बहुसंख्य हिंदूंवर कोण अन्याय करतो ?
प्रा. डॉ. अनंत राऊत
कोणत्याही व्यक्तीचे अथवा समूहाचे नैसर्गिक हक्क कोणत्याही व्यक्तीकडून अथवा समूहाकडून हिरावून घेतले जाण्याला, त्या व्यक्ती वा समूहांना पीडादायक ठरतील अशा प्रकारच्या शोषक, जुलूमकारक अथवा हिंसक कृती करण्याला अन्यायकारक कृती असे म्हणतात. अन्याय कुणाकडूनही आणि कुणावरही होओ तो कधीच समर्थनीय नसतो. कश्मीरी पंडितांवर होणारा अन्याय असो किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा समूहांवर होणारा असो, तो मानवतेवरील हल्ला असतो. अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती कुठल्याही असोत, त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करायचा असतो. पीडितांना न्याय मिळवून द्यायचा असतो. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणेने अन्यायकारक प्रवृत्तींना कठोर शासन करायचे असते. त्या प्रवृत्ती खुलेआमपणे कुठेही अन्याय करू शकणार नाहीत यासाठीची चोख यंत्रणा उभी करायची असते. अमक्या धर्मांधांनी आमच्यावर अन्याय केला म्हणून आम्ही धर्मांधपणे त्या विशिष्ट धर्मानुयायातील सर्वांवरच आक्रमण करू ही आंधळी भूमिका कोणाचीही असो, ती अविवेकी व मानवघातकी असते. आशा प्रवृत्तीतून कधीही न थांबणारे विनाशक असे सूड सत्र सुरू होत असते. मानवाला कायमची सुख-शांती हवी असेल, तर कुठल्याही विशिष्ट धर्मनिष्ठ नव्हे, तर मानव्यनिष्ठ, सर्वसमावेशक व अहिंसक अशा विवेकी दिशेनेच वाटचाल करावी लागेल. वेगवेगळे धर्म म्हणजे काय तर पारलौकिक कल्याणासाठी वेगवेगळ्या उपासना पद्धतीचा अवलंब करणे.जेव्हा सद्भावयुक्त, नैतिक आचरण बाजूला पडते आणि विभिन्न कर्मकांडांनाच अतिरेकी महत्त्व प्राप्त होते तेव्हा खरा धर्म बाजूला राहतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मकांडांचीच भांडणे सुरू होतात. तेव्हा यांचा अथवा त्यांचा अशाप्रकारचा धर्म मानव घातकी ठरतो. भिन्न भिन्न उपासना पद्धतींचा म्हणजेच कर्मकांडांचा धर्म हीच केवळ आपली ओळख आहे, असे मानणेही चुकीचे असते. आपली सर्वांची खरी ओळख माणूस व माणुसकी हीच असली पाहिजे. तिला जपणे, माणसाने माणसाची काळजी घेणे या प्रवृत्तीमध्ये वाढ केली पाहिजे. इतरांच्या द्वेषावर आधारलेला कर्मकांडी धर्मच जेव्हा मेंदूत थैमान घालतो तेव्हा विवेक सुटतो आणि आम्ही माणूस आहोत आणि तेही माणूस आहेत त्यांच्या आणि आमच्या सुखदुःखाच्या गोष्टी सारख्याच आहेत, हे विसरून जातो आणि परस्परांशी क्रूरपणे वागू लागतो. अशा क्रूरतेतून भयंकर हिंसक, विनाशक, आकांतकारक कृती होत जातात. अशा कृती कुठेही कधीही होता कामा नयेत यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या सरकारी यंत्रणेने आणि संपूर्ण मानवी समाजाने दक्ष राहणे आवश्यक असते.
जानेवारी १९९० मध्ये आतंकवादी प्रवृत्तींनी सेवानिवृत्त न्यायाधीश नीलकंठ गंजू, वकील प्रेमनाथ भट, दूरदर्शन केंद्र निर्देशक लासा कौल यांच्यासह अनेक कश्मिरी पंडितांची हत्या केली आणि लाखो कश्मिरी पंडितांना घरदार सोडून स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले.ही अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना होती. अशा कृती करणाऱ्या आतंकवादी प्रवृत्तींचा चोख बंदोबस्त करणे आणि त्यांना कठोर शिक्षा करून पुन्हा अशी कृती करण्याची त्यांची हिंमत होणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष राहणे हे लोकशाही शासन यंत्रणेचे कर्तव्य असते. शासन यंत्रणा हे कर्तव्य बजावत नसेल तर तिच्यावरती लोक संघटनाच्या माध्यमातून आपले कर्तव्य चोखपणे बजावण्यासाठी दबाव आणणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या संघटनात्मक कृती मानवतेच्या रक्षणासाठी आवश्यकच असतात. अशा भूमिका घेणाऱ्या संघटनांवर आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. परंतु एखादी संघटना जेव्हा आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही वर्तमान सांविधानिक राष्ट्रात संविधानाच्या मूळ तत्त्वाला फाटा देत आमच्या विशिष्ट धर्माचे राष्ट्र निर्माण करू असे म्हणत असेल, तर ते राष्ट्राच्या एकजीव अस्तित्वासाठी घातक असते. आमचेच खरे असे म्हणत इतरांवर जोर जबरदस्ती करणारे धर्मांध प्रवृत्तीचे मुसलमान असोत, हिंदू असोत, ख्रिश्चन असोत, शिख असोत, बौद्ध असोत, अथवा जैन असोत असे सारेच धर्मांध राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मानवतेसाठी घातक असतात.म्हणून अशा प्रवृत्ती कोणत्याही धार्मिक समूहामध्ये वाढणार नाहीत. सर्वच धर्मानुयायांमध्ये परस्परांचा आदर करणाऱ्या सद्भावयुक्त सर्वसमावेशक मानवतेचे पालन करणाऱ्या प्रवृत्ती वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण रीतीने प्रयत्न करणे आवश्यक असते. सर्वच धर्मांमधील अतिरेकी धर्मांध प्रवृत्तींवर मानवतावाद्यांचा दबाव राहील याची दक्षता घेणे आवश्यक असते. हे न करता एका धर्मांधतेला दुसऱ्या धर्मांधतेने उत्तर द्यायला लागलो तर त्यातून मानवघात आणि राष्ट्रघात ठरलेला आहे, हे कुणीही विसरून चालणारणार नाही. हिंदूंवर अन्याय होतो असे म्हणणाऱ्या सदरील संघटनेतील मंडळींना खरोखरच न्यायाची चाड आहे काय? यांच्यामध्ये अन्यायकारक प्रवृत्ती मुळीच नाहीत काय? हे मुद्दे आता वस्तुनिष्ठ पद्धतीने लक्षात घेऊ. ज्याला आज हिंदू धर्म म्हटले जाते तो मुळातला हिंदू धर्म नसून वैदिक ब्राह्मणी धर्म आहे. भारतावर मोगलांचे आक्रमण होण्यापूर्वी हिंदू हा शब्द अस्तित्वातच नव्हता अशी मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. वेद, गीता इत्यादी ग्रंथांमध्ये हिंदू हा शब्द आढळत नाही. इथल्या या धर्मियांना हिंदू हे नामाभिधान मुसलमानांनी दिलेले आहे. मुसलमानांनी दिलेले हे नामाभिधान आज वैदिक ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कर्त्यांना गर्व स्वरूप वाटावे हे आश्चर्यकारक आहे. कोणत्याही स्वरूपाच्या अन्यायाला विरोधच केला पाहिजे आणि अन्याकारक प्रवृत्तींचा बंदोबस्त केला पाहिजे, ही कोणत्याही मानवतावाद्याची भूमिका असते, तशी ती माझीही आहे. हिंदूंवर कोण अन्याय करतो? हिंदूंवरील अन्यायाचे स्वरूप काय आहे? हा अन्याय कुठे व केव्हा केव्हा होतो? हिंदू धर्माचे स्वरूप मूलतः अन्यायाच्या विरोधी आहे काय? हिंदू धर्मातील मंडळींचा प्रत्यक्ष जीवनव्यवहार न्यायपूर्ण राहिलेला आहे काय? हिंदू धर्माच्या मूलभूत रचनेनुसार सारे हिंदू धर्मीय एक आहेत काय? हिंदू धर्माने सर्व हिंदूंना समान अधिकार दिलेले आहेत काय? हिंदू धर्माची रचना समतल आडवी आहे की विषमतावादी उभी आहे? हिंदू धर्माचे म्हणून असलेले अधिकार तरी सर्व हिंदू धर्मीय म्हणवल्या जाणाऱ्यांना न्यायपूर्ण रीतीने दिलेले आहेत काय? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे लक्षात घेतली की हिंदूवरील अन्याय म्हणजे कोणावरील अन्याय? आणि हिंदूंवर मोठ्या प्रमाणात नेमके कोण अन्याय करते? हे सहजपणे स्पष्ट होऊ शकेल. हिंदू धर्माच्या मूलभूत रचनेनुसार सारे हिंदू एक नाहीत. सर्व हिंदूंना धर्माचे म्हणून असलेले अधिकारही न्यायपूर्ण रीतीने दिलेले नाहीत. स्वविकास विषयक अधिकारही न्यायपूर्ण रीतीने दिलेले नाहीत, हे अगदी स्पष्ट आहे. सारे हिंदू तितके एक, साऱ्या हिंदूंना सारे अधिकार अशी स्थिती प्रत्यक्षात नाही. कारण हिंदू धर्माची रचना वर्ण जातिव्यवस्थेच्या पायावर झालेली आहे. अनैसर्गिकपणे गृहीत धरलेली विषमता, भेदाभेद, अधिकारांची अन्यायपूर्ण विभागणी हे वर्णजातिव्यवस्थेचे खास वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र,अतिशूद्र,हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या लोकांची हजारो जाती पोटजातींमध्ये केलेली अमानुष विभागणी, या जातीपोटजातींमध्ये उच्चनीचतेचे अनेक भेद,अधिकारांची विषम विभागणी आशा सगळ्या भेदाभेदांनी युक्त रचनेचे जंजाळ म्हणजे हिंदू धर्म. ‘सर्व वर्ण आणि जातींचे मिळून असलेले लोक म्हणजे हिंदू’ ही व्याख्या हिंदू जागरणवाल्या मंडळींनाही मान्य करावी लागेल. सदरील व्यख्येनुसार हिंदू धर्मियांवर सर्वाधिक अन्य कोणी केला आणि सर्वाधिक अन्याय कोण करतो? याचे प्रश्नाचे उत्तर असे आहे की, हिंदू धर्माच्या समाजरचनेत कनिष्ठ स्थानी ठेवलेल्या बहुसंख्य हिंदूंवर स्वतःला उच्च समजणाऱ्या हिंदूंनीच प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे; आणि आज देखील स्वश्रेष्ठतावादी अल्पसंख्य हिंदूधर्मीय बहुसंख्य हिंदू धर्मियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करतात, हे अनेक पुराव्यानिशी सिद्ध करता येणारे वास्तव आहे. परंतु हा अन्याय हिंदू जागरणाचे नाव घेऊन काम करणाऱ्या या मंडळींना कधीच दिसत नाही. कारण फक्त ब्राम्हणांवरील अन्याय म्हणजे हिंदूंवरील अन्याय ही यांची भूमिका असते. आणि हा अन्याय मुसलमान करतात हेही यांचे म्हणणे असते. म्हणून हिंदूंनी मुसलमानांविरुद्ध काम केले पाहिजे. मुसलमानांचा द्वेष केला पाहिजे. २०६१ पर्यंत हिंदू अल्पसंख्य होतील. पाकिस्तानात मंदिर बांधू दिले जात नाही. हे यांचे अन्यायविषयक मुद्दे असतात. अशा प्रकारचे मुद्दे समोर करून बहुसंख्य भाबड्या हिंदू धर्मियांवर कब्जा करून बसलेले, त्यांचे मानवी अधिकार काढून घेणारे,त्यांच्यावर वर्चस्व गाजवणारे हिंदू धर्मातील बरवर्णीय, वरजातीय लोक हिंदूंवर जे पिढ्यानुपिढ्या अन्याय करत आलेले आहेत; आणि आजही अन्याय करत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडतात.
मी हिंदूंवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी निघालेल्या माझ्या या बांधवांना विचारतो की हिंदूंच्या वर्णजातिव्यवस्थेने समग्र हिंदूंच्या मुक्त विकासावर अनेकविध अन्यायकारक बंधने लादली की नाही? संस्कृत ही देवभाषा असते, ती फक्त ब्राह्मणांनी शिकायची असते इतरांनी नाही, अशी भूमिका कुणी घेतली? अशी भूमिका घेऊन कनिष्ठ स्थानी ठेवलेल्या हिंदू धर्मियांवर संस्कृतमध्ये लिहिले गेलेले वेद वाचण्याची बंदी कोणी घातली? शूद्रांनी हातात शस्त्र धरता कामा नये हे बंधन कोणी लादले? अस्पृश्यतेची अमानूष चाल कुणी निर्माण केली? अस्पृश्यांवर पिढ्यानुपिढ्या कुणी अन्याय केले? अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाची बंदी कुणी केली? काळाराम मंदिरातल्या प्रवेशासाठी बाबासाहेब आंबेडकर आंदोलन करत होते तेव्हा अनेक वर्षे या आंदोलनाला कोणी विरोध केला? ब्राह्मण म्हणजे सर्वात श्रेष्ठ, त्यांना साऱ्यांवर वर्चस्व गाजवण्याचा अधिकार. क्षेत्रीय त्यांच्यापेक्षा खालचे. वैश्य वरील दोघांपेक्षाही खालचे, असंख्य जातींमध्ये विभागलेले शूद्र वरील तिघांपेक्षा खालचे, असंख्य जातींमध्ये विभागलेल्या अतिशूद्र वरच्या चौघांपेक्षाही खालचे हे उच्चनीचतेची रचना कोणी निर्माण केली? अशा प्रकारची विषम रचना मुस्लिमांनी आणि ख्रिश्चनांनी निर्माण केली आहे काय? खालच्या स्तरात ठेवलेल्या या हिंदूंचे मानवी अधिकार पिढ्यानुपिढ्या मुस्लिम व ख्रिश्चनांनी हिरावून घेतलेले आहेत आणि आजही हिरावून घेतले जातात असे आपणास म्हणायचे आहे काय? असे आपण म्हणू शकत नाही. कारण कनिष्ठ जातीत ठेवलेल्या हिंदू धर्मीयांचे अधिकार स्वतःला हिंदू धर्माचे पुढारी म्हणवून घेणाऱ्या ब्राह्मणांनी हिरावून घेतलेले आहेत. त्याला स्वतःस क्षेत्रीय म्हणवून घेणाऱ्यांचेही सहकार्य लाभलेले आहे. हे केवळ इतिहासातले दाखले आहेत असे नाही, तर वरिष्ठ जातीतील हिंदूंकडून कनिष्ठ जातीतील हिंदूंवर आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतात. त्यांचे माणूस म्हणून असलेले हक्क नाकारले जातात. उच्चनीचतावादी जातीय रोगाच्या विषाणूंनी किडून गेलेला हिंदूच हिंदूंना जवळ घेत नाही, हे इथले रखरखते वास्तव आहे. आज देखील मोठमोठ्या शहरांमध्ये वरिष्ठ जातीतील हिंदू लोक कनिष्ठ जातीतील हिंदूंना घर भाड्याने देत नाहीत. आपल्या कॉलनीमध्ये प्लॉट विकत देत नाहीत. फ्लॅटही विकत देत नाहीत, हे आजचे वास्तव आहे.
मी आपणास विचारतो की माणसाला दलित कुणी केलं? जन्मत: माणूस दिलीत असतो काय? हिंदूंच्या विषमतावादी व्यवस्थेने माणसांचे मानवी हक्क हिरावून घेतले आणि माणसासारख्या माणसाला हीन, दीन, लाचार म्हणजेच दलित बनवले. हिंदू धर्माच्या विषमतावादी रचनेचे फलित म्हणजे माणसाचे दलितत्व. आजही हे दलितत्व संपलेलं नाही. या दलितांवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात करतात ते हिंदूच. हे अन्याय आपल्याला कसे काय दिसत नाहीत? मी भूतकाळाचं बोलत नाही वर्तमानाचं बोलतोय. स्वतःला सवर्णीय आणि उच्च म्हणवून घेणारे हिंदू आजही दलितांचा अनन्वित छळ करतात. दलित स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात बलात्कार होतात. दलित तरुणांनी लग्नानिमित्त घोड्यावर बसून वरात काढली म्हणून त्याला बेदम मारहाण केली जाते. सवर्ण हिंदू अनेक ठिकाणी कायदा हातात घेऊन अत्यंत अमानुषपणे दलितांचा छळ करतात. नॅशनल क्राईम ब्युरो (NCRB) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१६ मध्ये दलितांवरील त्याचाराचे ४०८०१ गुन्हे नोंदवले गेले. २०१७ मध्ये दलितांवरील अत्याचारांचे ४३२०३ गुन्हे नोंदवले गेले. २०१८ मध्ये दलितांवरील अत्याचारांचे ४२७९३ गुन्हे नोंदवले गेले. दलितांवर अत्याचार करण्यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.२०१८ मध्ये उत्तर प्रदेशात ११९२४ दलितांवर अत्याचार झाले. बिहारमध्ये ७०६१ दलितांवर अत्याचार झाले. मध्यप्रदेशात ४७५३ दलितांवर अत्याचार झाले. राजस्थानमध्ये ४६०७ दलितांवर अत्याचार झाले. हे दलित हिंदू नाहीत काय? या हिंदूंवर सवर्णीय हिंदूंनी केलेले अत्याचार हिंदू जनजागरणवाल्यांना कसे काय दिसत नाहीत?या अन्याय अत्याचाराविरुद्ध आपण कधीच कसे काय बोलत नाही?
आपणाला खरोखरच प्रामाणिकपणे समग्र हिंदूंवरील अन्याय दूर करायचा असेल व हिंदूंना एक करायचे असेल, तर वरिष्ठ जातीतल्या हिंदूंकडून कनिष्ठ जातीतल्या हिंदूंवर होणारा अन्याय दूर करण्याची व्यवस्था करावी लागेल. कनिष्ठ स्थानी ठेवलेल्या हिंदूंना भारताच्या सत्ता संपत्तीमध्ये अग्रक्रमाने न्याय्य वाटा द्यावा लागेल. ही व्यवस्था करण्यासाठी आपणाला हिंदूंमधील जातिव्यवस्थेचा अंत करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. हिंदूमध्ये बेटीबंदीची चाल अजूनही कठोरपणे पाळली जाते. बेटी बंदीच्या चालीने हिंदूंमधील जातिव्यवस्था कायम टिकवून ठेवलेली आहे. हिंदूंना एक करायचे असेल तर अग्रक्रमाने जातीअंताचा कार्यक्रम राबवावा लागेल. त्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठीचे आंदोलन चालवावे लागेल. या कुठल्याही गोष्टी न करता आपल्यातल्या अन्यायकारक प्रवृत्ती तशाच झाकून ठेवून फक्त मुसलमानांकडे बोट दाखवल्याने प्रश्न संपणार नाहीत. वरिष्ठ हिंदूंकडून कनिष्ठ हिंदू माणसावर होणारा अन्याय दुय्यम लेखून तुम्ही फक्त अंध भावनिक राजकारण करता. मंदिर मज्जीदीचे वाद माजवता. सावरकर म्हणाले गाय हा उपयुक्त पशु आहे. तुम्ही गाईला माता म्हणून गाईसाठी माणसांवर हल्ले करता. गंगामातेच्या नावाने गळे काढता कोण तिच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम प्रामाणिकपणे कधीच राबवत नाही. जातिव्यवस्थेने हिंदूंच्या मनांची घाणेरडी बनवलेली गंगा शुद्ध करण्याचा विचार तर तुमच्या मनाला स्पर्शही करत नाही. कल्पित भावनिक प्रश्न निर्माण करता त्यांना महत्त्व देता आणि जे अन्यायाचे अस्सल मुद्दे आहेत ते बाजूला ठेवता. असे केल्याने हिंदूंचे हित होणार नाही ना राष्ट्राचे हित होणार नाही. हिंदूंची जातिव्यवस्था आणि हिंदूंकडूनच हिंदूंवर होणारे अन्याय-अत्याचार थांबवण्याचे काम आपण केले नाही तर भविष्यकाळात नक्कीच हिंदू अल्पसंख्य ठरतील. कारण वरिष्ठ जातीतले हिंदू कनिष्ठ जातीतील हिंदूवर असेच अत्याचार करत राहिले तर ते हिंदू धर्माला नक्कीच सोडचिठ्ठी देतील.
आता आपण हिंदूंच्या जनसंख्येचा जरा हिशोब मांडू वर्तमान भारताच्या १३० कोटी जनसंख्येमध्ये अनुसूचित जातीचे१६ .२% हिंदू आहेत. ८.२ % आदिवासी आहेत. ५२% ओबीसी आहेत.या साऱ्यांची भारतीय जनसंख्येतील आकडेवारी काढायची झाली तर अनुसूचित जातीचे लोक सामान्यपणे साडे सोळा कोटी कोटी आहेत. अनुसूचित जमातीचे लोक साडेआठ कोटी आहेत. आणि ओबीसी हिंदू चोपन्न कोटी आहेत. हे सरासरी ७९ कोटी हिंदूं विकसित होऊ लागले आणि आपल्या बरोबरीने येऊ लागले तर ते सवर्ण हिंदूंना सहन होत नाही. उच्चजातीय हिंदूच कनिष्ठ जातीय हिंदूंच्या विकासात नेहमी अडथळे आणतात. व विशेषतः हिंदूंवरील अन्यायाची ओरड करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांना कनिष्ठ स्थानी ठेवलेल्या ७९ कोटी हिंदूंचा विकास सहन होत नाही. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो एक छोटासा तुकडा मागासलेल्या हिंदूंना मिळतो, तो या हिंदुत्ववाद्यांना मुळीच सहन होत नाही, हे इतिहासकाळातील त्यांच्या वेगवेगळ्या कृतीवरून समोर आलेले आहे. ओबीसी हिंदूंसाठी आरक्षणाची भूमिका मांडणाऱ्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला याच मंडळींनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता. धार्मिक राजकीय व आर्थिक सत्तेवर कब्जा मिळवून बसलेल्या उच्च जातीतील अल्पसंख्याक हिंदूंनी या ७९ कोटी हिंदूंना इथल्या सत्ता संपत्तीमध्ये अजूनही योग्य तो वाटा मिळू दिलेला नाही. आजही स्वर्णीय हिंदू या ७९ कोटी हिंदूंचे शोषण करतात. या ७९ कोटी हिंदूंमधील काही जागृत झालेले हिंदू सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व क्षेत्रातील सत्ता प्राप्त करण्यासाठी संघटित होऊन पुढे येऊ लागले तर जातीच्या नावावर त्यांची विभागणी करतात. फोडा आणि झोडाची नीती वापरतात किंवा धर्माची अफू पाजून वास्तव प्रश्नांसाठी लढण्याच्याच्या भूमिकेपासून त्यांना दूर करतात.
भारतीय संविधानाच्या पायावर उभ्या असलेल्या भारत या राष्ट्राला बलवान बनवण्यासाठी ही स्वार्थी नीती आता तरी बंद केली पाहिजे. जुने प्रश्न उकरून काढून, धर्माधर्मात द्वेषमत्सर वाढवल्याने, मंदिर, मस्जिद इत्यादी कुठल्याही धर्माची प्रार्थना स्थळे पाडल्याने अथवा बांधल्याने , गो माता गो माता, गंगा माता गंगा माता असा जप केल्याने राष्ट्र उभे राहत नसते. एकजीव होऊ शकत नसते आणि सर्व अंगांनी प्रगती देखील करू शकत नसते. केवळ धर्मांची प्रार्थना स्थळे, गायी, गंगा इत्यादी गोष्टी म्हणजे राष्ट्र नसते.देशात राहणाऱ्या संपूर्ण माणसांनी मिळून राष्ट्र बनत असते. देशातील सर्व माणसांना एकजीव करण्याचा व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा विचार हा राष्ट्रवादी विचारअसतो.एका धर्माच्या माणसांना दुसर्या धर्माच्या माणसांचा द्वेष करावयास शिकवण्यातून कधीच राष्ट्र उभे राहत नसते.हिंदू जनजागरण आणि हिंदुत्ववादी संघटना बहुसंख्य हिंदूंचे खरे प्रश्न तसेच झाकून ठेवतात आणि विशेषतः इतर मागास वर्गीय बहुसंख्य हिंदूंना मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवतात.
देशात राहणाऱ्या बहुसंख्य माणसांना तसेच दुबळे व प्रगतीपासून दूर ठेवून बलवान राष्ट्र घडत नसते. बलवान राष्ट्र घडण्यासाठी देशातील दुबळ्या माणसांना सबळ बनवण्याचा कार्यक्रम अग्रक्रमाने हाती घेणे गरजेचे असते. परंतु हिंदुत्ववाद्यांचा कार्यक्रम या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारा असतो. देशांमध्ये धर्माच्या व जातीच्या नावावर फूट पाडणारा असतो. देशातील जनतेला आंधळ्या भावनिक गोष्टीत गुंतवणारा असतो. आपले भारत हे राष्ट्र खऱ्या अर्थाने एकजीव आणि मजबूत बनवण्यासाठी, सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी हिंदू राष्ट्राच्या वल्गना करणे थांबवून सकलजन कल्याणकारी अशा संविधाननिष्ठ राष्ट्रवादाला मजबूत करणे आवश्यक आहे. कारण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत दूरदृष्टीच्या राष्ट्र निर्मात्यांनी फार मोठ्या विचारमंथनातून हे राष्ट्र सर्वसमावेशक अशा सांविधानिक पायावर उभे केलेले आहे. या सांविधानिक भूमिकेच्या विरुद्ध जाऊन राष्ट्राच्या एकजीव अस्तित्वाला विस्कटून टाकण्याचा दुर्विचार कुणीही करता कामा नये.
सेक्युलॅरिझम हे देशातील प्रत्येक व्यक्तीचे जन्मल्यापासून मृत्युपर्यंतचे जीवन सुखी व संपन्न बनवून पाहणारे तत्त्व आहे. हे तत्त्व नैतिकता, सदाचार, परोपकार इत्यादी मूल्यांचा आग्रह धरणार्या कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही. हे तत्त्व देशातील शासनकर्त्यांना प्रचलित विविध धर्म संप्रदायांच्या संदर्भात तटस्थ राहण्यास सांगते. सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था, आरोग्य व नीतिमत्ता यांच्या अधीन राहून कोणत्याही धर्माचे पालन व प्रसारण करण्याचे स्वतंत्र्य भारतीय संविधानाने या देशातील सर्व नागरिकांना दिलेले आहे. असे स्वातंत्र्य देणारी भूमिका सेक्युलर स्वरूपाचीच आहे. हिंदुत्ववादी मंडळी या सेक्युलरवादाची खिल्ली उडवतात. एका धर्मांधतेला दुसऱ्या धर्मांधतेने उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. पण हा वेडाचार आहे. एका धर्मांधतेला विवेकशीलतेने उत्तर देणे गरजेचे असते. देशातील सर्वांना सेक्युलर बनवणे गरजेचे असते. त्यासाठी प्रचंड मोठी प्रबोधन प्रक्रिया केली पाहिजे. भारतातील सर्व नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी झटले पाहिजे. जगा आणि जगू द्या, परोपकार करा, नैतिकतेने वागा,मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या विकारांवर विजय मिळवा अशाप्रकारची शिकवण देणारा धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे. सर्वांच्याच धर्मामध्ये अशा प्रकारची तत्त्वे असतात त्या तत्त्वांना प्रोत्साहन द्या. कर्मकांडांच्या प्रदर्शनाची अघोरी स्पर्धा करणाऱ्या गोष्टी खऱ्या धर्मात बसत नाहीत. मानवता व माणुसकी हाच खरा धर्म असतो.असा धर्म प्रस्थापित करण्यासाठीची प्रचंड मोठे आंदोलने प्रचंड मोठ्या ताकदीने या देशात चालवण्याची गरज आहे. हे न करता कुणाच्यातरी द्वेषावर आधारलेली चळवळ चालवणे अत्यंत घातक असते. हिंदूंमधील धर्मांधता आणि जातीय विषमता नष्ट करण्यासाठी जातीअंत करणे आवश्यक आहे, तसेच मुस्लिम धर्मांधांना धर्मांधतेतून बाहेर काढण्याच्या उपाययोजना करणेही आवश्यक आहेरा. त्यासाठी मुस्लिमांमधील अंधश्रद्धा कमी करून त्यांच्यामध्ये बुद्धिवादी, विज्ञानवादी, परिवर्तनवादी विचार रुजवणे व मुस्लिमांमधील परिवर्तनवादी विचारधारेच्या लोकांची संख्या वाढवण्यास बळ देणे हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. मुस्लिमद्वेष