नांदेड ; प्रतिनिधी
सामाजिक जाणीव ठेवून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी संध्याछाया वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना कोविड लस देण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट तसेच जेवण दिल्यामुळे वृद्धांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.
संध्याछाया वृद्धाश्रमाचे सचिव सुरेखा पाटणी यांनी दिलीप ठाकूर यांच्यामागे वृद्धांना लस उपलब्ध करून द्यावी यासाठी अनेक दिवसापासून आग्रह धरला होता. लस घेण्यासाठी इच्छुकांची संख्या प्रचंड असून नांदेड मध्ये पुरवठा कमी प्रमाणात होत होता. भाजपा नांदेड महानगरच्या वतीने श्री गुरू गोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात दररोज साहित्य वाटप करण्यासाठी दिलीप ठाकूर जात असल्यामुळे रविवारी लसीकरणाला नागरिकांची गर्दी कमी असल्याचे निदर्शनास आले. अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. शिर्शिकर तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.साखरे यांच्याशी दिलीप ठाकूर यांनी चर्चा केली. त्यांनी परवानगी दिल्यानंतर वृद्धाश्रमातील व्यवस्थापक वाघमारे यांना सूचना देऊन वृद्धांना आणण्यासाठी ठाकूर यांनी वाहने पाठवली. दिलीप ठाकूर ,अरुणकुमार काबरा, प्रशांत पळसकर, कामाजी सरोदे यांनी सर्व वृद्धांना पहिल्या मजल्यावरील लसीकरण केंद्रात नेले.
नंतर वृद्धांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. अर्धा तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर योग्य ते औषध उपचार करण्यात आले. त्यानंतर सर्वांना परत वृद्धाश्रमात नेऊन सोडण्यात आले. नाईलाजाने वृद्धाश्रमात राहावे लागत असल्यामुळे दिलीप ठाकूर यांनी आस्थेवाईकपणे लस उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक वृद्ध गहिवरून गेले. लसीकरण करण्यासाठी डॉ. आडे, डॉ. अमोल भंडारे, आशिष मोगले ,स्नेहा जोंधळे, नीळकंठ हंबर्डे, पांडुरंग जक्कुलवार, निशा सूर्यवंशी,
अश्विनी मुक्कनवार, प्रीती गायकवाड, आशा वाघमारे, कल्पना बट्टेवाड, सुरेश गोपीनवार, ईश्वर वाघमारे, ओमकार इंगळे या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.कोरोना संक्रमणाच्या काळात रक्ताची नाती विसरत असल्याचे सर्वत्र आढळून येत असताना दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने निराधार वृद्धांसाठी निरपेक्ष भावनेतून केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
( छाया:करणसिंह बैस)