भिक्खू संघाच्या दुसऱ्या टप्प्यातील धम्मसंदेश व धम्मदान यात्रेस प्रारंभ!


नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा येथील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्रातील भिक्खू संघाच्या दुसऱ्या टप्प्यातील धम्मसंदेश व धम्मदान यात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे.‌ कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखाली यात्रेसाठी भिक्खू संघाची स्थापना करण्यात येऊन अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथून धम्मदान व धम्मसंदेश यात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी भिक्खू संघातील भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुदत्त, भंते सुमेध, धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे, भगवान कोकरे, प्रकाश लोणे, नारायण कोकरे, बालाजी लोणे, हरी कोकरे, निवृत्ती लोणे यांची उपस्थिती होती. विविध भागातील गावांना भेटी देऊन दान पारमिता व धम्मदेसनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून या निमित्ताने आर्थिक दानासह सर्व प्रकारचे धान्यदान व अपत्य दानाबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.


    बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्ह्यात सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांसाठी धम्मसंदेश व धम्मदान यात्रा काढण्यात येत आहे. या पहिल्या टप्प्यातील यात्रेचा प्रारंभ कंधार व तालुक्यातील मौजे कुरुळा येथून झाला होता. त्यानंतर मुदखेड, गायतोंड, तळणी, धानोरा, लिंबगाव, लिंबगाव कँप, वाडी, चिखली, निळा, आलेगाव, आसेगाव, सुनेगाव, हिवरा खु., पिंपरी महिपाल, मरळक, सुगाव, रहाटी, जैतापूर, पिंपरण, नाळेश्वर आदी शंभराहून अधिक गावांतून ही यात्रा नेण्यात येऊन विविध विषयांवरील सामाजिक प्रबोधन करण्यात आले. या यात्रेला अनेक ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका यांचा प्रतिसाद लाभत असून आणखी तीन-चार टप्प्यांत धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे. 
          दरम्यान, प्रत्येक गावातून श्रामणेर होऊ इच्छिणाऱ्या उपासकांना दीक्षा देऊन त्यासाठी नावनोंदणी करण्यात येत आहे. आता महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने टाळेबंदीतून सूट मिळणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत चालला आहे. या पार्श्वभूमीवर दर महिन्याच्या पौर्णिमेला खुरगाव येथे पौर्णिमोत्सव हा कार्यक्रम होत असून त्यापूर्वी दहा दिवसांचे श्रामणेर शिबिर होणार आहे. त्यासाठी फोनवरून अथवा प्रत्यक्ष उपस्थित होता येईल असे भदंत पंय्याबोधी थेरो यांनी कळविले आहे. यात्रेदरम्यान आर्थिक दानासह सर्व प्रकारच्या धान्याचे दान भिक्खू संघाकडून स्विकारण्यात येत आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण भवन, विपश्यना केंद्र, भिक्खू निवास यांच्या नियोजित इमारत बांधकामासाठी आर्थिक सहाय्य करावे, बौद्ध कुटुंबांनी आपल्या एका अपत्यांचेही भिक्खू संघाला दान करावे, प्रत्येक गावातून किमान एका कायमस्वरूपी भिक्खूची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *