काळ आला होता पण , वेळ आली नव्हती ! ‘ विज अंगावर कोसळून शेतकरी जखमी..कंधार तालुक्यातील घटना

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ सह परिसरात शुक्रवार दि.७ मे २०२१ रोजी दुपारी अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरु झाला. पानशेवडी शिवारातील आपल्या शेतातील भूईमूग काढण्यासाठी गेलेला संतोप गोविंदराव जगताप (वय ४० वर्षे) हा शेतकरी सोबत आलेल्या इतर शेतमजूरांसह झाडाखाली थांबला असता अचानक झाडावर वीज कोसळली.

ही वीज सदर शेतकऱ्याच्या डाव्या बरगडीला स्पर्श करुन जमीनीत उतरली. परिणामी हा व्यक्ती गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळला. त्यामुळे ‘काळ आला होता पण, वेळ आली नव्हती !’ असेच म्हणावे लागेल.

सध्या उन्हाळी भूईमूग, उन्हाळी ज्वारी, हळद काढणे व वाळवणे चालू आहे. आणि तालुक्यात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण दिसत आहे. परंतु उपरोक्त शेती कामासाठी शेतकऱ्यांना शेतात जाणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पानशेवडी येथील संतोप गोविंदराव जगताप (वय ४० वर्षे) हा शेतकरी काही शेतमजूर सोबत घेऊन शुक्रवार दि.७ मे २०२१ रोजी त्यांच्या शेतातील भूईमूग काढत होते.

भूईमूग काढत असताना दुपारी १.३० वाजता अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरु झाला. विजेचा कडकडाट सुरु झाल्याने संतोष जगतापसह इतर सर्व शेतमजूर झाडाखाली थांबले असता अचानक झाडावर वीज कोसळून संतोष जगतापच्या डाव्या बरगडीला स्पर्श करुन जमीनीत उतरली. परिणामी हा व्यक्ती गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळला. सोबतचे सहकारी शेतमजूर बालंबाल बचावले. आणि सहकाऱ्यांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले.

ही बातमी कळताच पानशेवडीचे भूमीपुत्र तथा कंधारचे नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय, कंधार येथे भेट देऊन कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिक्षक डॉ.लोणीकर यांना त्या जखमी शेतकऱ्यावर योग्य तो उपचार करुन सहकार्य करण्यास सांगितले. तेव्हा डॉ.लोणीकर यांनी जखमी संतोष जगताप यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला पाठवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *