‘धर्म’ ही संकल्पना आपण भारतीयांनी अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची करुन ठेवली आहे. धर्म म्हणजे जणू आपल्यासाठी केवळ ‘हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौध्द आणि ईसाई’ इत्यादी शब्द! आपण भारतीयांनी आपल्या संपूर्ण अस्मिता केवळ याच शब्दांभोवती गुंफून ठेवल्या आहेत अगदी विणकराने कापड विणावे तशा ज्यामध्ये धागा विलग होऊच शकणार नाही! एका वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल परंतू भारतीय नागरिक ‘धर्मकांड’ (धर्मकारण नव्हे) करावयाचे थांबवणार नाही. वास्तविक धर्म ही संकल्पना “वसुधैव कुटूंबकम” एवढी व्यापक पण आपण बहुतांशी आपल्या सोयीनुसार “कर्मकांड” हा अर्थ त्याला चिकटवला तो कायमचाच. कर्मकांड आणि धर्म यांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतांना आपण धर्म आणि कर्मकांड या एकाच नाण्याच्या दोन बाजु करुन ठेवल्या. त्याचे भयंकर दुष्परिणाम आपण कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत भोगले आणि अजुनही त्यातुन बाहेर पडण्याची आपली धडपड सुरुच आहे.
कोरोना महामारीच्या संकटाचे आक्रस्ताळी रुप पाहता अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनाअंती अभ्यासपूर्ण इशारा दिला होता की कोणत्याही दुसऱ्या महामारीची लाट ही पहिल्या लाटेपेक्षा कैकपटीने विनाशकारी असते. इतिहासातील महारोगांच्या साथी याच्या साक्षीदार आहेत. बरोबर शंभर वर्षापूर्वी जगाला ग्रासलेल्या स्पॅनिश फ्लू नावाच्या महामारी वेळी हेच सिध्द झाले. कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातल्यापासून आरोग्य रक्षणार्थ काही काटेकोर नियमांचे पालन आपण बंधनकारक केले ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर, मुखपट्टी (मास्क) आणि सॅनिटायझरचा वापर तसेच जमावबंदी इत्यादी महत्वाच्या नियमांचा समावेश करण्यात आला. या नियमांच्या काटेकोर पालनाशिवाय कोरोनाचा संसर्ग रोखणे सर्वथा अशक्य कोटीतील गोष्ट! या पार्श्वभूमीचा विचार करता हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या आयोजनाला परवानगी देणाऱ्या सरकारचे दायित्व तरी काय समजायचे? भारतीयांनी ‘धर्म’ हा जीवनमरणाचा प्रश्न करुन ठेवला आहे. प्रत्येक धर्माचे लोक छुप्या मार्गाने का होईना दुराग्रही, सनातनी मुलतत्ववादाचे पालन करताना आढळतात. ‘कुंभमेळा’ म्हणजे काय हे आपण सर्वच जण जाणतो. त्यामागची धार्मिक पार्श्वभुमी अशी की, दर बारा वर्षांनी होणारा हा हिंदू धर्मियांचा धार्मिक महामेळावा ज्या अंतर्गत भारतातल्या चार मुख्य शहरांपैकी एका ठिकाणी प्रचंड संख्येने श्रद्धाळू लोक एकत्र येतात आणि गंगास्नान करतात. बारा वर्षाच्या या नियमाप्रमाणे तो 2022 मध्ये व्हायला हवा होता जो ऐन महामारीत हरिद्वार येथे आयोजित केला गेला आणि कोरोना महामारीमुळे मृत्यूदरात प्रचंड वाढ हा परिपाक ठरला. या कल्पनातीत धार्मिक गर्दीच्या मेळाव्यात लाखोंच्या संख्येने लोक जमतात आणि पवित्र गंगास्नान करतात. अर्थात ते येतात कशासाठी तर स्वत:चे पापक्षालन करण्यासाठी म्हणजे या सगळ्यांना त्यांनी केलेल्या पापांची संपूर्ण जाणीव असते म्हणायची! या प्रचंड रुद्रावतारी गर्दीच्या मेळाव्यात जेव्हा लाखोंनी लोक एकत्र येतील तेव्हा कोणते सहा फुटांचे अंतर राखले जाणार होते. याचा केंद्र सरकार आणि उत्तराखंड राज्य सरकार यांनी उहापोह केला का? या कुंभमेळा प्रकरणात जे व्हायचे तेच झाले! एक दोन दिवसांचा नव्हे तर साडेतीन महिने चालणारा हा सोहळा! या वर्षी कोरोनामुळे तो कालावधी म्हणे थोडासा कमी केला एवढंच काय ते! एकीकडे आपल्या सर्वांना विज्ञानाच्या जोरावर केलेली संपुर्ण भौतिक प्रगती आरामात पचनी पडते आणि उलटपक्षी विज्ञाननिष्ठ विचारांचे आचरण करायला आपली नौका हेलकावते! आपण पुरते पाखंडी असल्याचीच ही साक्ष ठरते. विज्ञानाने स्पष्ट सांगितलेच आहे की, कोरोना महामारी विनाशकारी आहे, पुढे जाऊन इतिहास आणि शास्त्रज्ञ सांगतात की कोणत्याही महामारीची दुसरी लाट प्रखर विनाशकारी असते. विज्ञान तुम्हाला सजग करते की, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर राखा तरच स्वत:चे संरक्षण करु शकाल, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका तरच स्वत:ला वाचवू शकाल. जेव्हा लाखोंच्या संख्येने लोक एकत्र येतात त्यावेळी कोणते सहा फुटांचे अंतर राखणे आवाक्यात होते याचा सारासार विचार शेंबडे पोर सुध्दा करु शकेल. मग आपले केंद्र सरकार, उत्तराखंड सरकार यांचा विवेक कुठे गेला होता? कुंभमेळ्याचे आयोजन करण्यामागे आपलीच बदफैली कारणीभूत आहे. हे आयोजन करुन आपली बौध्दिक दिवाळखोरी संपूर्ण विश्वासमोर उघडी पडली! इभ्रत दुर दुर पर्यंत वाऱ्याबरोबर भुर्रकन उडून गेली आणि संतमहतांचा वारसा आणि विज्ञाननिष्ठ सावरकर, स्वर्गीय डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या देशाचे नागरिक आपण पुरते दयनीय आणि निंदनीय ठरलो. अशावेळी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग ओठांवर आल्याशिवाय राहत नाही!
एैसे कैसे जाले भोंदू |
कर्म करोनि म्हणति साधु ||1||
अंगा लावूनिया राख |
डोळे झाकुनी करिती पाप ||धृ.||
दावुनि वैराग्याची कळा |
भोगी विषयाचा सोहळा ||2||
तुका म्हणे सांगो किती |
जळो तयांची संगती ||3||
अशा भोंदू भ्रमिष्टांना परिस्थितीचे गांभीर्य ते काय समजणार ? जिथे लोकांनी सहा फुटांचे अंतर ठेऊन दूर राहायचे तिथे माणसे मधाच्या पोळ्यासारखी एकत्र जमणार! विज्ञान आणि धर्म यांना आपापल्या जागी नाही ठेवले तर ‘तर्काचे’ बलीदान जाऊन केवळ ‘कर्मकांडाचा’ जन्म होतो. कर्मकांड हे ‘धर्माच्या’ व्याख्येच्या कुठे आसपास सुध्दा फिरकत नाही. मार्च महिन्यापासून कुंभमेळ्याची सुरुवात झाली. 11 मार्च शिवरात्री, 12 एप्रिल सोमवती अमावस्या, 14 एप्रिल आणि 27 एप्रिल असे म्हणे चार शाही स्नान. एका शाही स्नानास एकत्र आलेली गर्दी साधारणतः पस्तीस ते चाळीस लाख! हे लोक कुंभमेळ्यास गेले की स्वर्गप्राप्तीचे दरवाजे यांना खुले झाले हेच समजत नव्हते! कोणते सहा फुटांचे अंतर, कोणते मास्क आणि कुठले सॅनिटायझर? प्रशासनाची परिस्थिती नियंत्रणात आणता आणता मर्यादेबाहेर दमछाक, कुंभमेळ्याची गर्दीची छायाचित्रे आणि चित्रण पाहिले आणि भारतीय असणाऱ्यावर विचार करावासा वाटला!
