मौत वो है जिसका करे जमाना अफसोस
यूँ तो दुनिया में सभी आए हैं मरने के लिएअब कभी न जागूंगा
मैं तेरे जगानेसेमौत ओढ़ ली मैंने नींद के बहाने से
वो बुलाती है मगर जाने का नही हा ट्रेंड भारतभर प्रसिद्ध करणाऱ्या राहत इंदौरीची शायरी असामान्य होती. इंदोरीला तिने बोलवू घेतले आणि राहत गेले. परंतु त्यांच्या शायरीला मौत कधीच बोलवू शकत नाही. आपल्या शब्दांना अजरामर करुन जाणारा लोकप्रिय शायरीचा महासागर आता आटून गेला आहे. कवीच्या डोक्यात सतत शब्दांचा महासागर खवळत असतो. तिथेच प्रतिभावान कवितेचा जन्म होतो. सृजनशील शायरीचे ते जन्मदाते होते. त्यांच्यासारखे व्यक्तित्व अनेक पिढ्यानंतर जन्माला येते. परंतु त्यांना ओळखण्याला अनेक वर्षे लागतात. एका नव्या माणूसकीचा तो नवाच शोध होता. ते धर्माच्या आणि भाषेच्या मर्यादेत कधीच नव्हते. त्यांची एकच भाषा होती प्रेमाची, आपुलकीची. ते सर्वसामान्य, वंचितांची बाजू समर्थपणे मांडणारा एक खंबीर शायर होते. त्यांच्या जाण्याने उर्दु साहित्याची भरुन न निघणारी हानी झाली आहे. त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या. हिंदी कविसंमेलन व मुशायरा यांसारखे कार्यक्रमांत ते फार लोकप्रिय होते. त्यांची शायरी ऐकण्यासाठी लोक रात्रभर जागून वाट पाहत असत. त्यांचा शेरो शायरी सादर करण्याचा ‘अंदाज-ए-तरन्नुम’ काही औरच होता.
राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर होते. त्याचसोबत बॉलिवूडमध्येही त्यांनी अनेक गाणी लिहिली आहेत. राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर तर आहेतच, याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली आहेत. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली आहेत. आज हमने दिल का हर किस्सा (सर), खत लिखना हमें खत लिखना (खुद्दार), रात क्या मांगे एक सितारा(खुद्दार), देखो देखो जानम हम दिल अपना (इश्क), एम…बोले तो…बोले तो (मुन्नाभाई एमबीबीएस), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर), नींद चुराई मेरी (इश्क), मुर्शिदा(बेगम जान) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. ते उर्दू साहित्यातील अभ्यासक होते. त्याचसोबत उत्तम वक्ते होते. त्यांच्या शायरीने अनेक तरुणांची मन जिंकली, त्यामुळे टिकटॉकसारख्या माध्यमातून ‘वो बुलाती है मगर जाने का नहीं’ या शायरीने धुमाकूळ माजवला होता. भारतासह त्यांना परेदशातूनही निमंत्रण येत असे. त्यांची क्षमता, प्रचंड मेहनत आणि शब्दकौशल्य कायम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यात शंका नाही. राहत इंदौरी फक्त साहित्यात आणि कलेत माहिर होते असं नाही तर शाळा-कॉलेजच्या दिवसात ते फुटबॉल आणि हॉकीटीमचे कॅप्टनही होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना कॉलेजमध्ये आपली पहिली शायरी ऐकवली होती.
राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन झाले असे सिद्ध झाले असले तरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. प्रसिद्ध गीतकार, शायर, कवी असलेले राहत इंदोरी शायरीच्या जगतातील एक मोठं नाव होतं. जगभरातील शायरीच्या अनेक व्यासपीठांवरून श्रोत्यांना त्यांनी आपलसं केलं होतं. त्यांच्या अनोख्या शैलीतील, उत्कृष्ट कविता, शायरीसाठी ओळखल्या जातात.त्यांच्या निधनाने शायरी जगतात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मिडियासह त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहत इंदौरी यांच्या निधनानंतर कवी डॉ. कुमार विश्वास यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, हे ईश्वर! खूपच दुखद! इतके निर्भय जीवन आणि असे तरंगित शब्द- सागराने इतक्या शांतपणे अलविदा म्हणेल असे कधी वाटले नव्हते. शायरीच्या या माझ्या प्रवासातील आणि काव्य जीवनातील हास्यपूर्ण किश्शांच्या एक दिलखुलास साथी हात सोडून गेला. राहत इंदौरी यांच्या निधनानंतर संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये दुःखाचं सावट पसरलं. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनीही यासंबंधी ट्वीट करत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘आपल्या शायरीने कोट्यवधींची मनं जिंकणारे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांच्या निधनाने फक्त मध्यप्रदेशच नाही तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कुटुंबियांना आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.’ माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही राहत इंदौरी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. सुप्रसिद्ध शायर आणि फक्त मध्यप्रदेशच नाही तर देशाची शान असलेले इंदौरी यांच्या निधनामुळे मी स्तब्ध झालो आहोत. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजले होते. सर्वांनीच ते बरे व्हावी अशी प्रार्थना केली होती. पण ते असे अचानक सर्वांना सोडून जातील यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.’
इंदौरी हे एक अत्यंत संवेदनशील कवी होते. शब्दांच्या जादूने लोकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांचा नागपूरशी जवळचा संबंध होता. १९७५ मध्ये पहिली शायरी नागपुरातच सादर केली होती. त्यांच्यावर कृष्णबिहारी नूर आणि नाजीम अन्सारी या ज्येष्ठ शायरांचा प्रभाव होता. त्यांच्या जगण्याचे ध्येय म्हणजे त्यांचे काव्य होते. कोरोनाने लोकांच्या बोलण्यावर बंदी आणली. तोंडाला कवचं बसू लागली. ते कसे गप्प बसणार होते? मास्क लगा कर थक गए है वो लोग, जो लोग कहते थे औरतों को घूँघट में रहना चाहिए। भेदभावापेक्षा लोकांच्या एकात्मतेवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या शायरीत मानवतावादी आक्रमकताही होती..सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदूस्तान थोडी है। जेव्हा कोरोनामुळे काळ पिसाळला आणि लोक सैरभैर वागू लागले तेंव्हा इंदूर येथे कोरोना योद्ध्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले होते, कल रात १२ बजे तक मैं दोस्तों से फोन पर पुछता रहा कि वह घर किसका है जहाँ डाक्टरोंपर थुका गया है, ताकि मैं उनके पैर पकडकर, माथा रगडकर, उनसे कहूँ कि खुदपर, अपनी बिरादरी, अपने मुल्क और इन्सानियत पर रहम खाएं। यह सियासी झगडा नहीं, बल्कि आसमानी कहर है, जिसका मुकाबला हम मिलकर नहीं करेंगे तो हार जायेंगे। या मानवता धर्माच्या आयोजकाला युगसाक्षीतर्फे शतश: नमन!
गंगाधर ढवळे ,नांदेड