घ्या थोडी खबरदारी, आता मृत्यूही इथे ओशाळला….!चैत्र पौर्णिमेनिमित्त ऑनलाईन कविसंमेलन रंगले; राज्यभरातून कवी कवयित्रींचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड – देशात आणि राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मोठ्या प्रमाणावर लोक मरत आहेत. स्मशानभूमीत प्रेते दहनाच्या प्रतिक्षेत आहेत. राकट नव्हे, कणखर नव्हे हा देश मुडद्यांचा देश बनत चालला आहे. सर्वत्र जगण्याच्या अनिश्चितकालीन भांबावलेपणावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. स्मशानभूमी सतत धुमसत आहे. शवांच्या आगमनापूर्वीच रचलेल्या सरणांनी स्मशानभूमी जणू मरणांचे अलंकार घालून नटू लागली आहे. एकाच सरणावर अनेक प्रेते असे आगतिक समीकरण जुळून येऊ लागले आहे. जळत्या प्रेतांनी धैर्यशील मनेही जळू लागली आहेत. सगळीकडे ‘त्राही माम: त्राही माम:’ अशी परिस्थिती उद्भवली आहे. माणसांची राख होत असतांनाच भावभावनांचीही दयनीय अवस्था होते आहे.‌ या नाजूक संकटघडीत राज्यभरातून कवी कवयित्रींनी आॅनलाईन पद्धतीने कवितांच्या माध्यमातून मन मोकळे केले. यात अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार,  गंगाधर ढवळे, रुपाली वैद्य वागरे, मारोती कदम, भैय्यासाहेब गोडबोले, बाबुराव पाईकराव या कविंनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला. 

            येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने चैत्र पौर्णिमेनिमित्त चाळीसावी काव्यपौर्णिमा व्हाटसपद्वारे आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे हे होते. तर काव्यपौर्णिमेचे आॅनलाईन उद्घाटन सिद्धहस्त लेखिका रुपाली वैद्य वागरे यांनी केले. त्या म्हणाल्या, ‘आता तर कोरोना घरा घरात घूसला, थोडी घ्या खबरदारी, मृत्यू ही इथे ओशाळला….!’ काव्यपौर्णिमेचे रीतसर उद्घाटन झाल्यानंतर कविसंमेलनाध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांनी कविमित्राच्या जाण्याने मैत्रीच्या तसेच साहित्यविश्वात जी पोकळी निर्माण झाली त्याचे अत्यंत करुणामय वर्णन केले, ‘जीवलग यार माझा सोडून काल गेला, मयतीवरी तयाच्या, कविता म्हणू चला…’ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात महाकहर केला आहे. सर्वत्र दुःख दैन्यावस्था पसरली आहे. कवी बाबुराव पाईकराव यांनी डोंगरकडा ता. हिंगोली येथून ‘आक्रोश’ नावाची कविता सादर केली, ‘गावतांडे शांत झाली,कोरोनाची आली लहर; जनता गेली हादरून, मृत्यूनेही केला कहर… ‘ मंडळाचे महासचिव पांडूरंग कोकुलवार यांनी कोरोनाबाधिताची शेवटपर्यंत होणारी दशा आपल्या ‘जळतो मी’ या कवितेत वर्णन केली, ‘जवळचे दूर नाते जाताना पाहतो मी, निशब्द निष्प्राण स्मशानात जळतो मी; देहात माणसाच्या माणूस शोधतो मी, स्मशानात जळताना माणूस शोधतो मी…’

                   आॅनलाईन पद्धतीने आयोजित या कविसंमेलनात अनेक कवी कवयित्रींनी सद्यपरिस्थितीवर भाष्य करीत वातावरण हलके फुलके केले. कवी तथा स्तंभलेखक मारोती कदम यांनी अत्यंत भावनाप्रधान कविता ‘कोणी देता का आधार, माझ्या गुद्मरेल्या जीवा..शेवटचा तरी विसावा …प्रेतांच्या गर्दीत नसावा .. ‘ सादर करतांना मन हेलावले. कवी गंगाधर ढवळे यांनी ‘दिवस दुःखाचे जाताच, सुखक्षणांची होईल बरसात; मनामनात पेटलेल्या वेदनांचा, शेवट होईल आनंदसागरात ही कविता सादर करीत संपूर्ण जगालाच ‘अच्छे दिन’ येतील ही अपेक्षा व्यक्त केली. तर ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी कोरोनाच्या महामारीत माणसं मरत असतांना राजकारण मात्र ऊतू येत आहे असे परखड भाष्य करणारी कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले. ते म्हणाले, ‘गावा गांवात वाहे, निवडणूकीचे वारे ; विकास नाही केला तर,मिळूनी त्यांना पाडु सारे….’ सरतेशेवटी स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले यांनी ‘कोरोनाने दिला संदेश सर्वांना..एकीने नांदा सर्व समाजबांधव, ह्यातच खरा आनंद आहे’, अशी भूमिका मांडली. 

         चैत्र पौर्णिमेनिमित्त  सप्तरंगी साहित्य मंडळाच्या चाळीसाव्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाला राज्यभरातून कवी कवयित्रींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात संदिप येवले(यवतमाळ), सोनाली ताम्हणकर(पुणे), मीनल‌ कुलकर्णी (बिदर), मनोहर गंगमवार(फलटण), युवराज पत्रे (यवतमाळ), आकाश कचरे(अमरावती), रोहन कवी(मुंबई), सतीश नाईक(विजापूर), विद्या शिराढोणकर(नांदेड), पल्लवी शूरकांबळे(परभणी), पूजा आचार्य(सातारा), गंगा सागर(लखमापूर) , संघरत्न पंडित ( जळगाव जामोद), विशाल वाडीकर (बुलढाणा), अनघा जोशी(लातूर), शर्वरी सौंदडकर(परभणी), प्रदीप भोसले(नांदेड), मनकर्णा कुलकर्णी, अद्वैत नांदेडकर, कक्षा कवमुळे, परीघा दातार (सर्व पूणे) यांनीही सहभाग नोंदवला. काव्य पौर्णिमेचे सूत्रसंचालन संकल्पक गंगाधर ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नागोराव डोंगरे यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *