नांदेड ; महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्यावतीने आरक्षणाचे जनक तथा लोक कल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘एक वही – एक पेन’ वाटप करुन जून ते फेब्रुवारी या नऊ महिन्यांच्या अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, माजी सरपंच कैलास गोडबोले, राजेश शिखरे, संजय पावडे, चांदू गवळी, हरिदास पांचाळ, आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासोबतच सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून शाहू जयंती ते शिव जयंती या कालावधीत गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षक सेनेने ‘एक वही- एक पेन’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानाचा प्रारंभ जवळा देशमुख या गावी करण्यात आला. शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील साठ मुला मुलींना ‘एक वही- एक पेनचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर म्हणाले की, एक वही व एक पेन ही काही वर्षभर पुरेल असे नाही. परंतु कोरोना काळात बेरोजगार झालेल्या सर्वच स्तरांतील कामगार, कारागीर, शेतमजूर यांच्या पाल्यांना आॅनलाईन शिक्षण अयशस्वीच ठरले आहे. त्यामुळे समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याचे वाटप करावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर ढवळे यांनी ‘एक वही – एक पेन’ हा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या अभियानासाठी शिक्षक सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.