लेक वयात आली व्हती…मुलखाची लाज होती लेकीच्या गालावर..आईला हळुच सांगुन पाहिलं…आईनं गल्लीतल्या मामीनां बोलावुन आणलं..मामी बाहेरुनच आरडुन म्हणत होती…बायसं तुम्ही आता आजी व्हणार..म्या बी मामीआज्जी व्हणार..करा कणकेची दोन उंबर …एकात सुपारी भरा न् एकात खोबरं भरा…खाऊ घाला लेकीला…पहिली पोर व्हती की पोरगं व्हतंय …लेक कण्च खाईल आधी.. खाल्लं की कळल…
हि मामी लई चंचल व्हती…बडबडी…प्रत्येक वाक्यागणिक व्हंय इथं म्हणायची लकबच व्हती…डोक्यावरचा पदुर आवरत आवरत बोलत व्हती . बायसं आता खोलीत कडला एक खड्डा खंदा मंजी हिला आंघुळ करता यील..अंघुळीचं पाणी सापानं वलांडु नये हिची भोळीभाबडी समजुत…
मामीची बडबड हुईपतोर माईनं तवर दोन उकडीचं उंबर केलं..न् मामीच्या हातात ताट दिलं… लेकीम्होरं उंबराचं ताट ठिवुन मामी म्हणली…हं उचल माय एक लाव तोंडाला…
लेकीनं एक उचलला उंबर न् लावला तोंडाला…अन् मधी सुपारी निघाली…मामीचा चेहरा आधीच लई हसरा असल्यानं…न् सुपारी निघाली हे तिन् पाह्यलं न् जरा वरच्याच आवाजात हसतच वरडली…बायसं तुम्हाला पयला नातु हुणार बघा.. वाटा पेढं….पदर दातात धरत लाजुनच व्हंय हितं(मुरक्यातच म्हणाली)
असे सहा दिस गेल्यावर सातव्या दिवशी सका़ळीच मामी हजर…आज वटीभरण हाय.कालच यास्नी सांगीतलं हुतं साडी आणाया भाचीसाठी …तुम्ही कुणालातरी झेंडुची फुलं आणाला सांगा …डोक्यावर दांडेहार ..गळ्यात हार…करता यील.
गल्लीतल्या प्रत्येक घरास आमंत्रण दिलं हुतं जेवायचं …
मायनं आजीनं व मामीनं (हि सख्खी मामी) दुपारीच पुरणाचा घाट घातला..रटरट डाळ शिजली …गुळ घालुन शिजवुन झाल़ं… पाट्यावर वरवट्यानं पुरणं वाटलं हुतं ..दुरडीभर शिगोशिग पुरणपोळ्या झाल्या व्हत्या जर्मनच्या पातेल्यात येळणाच्या आमटीनं चांगलाच कट धरला हुता…
जेवणं उरकली…फकस्त उरल्या बाया पोरी..
मे महिना असल्यानं वारकावदानाचं दिस व्हतं..
अंगणात पाटावर बसवुन नविन साडी नेसवली ..
हार दांडेहार घालुन पाचजणीनी वटी भरली …शारदामावशीला मायनं आठवणीनं गाणी म्हणाला बोलवलं व्हतं…
गल्लीतल्या मामीनं समद्यास्नी पानसुपारी दिली व्हती…
असा पाळीचा (ओटीभरणाचा ,वटीभरणाचा) सोहळा रंगला व्हता…
क्रमश:
(आज हा सगळा सोहळा या कथेतल्या लेकीनं तिच्या लेकीला कथन करत असताना लेक म्हणाली मला आता हि पाळी म्हणजे खरंच सुखाचा सोहळा वाटतोय गं)
@सौ.जयश्री पोळ
खोपोली
.