हा मार्ग कधीच योग्य ठरू शकत नाही. मुस्लिम धर्मांध आहेत म्हणून हिंदूंना धर्मांध बनवा हा अविचार आहे. हा विचार सोडून प्रगल्भ दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. भारतामधील हिंदू,मुस्लीम ख्रिस्ती, पारसी, जैन, बौद्ध अशा वेगवेगळ्या धर्माची उपासना करणाऱ्या संपूर्ण जनतेचे कल्याण शेतीत हरित क्रांती करण्यात, धवलक्रांती करण्यात, अनेकविध कारखाने उभारण्यात, सर्वांसाठी उत्तम शिक्षण देण्यात, सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यात, शोषण यंत्रणा थांबवण्यात, सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा देण्यात, देशाची बौद्धिक आणि वैज्ञानिक प्रगती करण्यात राष्ट्रवाद असतो. हा राष्ट्रवाद संविधान सांगते, हिंदुत्व, मुस्लिमत्व किंवा इतर कुठलेही धर्मत्व सांगत नाही, हे जाणकारांनी व संपूर्ण भारतीय जनतेने नीट लक्षात ठेवले पाहिजे; आणि धर्माधर्मात द्वेष पसरवून संघर्ष वाढवणाऱ्या अशा प्रकारच्या फुटीरतावादी चळवळी बंद केल्या पाहिजेत
हिंदू धर्म संविधानापूर्वीच्या काळातही अस्तित्वात होता, पण भारत एक राष्ट्र नव्हता भारताचे एक राष्ट्र बनवण्यची दृष्टी इंग्रजांच्या आगमनानंतर आपल्या देशात आली. इंग्रज आल्यानंतरच आपापसात लढणे सोडून आपण इंग्रजांशी व आपल्या देशातील अमानुष रूढी परंपराविरुद्ध लढू लागलो. त्यातूनच नवीन राष्ट्र संकल्पना उदयाला आलेली आहे. हे राष्ट्र फार मोठ्या प्रयासाने आपल्या संविधान निर्मात्यांनी उभे केलेले आहे. तेव्हा हिंदू राष्ट्राच्या नावाखाली संविधानाच्या पायाला सुरुंग लावणारी ही चळवळ जास्त घातक आहे. म्हणून ही चळवळ बंद करून देशातील प्रत्येक नागरिकाचे कल्याण करण्याची भूमिका घेणाऱ्या चळवळी इथे वाढवल्या पाहिजेत. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, बुद्धिवाद व विज्ञानवाद ही सांविधानिक मूल्ये भारतीय जनमानसात खोलवर रुजवल्यानेच या देशातील सर्व जनतेचे कल्याण होणार आहे. परंतु हिंदु राष्ट्राची भूमिका घेणाऱ्या मंडळींच्या ओठांवर ही मूल्ये कधीच येत नाहीत.संकुचित व परद्वेषावर आधारलेल्या राष्ट्र घातक भूमिकेतून सर्वांनीच बाहेर येणे व सांविधानिक तत्त्वज्ञानाच्या पायावर उभा राहिलेला आपला सर्वसमावेशक राष्ट्रवाद बळकट करणे हे खऱ्या राष्ट्रवाद्यांचे काम आहे.
हिंदू राष्ट्र निर्माणार्थ अधिवेशन घेणाऱ्या मंडळींच्या भूमिका संविधानद्रोही तर आहेतच आशा या भूमिका राष्ट्रद्रोही कशा ठरू शकतात ते लक्षात घेऊ. भारतीय कायदे संहितेच्या १२१ ते१२४ मध्ये देशद्रोही कृती कोणत्या ठरतात आणि त्यांना कशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकते याबद्दलच्या नोंदी आहेत. देशद्रोही कृती करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. देशाविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करणे किंवा युद्ध करणे, भारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी हत्यारे जमवणे, हत्यारे लपवून ठेवणे, बेकायदेशीर मार्गाने सत्तेला आव्हान देणे, संविधानाला नाकारणे त्याला कमी लेखणे, राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करणे या राष्ट्रद्रोही गोष्टी असतात. “इंडिया दॅट इस भारत” ही संविधांनी राष्ट्रवादाची भूमिका नाकारून हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे अशी भूमिका घेणे राष्ट्रद्रोही ठरू शकते. म्हणून या मंडळींनी संविधानद्रोही म्हणजेच राष्ट्रद्रोही ठरणारी भूमिका तात्काळ सोडून देणे गरजेचे आहे. ***