वास्तविक पाहता सार्वजनिक ठिकाणी सामुहिक स्नान ही संकल्पना माझ्या तत्वात दुरदुरपर्यंत न बसणारी! खरंच हे सार्वजनिक ठिकाणी नद्यांमध्ये सामुहिक स्नान करुन कोणते पापक्षालन होते आणि पावित्र्य अर्जित होते? “नाही निर्मळ जीवन, काय करील साबन!” शरीराला पाण्याने कितीही धुतले तरी मनातल्या पापांचे काय? तसेही विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ आणि नैतिकतेचे पाईक असणाऱ्या व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणचे सामुहिक स्नान म्हणजे मेल्याहून मेल्यासारखे होणे! आपल्याकडचा धर्मभोळा आणि देवभोळा समाज हे सर्व धार्मिक अवडंबर अतीव मोठ्या प्रमाणात आणि कमालीच्या उत्साहाने करत आलाय. सार्वजनिक ठिकाणी स्नान करतांना आरोग्याची काय वाताहत लागते आणि साथरोगांचे कसे भरणपोषण होते हे विदित करण्यासाठी कुठल्याही तत्ववेत्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. अशा वेळी आपल्या तगड्या व्यवस्था फोल ठरल्या, केंद्र सरकार, राज्य सरकार, बुध्दिवाद्यांचे ताफे हे सर्व सपेशल आपटले. आपल्याकडे सद्या सर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयास लक्ष देणे भाग पडते आहे, इथे सर्वोच्च न्यायालय देखील कसे शांत बसले? “लोकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा गुन्हा केंद्र सरकार आणि उत्तरांचल सरकारवर का दाखल केला जाऊ नये” या सर्वोच्च न्यायालयाच्या वाणीकडे आम्ही डोळे लाऊन बसलो ते उघडण्याची वेळ काही सर्वोच्च न्यायालयाने आणली नाही, का तर कुंभमेळ्यात साधूंचे जथ्थेच्या जथ्थे सहभागी होतात म्हणून. संत तुकाराम महाराज अशा दिखाऊ संतांचे भोंदूपण त्यांच्या अभंगातुन पुरते उघडे पाडतात.
टिळा टोपी घालुनी माळा
म्हणती आम्ही साधु,
दयाधर्म चित्ती नाही
ते जाणावे भोंदू!
कलियुगी घरोघरी
संत झाले फार,
वितीभरी पोटासाठी
हिंडती दारोदार.…
कुंभमेळा यांच्यासाठी पर्वणीच म्हणायची की! म्हणे नदीत डुबकी मारली की पापक्षालन होतं, काय ही भयंकर अंधश्रध्दा? अंतर्मनात पाप आणि शरीर पाण्याने धुऊन काढायचे आणि आपली माणसांनी केलेली घाण मिसळुन पवित्र नदीमातेचे बेंदाड करुन ठेवायचे म्हणजे एक प्रकारे साथ रोगांना आणि अनारोग्याला प्रेमाने अलिंगन देवून कुरवाळायचे.
शास्त्रज्ञांनी इशारे दिले, जागतिक संघटनेने इशारे दिले, कोरोना महामारीच्या थैमानाने लोकांचा आर्त टाहो काळीज चिरतो आहे, जादू झाल्याप्रमाणे लोक क्षणार्धात गायब होत आहेत ती कायमचीच! आरोग्य यंत्रणेचा फज्जा उडाला आहे स्वार्थ आणि परमार्थ यांच्यातल्या सीमारेषा नाहीशा झाल्यात जमा आहेत. डॉक्टरी व्यवसायाचे रुप प्रचंड बदलले आहे. सेवा आणि व्यवसाय यातला फरक अस्पष्ट झाला आहे! चांगले आणि वाईट यांच्यातला फरक ओळखण्यासाठी कोणता चश्मा घालावा हे अजुन ठरत नाही, अव्वाच्या सव्वा पैसे उकळणे, एकजात प्रत्येक क्षेत्रात निहायत बदफैली, कट प्रॅक्टिसच्या गोरखधंद्याना उत आला आहे. काही अपवाद तेवढे मानवतेच्या भूमिकेतून कोरोना रुग्णांना जीवदान देण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत, स्वत:च्या प्राणांचे बलीदान करत आहेत. अशा वातावरणात प्रचंड भयभयीत आणि केविलवाण्या अवस्थेत लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. समाजमाध्यमांच्या, त्यातही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या भूमिका आक्रस्ताळ्या ठरत आहेत. अशावेळी कुंभमेळ्यात 35 लाख ते 40 लाख लोक एकत्र आल्याचा आकडा अधिकृत सांगतो आहे. या कुंभमेळ्यात हजेरी लावली त्यांपैकी किती जगले, किती स्वर्गस्थ झाले आणि किती महामारीचे वरदान वाटण्यास सिध्द होऊन परतले याची आकडेवारी ईश्वर सुध्दा सांगू शकरणार नाही! “हात दाखवुन अवलक्षण करुन घेणे” म्हणतात ते हेच. आपली प्रतिभा संपली, प्रतिमेची होळी झाली अन् अनेक अनेक लोकांची राखरांगोळी झाली. कुंभमेळा कोरोनाचा महाकुंभ ठरला.
गाडगेबाबा म्हणायचे, “भुकेल्याले अन्न, तान्हेल्याले पाणी, उघडेनागड्याइले वस्तर, बेघराइले आसरा, बेकाराइले रोजगार, दु:खी झाल्याइले हिंमत, गरीब मुलाइले शिक्षण, गरीब तरुणतरुणींचे लग्न, अंधपंगू रोग्याइले औषध, मुक्या प्राण्याइले अभय हेच देवपूजा अन् त्योच आहे रोकडा धर्म” पण आपल्याला अशा जिकरीच्या अवस्थेत सुध्दा गाडगेबाबांच्या मानवता धर्माचे अन् स्वच्छताधर्माचे विस्मरण झाले.
संत तुकाराम महाराज कैकवेळा सांगुन गेले
जे का रंजले गांजले
त्यांसी म्हणे जो आपुले
साधू तोचि ओळखावा
देव तेथेचि जाणावा |
पण आपण मात्र “कर्मकांडात” अडकुन कोरोनाच्या भयंकर महामारीत प्रचंड गर्दीच्या कुंभमेळ्याचे आयोजन केले, अनेक अनेक गर्दीचे कार्यक्रम आयोजित केले आणि आपले खुजेपण सिध्द केले. प्रचंड लोकसंख्येच्या या राष्ट्रात ही मानसिक, वैचारिक, धार्मिक गुलामगिरी परवडणारी नाही. कोरोनाची दुसरी लाट हळुहळु ओसरते आहे आणि तिसऱ्या लाटेचा इशारा मिळालेला आहेच. हा केवळ हिंदू कर्मकांडाचा प्रश्न नव्हे, हा प्रत्येक कर्मकांडाचा प्रश्न आहे. कर्मकांडाच्या आहारी जाऊन गर्दी करा, गर्दीत हरवुन जा की स्वत:च्या निर्जीव देहावर कर्मकांडच करवून घ्या! की ‘विज्ञान आणि तर्क’ ही आयुधे हाती धरून माणुसकीचे जतन आणि मानवजातीचे रक्षण करा, निर्णय सर्वथा तुमचा आहे!
डॉ संगीता जी आवचार, उपप्राचार्य,
कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय,
परभणी
भ्रमणध्वनी: 9767323290
ईमेल [email protected]