यात आली . याबद्दल ही सरपंच मुंडे यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासन व आरोग्य विभाग असा का जीवघेणा खेळ खेळत आहे हेच कळत नाही असे म्हणत उर्वरित लोकांची तपासणी आता कधी होणार ? आणि अँटीजन किट कधी उपलब्ध होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तपासणी च्या वेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मुश्ताख शेख , आरोग्य कर्मचारी सुधाकर मोरे , अंगणवाडी सेविका गंगासागर माने , सरपंच ज्ञानोबा मुंडे , ग्राम पंचायत सेवक लक्ष्मण मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तपासणी करून आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करत जर कोणाला काही लक्षण आढळले तर तात्काळ उपचारासाठी दाखल व्हावे अन्यथा कोणीही आजार अंगावर काढू नये अशा सूचना करत प्रत्येकाने मास्क , सॅनिटायझर चा नियमित वापर करावा असा मोलाचा सल्ला ही देण्यात आला.