फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे तालुक्यातील जांब-जळकोट राष्ट्रीय महामार्ग च्या शेजारी गऊळ लगत असलेल्या भोजूचीवाडी येथील नदीवर गावाला जोडणारा पूल ता.११ जुलै रोजी झालेल्या पावसात वाहून गेला असल्याने नागरिकांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ता.१४ जुलै रोजी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार तहसील कार्यालय कंधार येथे लेखी निवेदन देऊनही या गंभीर बाबीकडे कोणी लक्ष घालत नसल्याने गावकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
सदर निवेदनात भोजूचीवाडी सह मानसिंगवाडी , लिंबातांडा , चोळीतांडा व राठोड नगर आदी गावांचा संपर्क तुटला असून रहदारी पूर्णपणे बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सदर बाबीची महसूल विभागाने तात्काळ दखल घेऊन पंचनामा करावा व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे आमच्या अडचणी मांडून नवीन पूल बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ही करण्यात आली आहे.
वरील चार , पाच गावांसाठी हाच महत्वपूर्ण पूल असून यावरूनच नियमित वाहतूक असते . तालुक्याला जाण्यासाठी असो का शेतशिवारात जाण्यासाठी असो . माणसांना व जनावरांना वाहतूक करण्यासाठीचा मुख्य रस्ताच बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाली असून संबंधितांनी तात्काळ लक्ष घालून आमचा प्रश्न सोडवावा अशी मागणी गावकऱ्यातून जोर धरत आहे.