तंत्रशिक्षणाचे सुवर्णयुग,,,,

शिवास्त्र : 


तंत्रशिक्षणाचे सुवर्णयुग 

आत्मनिर्भर भारत या निग्रहानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबल हा नारा देऊन स्किल इंडिया मिशन सरकारने हाती घेतल्याचे सुतोवाच दिले आहेत. मा. कस्तुरीरंगन यांनी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. शेकडो विदेशी कंपन्यांनी भारतात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. सोशल मिडियाचा लिजेंन्ड ठरलेल्या मार्क झुकेरबर्गने तब्बल त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नुकतीच जियो मध्ये केली आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी अंतर्गत उद्योग व्यावसायिकांनी तंत्रशिक्षण क्षेत्रात संशोधन वाढण्यासाठी रिसर्च लँबच्या उभारणीकडे आपल्या एक्स्पर्ट टिमचे लक्ष वेधले आहे. प्रत्येक क्षेत्रात मशिन्सचा वापर वाढत आहे. कुठलेच क्षेत्र असे राहिले नाही जिथे तंत्रज्ञानाचा वापर होत नाही. अगदी मोठमोठ्या सर्जरीज सुध्दा आता मशीन शिवाय पुर्ण होत नाहीत. त्यामुळे मेडिको टेक्निकल ही नवीनच संकल्पना तंत्रशिक्षणात रुळत आहे. ऑटोमायझेशन, रोबोटिक्स, व्हर्च्युअल इंटलिजन्स, यासारख्या कितीतरी अत्याधुनिक वैज्ञानिक संज्ञा आपल्या अंगवळणी पडत आहेत. झुम मिटिंग, गुगल क्लासरूम, वेबिनार, फेसबुक लाईव्ह, युट्युब, इत्यादी ऑनलाइन माध्यमांचा प्रचंड वापर प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सगळीकडेच वाढला आहे. नव्या युगाच्या शिक्षाप्रणालीसाठी भारतीय तरुणाई सज्ज होत आहे.  
भारत जागतिक महासत्ता होणार हे मागच्या अनेक वर्षांपासून ऐकत ऐकत आपल्या देशातील बालके तरुण झाली आणि तरुण पोक्त वयात आलेत. भारत जागतिक महासत्ता होणार हे मागच्या अनेक वर्षांपासून आपण सगळेच ऐकतोय, पण कशाच्या जोरावर.? या प्रश्नाचं उत्तर आहे ‘युवा लोकसंख्या.!’ एकशे छत्तीस कोटी लोकसंख्येच्या भारतात जगातलं सगळ्यात जास्त युथ आहे. जगातलं पन्नास टक्के युथ पॉप्युलेशन एकट्या भारतात आहे. त्यामुळे अख्ख्या जगाचं लक्ष भारताकडे वेधलं गेलंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही देश तंत्रज्ञानाला वगळून महासत्ता होऊ शकत नाही याची जाणीव जागृती आपल्याकडे वाढत आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण घेण्याकडे तरुणांचा ओढा दिवसेंदिवस वाढतोय. ग्रामीण भागातील तंत्रशिक्षण देणाऱ्या कित्येक शिक्षणसंस्था कात टाकून नव्या युगाच्या नांदीसाठी सुसज्ज होत आहेत. महाराष्ट्र शासनाने सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे स्थापून राज्यभर आयआयटी व एनआयआयटीच्या धर्तीवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचा केंद्रीय अभ्यासक्रम तंत्रशिक्षणात अवलंबण्याचा निर्णय चार वर्षांपुर्वीच घेतला. मराठवाड्यातील बहुतांश सर्व इंजिनिअरींग कॉलेजमधील डिबाटूच्या बिटेक डिग्रीची पहिली बँच पुढच्या वर्षी बाहेर पडेल. इंडस्ट्री इंन्टर्नशीप, प्रोजेक्ट ओरिएंन्टेड प्रँक्टिकल्स, रिसर्च बेस्ड सिस्टीम, रिमेडियल एक्झाम पँटर्न यामुळे डिबाटूची डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या इंजिनिअर्ससाठी राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्या आपले दरवाजे सताड उघडे ठेवून स्वागत करत असल्याचे दिसून येते. नांदेडच्या मातोश्री इंन्क्युबेशन सेंटर अँन्ड प्लेसमेंट सेलने कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावाच्या काळातही शंभर टक्के प्लेसमेंटचे उद्दिष्ट गाठले आहे. याचाच अर्थ दर्जेदार गुणवत्तेला संधी उपलब्ध होते हे सिध्द झाल्याने तंत्रशिक्षणाचे सुवर्णयुग मराठवाड्यात अवतरले असे म्हणायला वाव आहे.  
दररोज मिळणारा दिड जीबी डाटा संपविणारी टेक्नोसायव्ही भारतीय तरुणाई करिअरच्या बाबतीत सिरियस होत आहे. ऐकीव गोष्टींवर नव्हे तर प्रत्यक्ष खातरजमा करून निर्णय घेणारी पिढी गुगलवर ज्ञानसाधनेसाठी वेळ खर्च करते हा सुदिन याचि देही याचि डोळा बघण्याचे भाग्य लाभलेली ही पिढी आहे. टेक्निकली परफेक्ट असण्यासोबतच मुल्यवर्धन सुध्दा गरजेचे असते. संभाषण कौशल्य, लेखन कौशल्य, जलद निर्णय क्षमता, खंबीर मनोबल, कला व क्रिडा निपुणता, शारिरीक सुदृढता, निरोगी शरीर, इत्यादी असंख्य बाबीने परिपुर्ण व सर्वगुणसंपन्न तरुण घडविण्यासाठी केंद्र सरकारच्या संकल्पनेतील अटल व मातोश्री इंन्क्युबेशन सेंटर्स सहाय्यभूत ठरत आहेत. जगाच्या बाजारात कुठेही गेला आणि कितीही जीवघेणी स्पर्धा असली तरीही यशोशिखर गाठण्याची धमक असलेला तरुण घडविणे हाच मुळी मातोश्री इंन्क्युबेशन सेंटरच्या स्थापनेचा मुलगामी उद्देश आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढविणे क्रमप्राप्त ठरते आणि निकोप स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. इंजिनिअरींग व मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा युपीएससी परिक्षातील यशात सातत्याने वाढणारा टक्का नक्कीच मातोश्री इंन्क्युबेशन सेंटर सारख्या अनेक नाविन्यपुर्ण उपक्रमाची देण आहे. कठोर परिश्रम करण्याची तयारी असली की मार्गदर्शन करणाऱ्यांची फौज उभी राहू शकते. त्यामुळे क्षमता, पात्रता, कुवत या बेड्या गळुन पडल्या आहेत. आवड असली की सारे काही सुकर होते. ध्येय उच्च ठेवून ते गाठण्याची मानसिकता मात्र ज्याची त्यालाच घडवावी लागते, उच्च ध्येय बाळगणाऱ्यांसाठी तंत्रशिक्षणाचे सुवर्णयुग अवतरत आहे…      

इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील 

 मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली 

    राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद   

  [email protected]
78759775559421377555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *